- विजय चोरमारे
वो गुंडा, वो दंगाई, वो लंपट, जो खुद को योगी कहता है वो उत्तर प्रदेश को क्या शिक्षा देगा? योगी का वस्त्र ओढकर उत्तर प्रदेशकी जनता को ठगने का काम कर रहा है…. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात एवढे कठोर शब्द त्याच्या कट्टर विरोधकांनीही वापरले नसतील. पण एक २९ वर्षांची तरुणी थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे गोरखपूरमध्ये जाऊन योगींना ललकारते, तेव्हा ऐकणारे थरारल्यावाचून राहात नाहीत. नेहा बोरा दिल्लीच्या क्षितिजावर तळपणारी शलाका जे धाडस दाखवते ते थक्क करणारे असते.
एवढा पराकोटीचा निडरपणा आणि धारदारपणा भारतीय राजकारणात अपवादानंच पाहायला मिळतो. नीट पेपर फुटीच्या आंदोलनानंतर भारताच्या राजकीय क्षितिजावर ही वीज तळपायला लागलीय. तिचं नाव नेहा बोरा.
दिल्ली पोलिस सळो की पळो
गेले काही दिवस तिनं दिल्ली पोलिसांना सळो की पळो करून सोडलंय. तुम्ही मला जिथं जाण्यापासून अडवता आहात तिथं मी जाणार. कारण तो माझा संविधानिक अधिकार आहे. असं म्हणून ती पुन्हा पुन्हा प्रतिबंधित ठिकाणी जाते. पोलिसांना गुंगारा देते. कधी पोलिसांशी कबड्डी खेळते. कधी वा-यासारखी धावत सुटते. पुन्हा पुन्हा अटक करून पोलिस तिला त्रास देतात, अज्ञात ठिकाणी सोडतात तरी ती मागे हटत नाही. तिची ही जिद्द आणि संघर्ष पाहिल्यानंतर हे रसायन काही औरच आहे, हे पटल्यावाचून राहात नाही.
हेही वाचाः राहुल गांधींचे राजकारण नव्या दिशेने
योगी आदित्यनाथ यांना दंगेखोर, लंपट म्हटल्याबद्दल पत्रकारांनी विचारल्यावर ती म्हणाली, मी काहीही अपशब्द किंवा आक्षेपार्ह शब्द वापरलेले नाहीत. त्यांच्यावर जे गुन्हे नोंद आहेत, त्यांची मी फक्त जंत्री वाचली.
खतम.
झारखंडच्या दौ-यावर असताना तिच्यावर शाई फेकली गेली. तेव्हा जराही विचलित न होता ती म्हणाली, आम्ही पोलिसांच्या लाठ्या-काठ्या, अश्रूधूर आणि पॅलेट गनच्या गोळीबाराला घाबरलो नाही, तर या शाईला काय घाबरणार? याच शाईनं आम्ही आमचे भविष्य लिहू आणि यांच्या द्वेषाच्या राजकारणाचा पराभव करू.”
मूळ गाव उत्तराखंडमध्ये
नेहा बोरा सध्या राजधानी दिल्लीच्या क्षितिजावर तळपत असली तरी ती मूळची आहे उत्तराखंडमधील खटीमा या छोट्याशा शहरातली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयु म्हणजे चळवळीच्या कार्यकर्त्यांचे विद्यापीठ. कन्हैय्या कुमार, उमर खालिद ही तिथली अलीकडची नावं. तिथंच नेहा पीएच.डी.चं संशोधन करते. ती ऑल इंडिया स्टुटंड्स असोसिएशन (AISA) या विद्यार्थी संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) म्हणजे माकप-माले या पक्षाशी संलग्न अशी ही विद्यार्थी संघटना आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या विरोधात नवी दिल्लीतील जंतरमंतरवर केलेल्या २३ दिवसांच्या उपोषणामुळं नेहा बोरा देशभर चर्चेत आली. पण जिथं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन थांबलं तिथून ख-या अर्थानं नेहा बोरा तळपायला लागली.
