Home » Blog » Under 19 : भारताकडून मलेशियाचा धुव्वा

Under 19 : भारताकडून मलेशियाचा धुव्वा

एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा विजय

by प्रतिनिधी
0 comments
Under 19

क्वालालंपूर : भारताने १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी सलग दुसरा विजय नोंदवताना यजमान मलेशियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात मलेशियाचा डाव अवघ्या ३१ धावांत संपवून भारताने हे आव्हान एकही विकेट न गमावता २.५ षटकांत पूर्ण केले. सलग दोन विजयांसह गतविजेत्या भारताने ‘ग्रुप ए’मधून दिमाखात ‘सुपर सिक्स’ फेरीतही प्रवेश केला. या सामन्यात भारताच्या वैष्णवी शर्माने हॅट्ट्रिकही नोंदवली. (Under 19)

स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा भारताची कर्णधार निकी प्रसादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वैष्णवी शर्मा आणि आयुषी शुक्ला या भारताच्या दोघी डावखुऱ्या फिरकीपटूंनी निकीचा निर्णय योग्य ठरवत १४.३ षटकांमध्येच मलेशियाचा डाव संपवला. मलेशियाच्या एकाही खेळाडूला वैयक्तिक दुहेरी धावाही उभारता आली नाही. त्यांच्या संघातील सर्वोच्च धावसंख्या ५ इतकी होती. भारतातर्फे वैष्णवीने ५ धावांत ५ विकेट घेतल्या. चौदाव्या षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर वैष्णवीने नूर ऐन, नूर इस्मा व सिती नाझवान या तिघींच्या विकेट्ससह हॅट्ट्रिक नोंदवली. आयुषीने ८ धावांत ३ विकेट घेऊन तिला उपयुक्त साथ दिली.(Under 19)

गोंगाडी त्रिशा आणि जी. कमलिनी या भारताच्या सलामी जोडीने मलेशियाचे माफक आव्हान तीन षटकांच्या आतच पार केले. त्यातही त्रिशाने १२ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह नाबाद २७ धावा फटकावल्या. कमलिनी ४ धावांवर नाबाद राहिली. वैष्णवी सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. ग्रुप एमधील भारताचा अखेरचा साखळी सामना २४ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. दरम्यान, मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर ८१ धावांनी मात केली. श्रीलंकेच्या ५ बाद १६६ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव १९.४ षटकांत ८५ धावांत आटोपला.(Under 19)

संक्षिप्त धावफलक : मलेशिया – १४.३ षटकांत सर्वबाद ३१ (नूर हैरुन ५, वैष्णवी शर्मा ५-५, आयुषी शुक्ला ३-८) पराभूत विरुद्ध भारत – २.५ षटकांत बिनबाद ३२ (गोंगाडी त्रिशा नाबाद २७, जी. कमलिनी नाबाद ४).

हेही वाचा :

पंत बनला ‘लखनौ’चा कर्णधार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00