Home » Blog » स्वत:च्या खुनाचा बनाव करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

स्वत:च्या खुनाचा बनाव करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

३५ कोटींच्या विम्यासाठी कृत्य

by प्रतिनिधी
0 comments
Amol Powar

कोल्हापूर; प्रतिनिधी : मार्च २०१६ मध्ये ३५ कोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी खुदाई कर्मचाऱ्याला ठार करून स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचणाऱ्या आरोपी बांधकाम व्यावसायिक अमोल जयवंत पोवार (रा. नंदिनी रेसिडन्सी, देशमुख हायस्कूलजवळ, सानेगुरुजी वसाहत) याला गडहिंग्लज जिल्हा व सत्र न्यायाधीश ओ.आर. देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. आरोपी अमोलचा भाऊ विनायक पोवार याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

या खटल्याची माहिती अशी – अमोल पोवार आणि विनायक पोवार या दोघा भावांनी व्यवसायासाठी बँका आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. कर्जासाठी खासगी सावकारांनी तगादा लावला होता. कर्जाची परतफेड करण्यासाठी एचडीएफसी लाईफ इन्शुरस्नकडील ३५ कोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी दोघा भावांनी खुनाचा कट रचला. गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील मजूर रमेश कृष्णा नायक (वय १९, मुळ गाव नागवेनाळा, ता. मुद्देबिहास, जि. विजापूर) याला खोदाई काम देण्याच्या बहाण्याने अमोल पोवार याने कारमधून घेऊन गेला. अमोल आणि विनायक पोवार या दोघा भावांनी रमेश नायक याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर अमोल पोवारचे कपडे मृत रमेश नायक याच्या अंगावर घातले आणि हातात घड्याळ बांधले. त्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन दोघे भाऊ आजरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेळवट्टी येथे आले. तेथील लक्ष्मी ओढ्याच्या पात्रात कार ढकलून दिली आणि कारवर डिझेल ओतून पेटवून दिली. मयत रमेश नायक याचे कपडे पेटवून देऊन पुरावा नष्ट केला. अपघातात स्वत:चा मृत्यू झाल्याचा बनाव अमोल पोवार याने केला व तो फरार झाला.

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून कोची येथून अमोल पोवार याला अटक केली. त्याने बँका आणि खासगी सावकारांचे कर्ज भागवण्यासाठी खून केल्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास करून आजरा पोलिसांनी गडहिंग्लज जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाने ७१ साक्षीदार तपासले. हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. यातील पंच, साक्षीदार तसेच आरोपी अमोल पोवार आणि मयत रमेश नायक यांना एकत्र पाहणारे शेवटचे साक्षीदार तसेच बँक व इन्शुरन्समधील काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यातील ३० साक्षीदार फितूर झाले असतानाही फिर्यादी सरकार पक्षाने अंतिम दृश्याच्या अनुषंगाने तपासलेल्या साक्षीदारांची साक्ष प्रभावी ठरली. या खटल्यात सुरवातीला एच.आर. भोसले यांनी, तर नंतर एस.ए. तेली यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्षी, पुरावा लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश ओ. आर. देशमुख यांनी अमोल पोवार याला आजन्म कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

पोलिस तपासात खासगी सावकार, नगरसेवकांची चौकशी

खुनाच्या गुन्ह्यात अमोल पोवार याला व्याजाने पैसे दिलेल्या ४० खासगी सावकारांची चौकशी केल्याने त्यांचे धाबे दणाणले होते. पोवार हा बांधकाम व्यावसायिक असल्याने तत्कालीन नगरसेवकांचीही चौकशी केली होती. अमोल पोवार याने स्वत:च्या खुनाचा बनाव केल्याचा संशय खासगी सावकारांना आला होता. त्यांनी अमोल ज्या हॉटेलमध्ये उतरला होता तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवून पोलिसांना दिले होते. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरून अमोलला अटक झाली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00