हेही वाचाः कॉक्रोच जनता पार्टी ही संघाची `बी टीम` आहे का?
नेहाच्या या संघर्षानं देशातील तरुणांचं लक्ष वेधून घेतले. मात्र, तिच्या आयुष्याची कहाणी केवळ एका आंदोलनापुरती मर्यादित नाही. लष्करी कुटुंबात गेलेलं बालपण, वेगवेगळ्या शहरांत झालेलं शालेय शिक्षण, रंगभूमीशी जडलेलं नातं, सामाजिक न्यायाविषयीची आस्था आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची जिद्द अशा अनेक धाग्यांनी नेहाचं व्यक्तिमत्त्व घडलं आहे.
लष्करी कुटुंबातले बालपण
नेहा बोराचा जन्म १९९७ मध्ये उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा या छोट्याशा शहरात झाला. तिचे वडील भारतीय लष्करात कार्यरत होते. त्यामुळं कुटुंबाला नोकरीच्या निमित्तानं सतत स्थलांतर करावं लागलं. वेगवेगळ्या प्रदेशांत राहिल्यामुळं नेहाला लहानपणापासूनच विविध भाषा, संस्कृती आणि समाजजीवन जवळून अनुभवता आलं.
तिच्या बालपणाचा बराचसा काळ पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे गेला. तिथं तिनं दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. याच काळात कला, वक्तृत्व, नाटक आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांविषयी तिला ओढ वाटू लागली. विद्यार्थी संघटनेतील भूमिकेमुळं तिला व्यापक प्रसिद्धी मिळाली, मात्र तिला नाटक आणि वक्तृत्व तसेच वादविवादाची आवड शालेय जीवनापासूनच होती.
लष्करी कुटुंबात वाढल्यामुळं शिस्त, परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती आणि संकटांचा सामना करण्याची हिंमत तिच्यात आली. कुटुंबाची सामाजिक आणि राजकीय मतं पारंपरिक ढाच्यातली असताना नेहानं मात्र तो पारंपरिक ढाचा उद्ध्वस्त करून तिनं नवी वाट चोखाळली. स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती तिच्यात लहानपणापासूनच आकार घेत होती.
कुटुंबीय भाजपचे समर्थक
नेहाचे AISA आणि डाव्या विचारसरणीच्या राजकारणाशी असलेला संबंध, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तिनं केलेली टीका यांमुळं तिच्या कौटुंबिक आयुष्यातही मतभेद निर्माण झाले. “माझे आई-वडील भाजपचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळं आमच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होतात,” असं नेहानं सांगितलं होतं.
गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात अत्यंत कठोर शब्दात टीका केल्यानंतर भाजपकडून नेहाच्या विरोधात किमान तीन पोलिस तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्याच्या दोन दिवस आधी, नेहाला ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्यासंदर्भात AISAनं पोलिसांत तक्रार केली होती.
दिल्लीत नाट्य चळवळीमध्ये
नेहा उच्च शिक्षणासाठी दिल्लीला गेली. दिल्ली विद्यापीठात तिनं कला शाखेची पदवी घेतली. विद्यापीठातील शिक्षणानं तिच्यासमोर विद्यार्थी राजकारणाचं नवं विश्व उघडलं. शिक्षण शुल्कातील वाढ, विद्यार्थिनींची सुरक्षितता, शिक्षणाच्या समान संधी आणि विद्यार्थ्यांचे हक्क अशा प्रश्नांवरील चर्चा आणि आंदोलनांमध्ये ती सहभागी होऊ लागली. दिल्ली विद्यापीठात पदवीचं शिक्षण घेत असताना नेहानं सामाजिक-राजकीय क्षेत्रात सक्रीय व्हायला सुरुवात केली.
