Home » Blog » पश्चिम घाटात गोमेच्या तीन नव्या प्रजातींचा शोध

पश्चिम घाटात गोमेच्या तीन नव्या प्रजातींचा शोध

0 comments

नवीन प्रजातींचा शोध घेणे हे सोपे काम नाही. विशेषतः गोमेसारख्या जीवांच्या बाबतीत हे अधिक आव्हानात्मक ठरते. या जिवांच्या प्रजातींमध्ये अनेकदा अतिशय सूक्ष्म फरक असतात. ते ओळखण्यासाठी त्यांच्या शरीराच्या विविध भागांचे आकार आणि रचना सूक्ष्मदर्शकाखाली तपासावी लागते. केरळमधील कोझिकोड येथे असलेल्या भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या (ZSI) पश्चिम घाट प्रादेशिक केंद्रातील आणि मलबार ख्रिश्चन महाविद्यालयातील संशोधकांनी हे आव्हान पेलत पश्चिम घाटातील केरळ आणि कर्नाटकच्या जंगलांत गोमांच्या तीन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे.

या तिन्ही प्रजाती Rhysida Wood, 1862 या गोमांच्या वंशातील आहेत. त्यांना Rhysida quadrispinosa, Rhysida coorgensis आणि Rhysida neyyarensis अशी नावे देण्यात आली आहेत. १२ ऑक्टोबर रोजी International Journal of Tropical Insect Science या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, या शोधामुळे भारतातील Rhysida वंशातील ज्ञात प्रजातींची संख्या २३ झाली आहे.

नव्या प्रजातींचा शोध कसा लागला?

कोझिकोड येथील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पश्चिम घाट प्रादेशिक केंद्रातील आणि मलबार ख्रिश्चन महाविद्यालयातील संशोधकांनी हा अभ्यास केला. सूक्ष्मदर्शक आणि डिजिटल कॅमेऱ्यांच्या साहाय्याने त्यांनी या जिवांच्या शरीररचनेतील बारकाव्यांचा अभ्यास केला.

त्यांच्या पायांवरील काटे, शरीराचे विविध खंड, स्पर्शिका आणि इतर अवयवांची रचना यांची पूर्वी ज्ञात असलेल्या प्रजातींशी तुलना करण्यात आली. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या राष्ट्रीय प्राणी नमुना संग्रहात जतन करून ठेवलेल्या, मात्र अद्याप ओळख निश्चित न झालेल्या गोमांच्या नमुन्यांचाही अभ्यास करण्यात आला.

याशिवाय संशोधकांनी वैज्ञानिक नोंदी आणि Chilobase 2.0 यांसारख्या जागतिक माहिती-संग्रहांचा आधार घेतला. या सर्व तपासणीनंतर अभ्यासातील नमुने पूर्वी ज्ञात असलेल्या प्रजातींपेक्षा वेगळे असल्याचे निष्पन्न झाले.

तीन प्रजातींच्या नावांमागील वैशिष्ट्ये

तिन्ही नव्या प्रजातींची नावे त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांशी किंवा त्या आढळलेल्या भौगोलिक प्रदेशाशी संबंधित आहेत.

१. Rhysida quadrispinosa

या प्रजातीच्या नावाचा संबंध तिच्या पायांवरील चार वैशिष्ट्यपूर्ण काट्यांशी आहे. मागच्या पायांच्या एका भागाच्या खालच्या बाजूला आणि कडेवर हे चार काटे आढळले. हे वैशिष्ट्य या प्रजातीची ओळख निश्चित करण्यासाठी महत्त्वाचे ठरले.

२. Rhysida coorgensis

कर्नाटकातील कूर्ग अर्थात कोडगू या प्रदेशाच्या नावावरून या प्रजातीला coorgensis हे नाव देण्यात आले. या प्रदेशातून तिचा नमुना गोळा करण्यात आला होता. त्यामुळे या नामकरणातून त्या भागाची ओळख वैज्ञानिक जगतात नोंदवली गेली आहे.

