Home » Blog » भारताच्या प्रजनन दरात मोठी घट

भारताच्या प्रजनन दरात मोठी घट

सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात वाढीचा दर कमी; १४५ कोटी लोक

by प्रतिनिधी
0 comments
pregnancy file photo

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशाची लोकसंख्या १४५ कोटी ५५ लाख ९१ हजार ९५ होती. एप्रिल २०२३ अखेर भारताची लोकसंख्या १४२ कोटी ५७ लाख ७५ हजार ८५० होती. तथापि, एका अभ्यासानुसार भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सातत्याने कमी होत आहे. १९५० मध्ये प्रजनन दर ६.२ होता, तो २०२१ मध्ये दोन टक्क्यांवर आला.

प्रजनन दर असाच राहिला, तर २०५० पर्यंत तो १.३ पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानुसार देशाची लोकसंख्या २०५४ मध्ये १.६९ अब्जापर्यंत पोहोचू शकते आणि २१०० मध्ये ती केवळ १.५ अब्ज इतकी कमी होईल. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, प्रजननक्षमतेशी संबंधित अनेक आव्हाने जगभर समोर येत आहेत. याचे कारण हवामानातील बदल आणि खाण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल. ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’ यांनी केलेल्या अभ्यासात असे सांगण्यात आले, की गर्भधारणा हे एक मोठे आव्हान बनत आहे. बालमृत्यूचा धोकाही वाढू शकतो, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

कमी मुले जन्माला आली, तर देशाची लोकसंख्या कमी होईल आणि याचा फायदा होईल, असा विचार बहुतांश लोक करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु प्रजनन दर कमी असल्याने अनेक तोटे आहेत. मुले नसतील तर देशाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. एका संशोधनात महिलांची प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे देश आणि समाजावर होणारे परिणाम दिसून आले. त्यानुसार प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे आजूबाजूला लहान मुलांपेक्षा वृद्धांची संख्या जास्त आहे. यामुळे श्रमशक्ती कमी होईल, जी कोणत्याही देशासाठी चांगली नाही.

महिलांचे सरासरी आयुर्मान वाढणार

‘सायंटिफिक रिपोर्टस्’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यास अहवालानुसार प्रजनन दर कमी झाल्यामुळे महिलांचे सरासरी वय वाढेल. त्याचा थेट फायदा महिलांना होईल. त्यामुळे त्यांचे आयुर्मान वाढेल. संशोधनानुसार, एका मुलाला जन्म देणाऱ्या महिला त्याहून अधिक मुलांना जन्म देणाऱ्या महिलांपेक्षा सरासरी ६ वर्षे जास्त जगतात.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00