मुख्य प्रवाहातील उच्च शिक्षणात समाधानकारक पर्याय उपलब्ध नसल्यामुळं निराश होऊन दिल्लीस्थित ‘संगवारी’ या पथनाट्य गटासोबत ती काम करू लागली. यातून तिला चिकित्सक, सर्जनशील आणि सहयोगावर आधारित अभिव्यक्तीचं व्यासपीठ मिळालं. ज्याच्यामार्फत तिला राजकीय संघटनेत काम करण्यास थेट दिशादर्शन केलं. ज्यांचे अनुभव आणि श्रद्धा आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात, अशा लोकांना समजून घेण्याचं एक माध्यम म्हणून नेहा नाटकाकडं पाहते.
पुढं तिनं दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. मानवविद्या आणि सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासामुळे समाजव्यवस्था, रंगभूमी, सादरीकरण आणि सार्वजनिक संवाद यांविषयीची तिची समज अधिक व्यापक बनली. पुढं आंदोलनांदरम्यान मोठ्या जनसमुदायाशी संवाद साधताना या अभ्यासाचा उपयोग झाला.
सध्या नेहा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कला आणि सौंदर्यशास्त्र विभागात पीएच.डी. संशोधन करतेय. प्रा. ब्रह्म प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमी आणि सादरीकरणाच्या कलांसंदर्भात तिचं संशोधन सुरू आहे.
एकीकडे संशोधनाची शिस्त आणि दुसरीकडं विद्यार्थी चळवळीतील सक्रिय सहभाग, अशा दोन आघाड्यांवर ती काम करतेय. भाषणांमध्ये भावनिक आवाहन करण्याची आणि लोकांशी थेट नातें जोडण्याची जी क्षमता तिच्यात दिसते,त्याचं श्रेय ती रंगभूमीवरील प्रशिक्षणाला देते. नेहा बोरा दिल्लीच्या क्षितिजावर तळपणारी शलाका त्यातूनच घडत जाते.
विद्यार्थी चळवळीतून नेतृत्वाकडे
नेहाच्या राजकीय-सामाजिक प्रवासाची सुरुवात दिल्ली विद्यापीठात झाली. सुरुवातीला ती विद्यार्थ्यांच्या बैठकींना उपस्थित राही. लेख लिही. आणि सहकारी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या छोट्या सभांमध्ये आपली मते मांडत असे. शिक्षणाचं खासगीकरण, जमावाकडून होणाऱ्या हत्या आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न हे तिच्या सुरुवातीच्या कामाचे प्रमुख विषय होते.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण काम आणि स्पष्ट संवादशैली यांमुळे आइसा या संघटनेत तिची ओळख निर्माण झाली. संघटनेतील निर्णय काही मोजक्या नेत्यांनी घेण्याऐवजी ते सामूहिकरीत्या घेतले जावेत, यावर तिचा भर होता. नव्यानं विद्यापीठात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनीही संघटनात्मक कामात पुढाकार घ्यावा, केवळ वरिष्ठांच्या सूचनांचं पालन करणारे कार्यकर्ते बनून राहू नये, असे ती सांगत असते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी थेट जोडून घेणारी ही कार्यपद्धती तिच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा भाग बनली. पुढे तिची अखिल ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन(आइसा) या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.
तिच्या कार्याचा आवाका केवळ विद्यार्थी प्रश्नांपुरता मर्यादित राहिला नाही. देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामाजिक-राजकीय घडामोडींविषयी जागरूक असलेल्या तरुणांमध्येही तिला ओळख मिळाली.
नीट पेपरफुटीनंतर चर्चेत
२०२६ मध्ये नीट परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप समोर आले आणि देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थेने निराश केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर मोठं आंदोलन उभं राहिलं.
याच काळात अभिजित दिपकेने सुरू केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ ची समाजमाध्यमांवर चर्चा झाली. नेहा बोरा, तिचे सहकारी मनीष कुमार आणि आमीन अमितोज यांनी सोनम वांगचुक यांच्यासोबत नवी दिल्लीतील जंतरमंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलं. हे उपोषण तब्बल २३ दिवस चालले.
