Home » Blog » आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

by प्रतिनिधी
0 comments
first election

-विजय चोरमारे 

पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या निवडणुकीत एक मतदानकेंद्र फक्त नऊ मतदारांसाठी उभारण्यात आले होते. ते सर्वात छोटे मतदानकेंद्र होते. पश्चिम बंगालमधल्या पहाडी प्रदेशात मतदानाची टक्केवारी ८५.२ टक्के होती, तिथे राजस्थानातील वाळवंटी प्रदेशात ती २७.७ टक्के होती.

भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१-५२ मध्ये पहिले केंद्रीय निवडणूक आयुक्त सुकुमार सेन (आयसीएस) यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. जगाच्या लोकशाहीच्या इतिहासातली ही ऐतिहासिक घटना होती. कारण जगातील एक षष्टमांश लोकांनी पाच वर्षांसाठी आपले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान केले. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, फाळणीच्या वेळी झालेला मोठा हिंसाचार या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीवेळी संसाधनांची आणि दळणवळणाच्या साधनांची प्रचंड कमतरता असताना देशाच्या कानाकोप-यातील लोकांना लोकशाहीच्या या ऐतिहासिक प्रक्रियेत सामावून घेण्यात आले. ही निवडणूक जशी ऐतिहासिक ठरली, तशीच निवडणूक आयोगाची कामगिरीही ऐतिहासिक ठरली.

भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाचा अंदाज घेऊन प्रत्यक्ष मतदानाचे नियोजन करणे गरजेचे होते. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील चिनी आणि पंगी या दोन विधानसभा मतदारसंघात एकूण निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच मतदान घ्यावे लागले. तिथे नोव्हेंबरमध्ये बर्फ पडायला सुरुवात होत असल्यामुळे त्याच्याआधी मतदान प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. १० सप्टेंबर १९५१ ला या दोन मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिसूचना काढण्यात आली. लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी एकाचवेळी मतदान घेण्यात आले. २५, २७, २९ व ३१ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर १९५१ या दिवशी मतदान घेण्यात आले. हिमाचल प्रदेशातील उर्वरित मतदारसंघांतील मतदान ३० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्यात आले. दुर्गम भाग, वाहतूकीची गैरसोय आणि संपर्क माध्यमांचा अभाव अशा अनेक अडचणींमुळे हिमाचल प्रदेशात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तब्बल ३७ दिवस लागले. यामध्ये प्रत्यक्ष मतदानाचे दिवस सतरा होते.

त्रावणकोर-कोचीनमधल्या थिरुवेल्ला आणि त्रिचूर लोकसभा मतदारसंघांमध्ये (प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ) त्यानंतर म्हणजे १० डिसेंबर १९५१ ला मतदान घेण्यात आले. उर्वरित मतदारसंघांमध्ये डिसेंबर तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ओरिसा, मध्य प्रदेश, हैद्राबाद आणि पंजाबमध्ये डिसेंबर १९५१ मध्ये मतदान घेण्यात आले. उर्वरित राज्यांमधील मतदान जानेवारी १९५२ मध्ये पार पडले. उत्तरेकडील विशेषतः उत्तर प्रदेशातील पर्वतीय प्रदेशात बर्फ वितळल्यानंतर म्हणजे फेब्रूवारीमध्ये मतदान घेण्यात आले.

उत्तर प्रदेश, भोपाळ आणि उत्तर प्रदेशात काही ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले. मतदानादरम्यान काही ठिकाणी गंभीर अनियमितता आढळून आल्यामुळे, तसेच काही ठिकाणी मतपेट्यांमध्ये छेडछाड झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे निवडणूक आयोगाने त्याठिकाणी फेरमतदान घेतले.

विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल सर्वात आधी मध्य प्रदेश आणि सौराष्ट्राचे – नऊ फेब्रूवारी १९५२ रोजी जाहीर करण्यात आले. शेवटचा निकाल १७ मे रोजी कूर्गचा जाहीर झाला. लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन एप्रिल १९५२ रोजी जाहीर करण्यात आले.

