कोल्हापूर; प्रतिनिधी : नशेच्या बाजारातील सर्वात महाग असलेले एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दोन पिशव्यातील २९ ग्रॅम एमडी ड्रग्जची किंमत एक लाख पंधरा हजार रुपये आहे. दोन संशयितापैकी एक गर्भश्रीमंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अथर्व संजय सरवदे (वय २४, रा. रतननगर रोड, विश्रामबाग सांगली) आणि संतोष काशिनाथ पुकळे (वय ३०, रा. कुपवाड रोड, सांगली) अशी दोघांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. (Kolhapur Crime)
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मार्केट यार्ड परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी दोन व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. काल गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातून दोन व्यक्ती चालत येताना पोलिसांना दिसल्या. एमडी ड्रग्ज विक्री करणारे त्याच व्यक्ती असल्याचे लक्षात आल्यावर पोलिस निरीक्षक डोके यांनी इशारा करताच पोलिसांनी दोघांना झडप घालून पकडले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात तपकिरी, पिवळ्या फिकट रंगाची पावडर मिळून आली. दोघांनी एमडी ड्रग्ज असल्याची कबुली दिली. संशयित अथर्व सरवदे हा सांगलीतील असून तो गर्भश्रीमंत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. त्यांच्या वडिलांचा हॉटेल, लॉजिंगचा मोठा व्यवसाय असल्याचे कळते. तरीही ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात अथर्व कसा गुंतला, त्याने ड्रग्ज कुणाकडून विक्रीसाठी आणले याचा पोलिस शोध घेत आहेत. (Kolhapur Crime)
पोलिस उप निरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, बाबा ढाकणे, रवी आंबेकर, सनिराज पाटील, कृष्णात पाटील, मिलिंद बांगर, महेश पाटील, इंद्रजीत भोसले, मंजर लाटकर आणि उत्तम पाटील यांचा कारवाईत सहभाग होता.
हेही वाचा :
- आजरा : तालुक्यात वाघा पाठोपाठ हत्तींचे नुकसानसत्र
- मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले : एकनाथ शिंदे
- बीड जिल्ह्यात पीकविम्यात हजारो कोटींचा घोटाळा