३. Rhysida neyyarensis

केरळमधील नेय्यार वन्यजीव अभयारण्याच्या नावावरून या प्रजातीचे नामकरण करण्यात आले. या जीवाचा शोध ज्या नैसर्गिक परिसराशी संबंधित आहे, त्या परिसराचा गौरव या नावातून करण्यात आला आहे.

सूक्ष्म फरक; पण प्रजाती वेगळी

दिसायला सारखे असलेल्या जिवांच्या शरीररचनेतील लहानसहान फरकही ते स्वतंत्र प्रजातींचे असल्याचे सिद्ध करू शकतात.

Rhysida quadrispinosa या प्रजातीच्या स्पर्शिकांमध्ये १८ खंड आढळले. शरीराच्या काही भागांच्या कडांची रचना आणि मागच्या पायांवरील काट्यांची मांडणी हीदेखील तिची वैशिष्ट्ये आहेत. या गुणधर्मांमुळे तिचे इतर प्रजातींपासून वेगळेपण स्पष्ट झाले.

दुस-या Rhysida coorgensis या प्रजातीची ओळख तिच्या पाठीवरील विशिष्ट खुणा आणि शरीराच्या मागील भागाजवळील काट्यांच्या रचनेवरून निश्चित करण्यात आली. या प्रजातीमध्ये Rhysida ikhalama या प्रजातीशी काही साम्य आढळते. मात्र, अंतर्गत शरीररचनेतील फरकांमुळे ती स्वतंत्र प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले.

तिस-या Rhysida neyyarensis या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या पायांवरील लहान काट्यांची संख्या आणि त्यांची मांडणी. पहिल्या ते एकोणिसाव्या पायांच्या जोडीपर्यंत प्रत्येक पायावर दोन टार्सल स्पर्स (पायांच्या टोकाजवळील काट्यासारखी उपांगे) आढळली. या अतिसूक्ष्म वैशिष्ट्यांच्या आधारे संशोधकांना तिची स्वतंत्र ओळख निश्चित करता आली.

जैवविविधतेसाठी शोधाचे महत्त्व

पश्चिम घाट हा जगातील महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रांपैकी एक मानला जातो. येथील घनदाट जंगले, दमट हवामान आणि विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितींमुळे असंख्य जीवांना अधिवास मिळतो. मात्र, या प्रदेशातील अनेक प्रजातींबद्दल विज्ञानाला अद्याप पुरेशी माहिती नाही.

गोम आकाराने लहान असली, तरी पर्यावरणातील संतुलन राखण्यात तिची महत्त्वाची भूमिका असते. या शिकारी जिवांचे अन्न लहान कीटक आणि इतर अपृष्ठवंशी प्राणी असतात. त्यामुळे अन्नसाखळी आणि मातीतील परिसंस्थेच्या संतुलनात त्यांचे योगदान असते.

या तीन नव्या प्रजातींची ओळख पटल्यामुळे जीवांच्या उत्क्रांतीचा अभ्यास, त्यांचे भौगोलिक वितरण आणि पश्चिम घाटातील जैवविविधता समजून घेण्यासाठी संशोधकांना नवी माहिती मिळणार आहे.

अधिवासाचे संरक्षण आवश्यक

या शोधातून मिळणारा महत्त्वाचा संदेश असा की, जंगलांचे महत्त्व केवळ मोठे वन्यप्राणी, रंगीबेरंगी पक्षी किंवा दुर्मीळ वृक्ष यांच्यापुरते मर्यादित नाही. आकाराने अगदी लहान असलेले जीवही नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

पर्यावरणात वेगाने होणारे बदल, जंगलांचे आकुंचन आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर अशा जिवांचे अधिवास सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. पश्चिम घाटातील या तीन नव्या प्रजातींचा शोध निसर्गातील अनेक रहस्ये अद्याप उलगडायची बाकी असल्याची जाणीव करून देतो.

हे जीव आकाराने लहान असले, तरी त्यांच्या शोधामुळे भारताच्या समृद्ध जैवविविधतेच्या अभ्यासात एक नवे पान जोडले गेले आहे.

(सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या डाऊन टू अर्थच्या सौजन्याने)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!