जमीर काझी : मुंबई : गेल्या ४८ दिवसांपासून आंदोलन करत असलेले नाशिकमधील आदिवासी विद्यार्थी लाँग मार्च करीत मुंबईत प्रवेश करत असतानाच पोलिसांनी धरपकड सुरू केली . त्यानंतर दादर येथील टिळक भवन व आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात मुक्काम करीत असताना रात्री कार्यालयात घुसून त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिस वाहनातून त्यांना भिवंडी व मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात नेण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रक्राराबाबत आंदोलक विद्यार्थी व काँग्रेसच्या नेत्यांकडून तीव्र संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (Tribal students rounded up at Tilak Bhavan)
मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन कारवाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचा गंभीर आरोप एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी पत्रकारांशी बोलताना केला .घडलेल्या प्रकाराबाबत ते म्हणाले की, ‘आदिवासी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती आधीच दिली होती. नाशिकहून मुंबईपर्यंत हे विद्यार्थी आले. पण आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांची टिळक भवन व मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र रात्री अचानक पोलिसांनी धाडसत्र सुरु केले. नवी मुंबईत काहीना ताब्यात घेतले. काही मुलामुलींना मारहाण करण्यात आली, एक विद्यार्थी बेशुद्ध पडला, काहींना भिवंडीला सोडून दिले. मुंबई काँग्रेस कार्यालयात झोपलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी उठवले, त्यांना यलो गेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले. दादरमधून काहींना उचलून नेले. पोलिसांनी एखाद्या आरोपीसारखे ताब्यात घेतले, काँग्रेस कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतले. सुरुवातीला दादर पोलीस स्टेशनला घेऊन गेले, नंतर चुनाभट्टी व शेवटी कोपरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. काँग्रेस नेत्यांनी पोलिसांशी सातत्याने संपर्क साधल्यानंतर काहींना सोडून देण्यात आले. (Tribal students rounded up at Tilak Bhavan)
पोलिसांकडून अदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक
मुंबई एसएसयुआयचे अध्यक्ष प्रद्युम यादव म्हणाले की, पोलिसांनी विद्यार्थी व मला जबरदस्तीने उचलून नेले. आधी दादर पोलीस स्टेशनला नेले, दादरमधून चुनाभट्टी पोलीस स्टेशनकडे पोहचवले, वेगवेगळ्या व्हॅन मधून घेऊन गेले, पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली.
आंदोलकांना टिळक भवनातून ताब्यात घेतले
आंदोलक विद्यार्थ्यीनींनी पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी काही सहकाऱ्यांना रस्त्यातूनच ताब्यात घेतले. टिळक भवनमध्ये अंघोळ करून बाहेर येत असतानाच बाथरूममधून पोलिसांनी ताब्यात घेतले. कुठे जायचे हे ते सांगत नव्हेत. पोलीस धमकावत होते. कोपरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले, काँग्रेस नेत्यांचा फोन आल्यानंतर शेवटी सोडले नाहीतर नाशिकला सोडणार होते. पोलिसांनी आम्हाला वॉशरुमलाही जाऊ दिले नाही, पाणीही दिले नाही. आमच्याबरोबर पोलीस व्हॅनमध्ये एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती. आंदोनस्थळी घेऊन जातो असे खोटे सांगितले. आश्रम शाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, जेवण निकृष्ट दर्जाचे असते, आरोग्याच्या सुविधा नाहीत, सरकारकडे सातत्याने मागण्या करूनही केवळ आश्वासन दिले जाते असे सांगितले.
मुंबईत आमची राहण्याची सोय नाही, हॉटेलमध्ये राहण्याऐवढे पैसे नाहीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहण्याची व्यवस्था केली म्हणून काँग्रेस कार्यालयात आलो, मुख्यमंत्री महोदयांनी राहण्याची व्यवस्था केली असती तर तिकडे गेलो असतो असेही एका विद्यार्थ्यांने सांगितले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन उपस्थित होत्या.
काँग्रेसच्या नेत्यांकडून तीव्र निषेध
पोलिसांच्या दडपशाहीचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड आदींनी याप्रकरणी पोलीस व राज्य सरकारवर कडाडून टीका करीत घटनेचा निषेध केला. (Tribal students rounded up at Tilak Bhavan)