पहिल्या निवडणुकीत मतदान केंद्रे निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एका मतदान केंद्रावर एक हजाराहून अधिक मतदार असू नयेत, भौगोलिकदृष्ट्या परिचयाच्या ठिकाणी मतदान केंद्र असावे, शक्य असेल तिथे महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बूथ असावेत, कुणाही मतदाराला मतदानासाठी तीन मैलाहून अधिक अंतरावर जावे लागू नये आणि कोणत्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मतदान केंद्र असू नये, अशा प्रकारच्या या सूचना होत्या. 

पहिल्या निवडणुकीत एक लाख ३२ हजार ५६० मतदान केंद्रे आणि त्याअंतर्गत एक लाख ९६ हजार ८४ बूथ होते. ९४ हजार ४३१ मतदान केंद्रांवर एकेकच बूथ होता.

पहाडी प्रदेशातली आव्हाने

पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या निवडणुकीत एक मतदानकेंद्र फक्त नऊ मतदारांसाठी उभारण्यात आले होते. ते सर्वात छोटे मतदानकेंद्र होते. पश्चिम बंगालमधल्या पहाडी प्रदेशात मतदानाची टक्केवारी ८५.२ टक्के होती, तिथे राजस्थानातील वाळवंटी प्रदेशात ती २७.७ टक्के होती.

मतदानासाठी हल्ली इलेक्ट्रॉनिक मशीन वापरले जाते. पण १९५२च्या पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी स्टील वा लाकडाच्या पेट्या वापरण्यात आल्या होत्या. निवडणुकीमध्ये या मतदानपेट्या खूप जबाबदारीने हाताळाव्या लागत. प्रत्येक पक्षाच्या स्वतंत्र पेट्या आणि त्यावर निवडणूक चिन्ह अशा मतपेट्या या पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी होत्या. पहिलीच निवडणूक असल्यामुळे मतदान कसे करायचे, याबद्दल सर्वचजण अनभिज्ञ होते. शहरी व सुशिक्षित भागही पन्नासच्या दशकात आजच्या इतका पुढारलेला नव्हता. खेड्यापाड्यांतून व आदिवासी भागात खूपच निरक्षरता होती. लोकांना लिहिता-वाचता येत नव्हते. त्यामुळे या पहिल्या वहिल्या निवडणुकीत अनेक गमतीचे प्रसंगही घडले. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात एका ठिकाणी स्त्री मतदार रेशनकार्ड घेऊन मतदान करण्यासठी मतदान केंद्रावर आल्या होत्या. मत दिले नाही तर रेशनकार्ड जप्त होईल, अशी भीती त्यांना घालण्यात आली होती. काही ठिकाणी तर मतदारांनी मतपेट्या उघडण्याचाही प्रयत्न केला. मतपेटी उघडून त्यात मत टाकायचे, असे वाटल्यामुळे त्यांनी हा प्रकार केला. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याबद्दल खुलासेवार समजावून सांगितल्यानंतर तो प्रयत्न बंद झाला. काही मतदारांनी तर उमेदवार व पक्षाच्या निशाण्या न पाहताच कोणत्याही मतपेटीत मत टाकल्याचे आढळून आले होते. १९५२मध्ये काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘जू मानेवर घेतलेली बैलजोडी’ हे होते. समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘झाड’ होते. कम्युनिस्ट पार्टीचे निवडणूक चिन्ह ‘कोयता व कणीस’, तर जनसंघाचे निवडणूक चिन्ह ‘पेटलेली पणती’ हे होते. हिंदु महासभेचे निवडणूक चिन्ह ‘घोडेस्वार’ होते. प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्वतंत्र मतपेट्या मतदान केंद्रात ठेवण्याचा विचार करणाऱ्याला आज लोक वेड्यात काढतील. पण १९५२मध्ये ‘निवडणूक’ हा विषयच सर्वांना नवीन होता. राजकीय पक्ष, निवडणूक अधिकारी, सरकार आदी अशा सगळ्यांसाठीच हा नवा आणि पहिला अनुभव होता.

लोकांना निवडणुकीची माहिती व्हावी म्हणून अनेक ठिकाणी सप्टेंबरमध्ये मॉक इलेक्शनही करण्यात आले. जेणेकरून  निवडणूक कशी असते आणि मतदान कसे करायचे असते ते कळावे. निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने रेडिओ आणि चित्रपटांचाही आधार घेतला होता.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00