उपोषण सुरू करताना नेहाचं वजन ६६ किलो होतं. उपोषण संपेपर्यंत ते सुमारे साडेसात किलोंनी घटलं. तिचा रक्तदाबही चिंताजनक पातळीवर पोहोचला होता. प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतानाही ती आंदोलनस्थळी ठामपणे बसून राहिली. अजिबात हटली नाही. अभिनेत्री शबाना आझमी आणि कुणाल कामरा यांच्यासह अनेक मान्यवरांनी जंतरमंतरवर जाऊन तिची भेट घेतली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन संपलं.
आंदोलन संपल्यावर नेहाची इनिंग सुरू
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. उपोषण संपलं, तरी नेहाचं काम थांबलं नाही. उलट, या आंदोलनामुळे मिळालेल्या व्यापक ओळखीचा उपयोग करून तिनं शिक्षणव्यवस्थेतील दीर्घकालीन सुधारणांची मागणी पुढं नेली.
२३ दिवसांच्या उपोषणानंतर खरंतर पचनक्रिया नियमित होण्यासाठी काही दिवसांच्या विश्रांतीची आणि वैद्यकीय उपचारांची गरज होती. परंतु बिहारमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना अटक झाल्याचं कळल्यावर ही बहाद्दर मुलगी लगेच बिहारच्या दौ-यावर गेली. त्यामुळं बिहार सरकारला आंदोलक विद्यार्थ्यांना सोडावं लागलं. त्यानंतर तिनं देशाच्या विविध भागांत जाऊन आंदोलनं केली. सभा घेतल्या.
खटिमासारख्या एका छोट्या शहरातून येऊन राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यापर्यंतचा तिचा प्रवास ग्रामीण आणि निमशहरी पार्श्वभूमीतील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय राजकारणापासून आपण दूर आहोत, अशी भावना असलेल्या तरुणांना आपला आवाजही देशव्यापी चर्चेचा भाग बनू शकतो, याची जाणीव नेहाच्या प्रवासातून होते.
रंगभूमी प्रशिक्षणाचा लाभ
तिच्या नेतृत्वशैलीत अभ्यासपूर्ण मांडणी आणि रंगभूमीवर विकसित झालेले प्रभावी संवादकौशल्य यांचा मिलाफ दिसतो. एक हात कमरेवर ठेवून आणि एका हातात माईक घेऊन जेव्हा ती संवाद साधायला लागते, तेव्हा ऐकणारे देहाचे कान करून ऐकायला लागतात. इतकं ती महत्त्वाचं बोलत असते. तिच्या बोलण्यात हिंदीची मिठास असतेच, पण त्या हिंदीला पहाडी लय असते.
सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांसारख्या स्त्रीशिक्षणाच्या अग्रणी व्यक्तींचा उल्लेख ती आपल्या भाषणांत सातत्यानं करीत असते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणातील समानतेचा प्रश्न ती नेहमी मांडत असते.
तिची भूमिका स्पष्ट आहे. दिशा स्पष्ट आहे. जर मोदी-शाह यांच्याविरोधातली लढाई आहे तर ती अधिक नेटानं लढायला पाहिजे. डाव्या संघटनेत काम करूनही तिला राहुल गांधींना भेटण्यात किंवा त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होण्यात काही गैर वाटत नाही. तिचं हे वेगळेपण तिचा प्रगल्भपणा अधोरेखित करते.
आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिक न करता नेहा सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करते. व्यक्तीपेक्षा आपण ज्या प्रश्नांसाठी लढतो, ते प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी राहावेत, अशी तिची भूमिका असते. ती एका अर्थानं रास्त असली तरी देशाच्या क्षितिजावर एखाद्या विजेसारखी चमकणारी आणि वेळप्रसंगी कडाडणाही नेहा, तिचा प्रवास समजून घेणं निश्चितच आजच्या पिढीतल्या मुलींसाठी प्रेरणादायी आहे.