जमीर काझी : मुंबई : भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत आहे. देशभरात सुरु असलेले हे षडयंत्र महाराष्ट्रातही आले असून ‘एसआयआर’च्या नावाखाली राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली आहेत, आयोग वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करत नाही, कोणतेही आकडे देत नाही. हे एक मोठे षडयंत्र असून मतदानाचा हक्क हिरावून घेत लोकशाहीचा गळा घोटण्याचा मोठा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी केला. (3.28 crore voters were deleted in the state)
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची आज मंगळवारी भेट घेतली. या शिष्टमंडळात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे उप नेते आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, अभिजीत सपकाळ आदी उपस्थित होते.
राज्यात १० कोटी मतदार हवेत
निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्यात मतदारांची संख्या ९ कोटी ७८ लाख होती, यातून ३ कोटी २८ लाख मतदारांना वगळले तर ६.५ कोटीच मतदार राहतात. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे तर प्रौढ लोकसंख्या १० कोटीच्यावर असल्याचे सरकार आकडे सांगतात, हे आकडे पाहता १० कोटी मतदार असायला हवेत पण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ते ६.५ कोटीच आहेत. सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील आकडे वेगवेगळे कसे. यातूनन निवडणूक आयोगाचा दुटप्पी कारभार व हलगर्जीपणा दिसत आहे. राज्यात गणेशोत्सवासह इतर सण व उत्सव असताना दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरची वेळ निवडणूक आयोगाने दिली आहे, ही वेळ तीन महिने वाढवून दिली पाहिजे पण निवडणूक आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. (3.28 crore voters were deleted in the state)
निवडणूक आयोग वगळलेल्या मतदारांची यादी लपवतय
ऍनामोली म्हणून ज्या १ कोटी २२ लाख मतदारांची नावे आहेत त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसा बजावलेल्या नाहीत. सर्व संशयित मतदारांचा ३ कोटी २८ लाखांचा डेटा प्रकाशित करायला हवा, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर, मतदारसंघ, बुथनिहाय ही यादी प्रसिद्ध करायला हवी पण तसे केलेले नाही. ही आकडेवारी निवडणूक आयोग का लपवून ठेवत आहे, काय गौडबंगाल आहे. एसआयआच्या माध्यमातून लाखो मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या देशभरातील कित्ता महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन उपमुख्यमंत्री गिरवत आहेत, हे महाराष्ट्रावरचे मोठे संकट आहे.
७५ लाख बोगस मतदारांच्या मदतीने महायुती सरकार आले
भाजपा महायुतीचे सरकार व्होट चोरीतून सत्तेवर आलेले आहे हे काँग्रेस पक्षाने अनेक उदाहरणे व पुराव्यासह देऊन जाहीरपणे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ, नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदार संघ यामध्ये कशा पद्धतीने व्होट चोरी करण्यात आली हे राहुल गांधी यांनी पुराव्यासह सांगितलेले आहे, त्यासंदर्भातील राहुल गांधी यांचा एक लेखही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केला होता. महाराष्ट्रात ४० लाख मतदार कसे वाढले हे पुराव्यासह दाखवण्यात आले होते. आताही ७५ लाख मतदारांचा ठावठिकाणा लागत नाही हे निवडणूक आयोगानेचे मान्य केले आहे, याच ७५ लाख बोगस मतदारांच्या मदतीने भाजपा महायुतीचे सरकार राज्यात आले आहे, असेही सपकाळ म्हणाले.
दुष्काळ जाहीर करण्यास मुहूर्त कशाला?
राज्यातील बहुतांश भागात गंभीर दुष्काळी परिस्थिती दिसत असताना सरकार मात्र सर्वे करण्यावर अडून बसले आहे. ५ ऑक्टोबरनंतर सर्वेचे आदेश देणार असे सरकार सांगत आहे. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला पण महाराष्ट्र सरकार अजून निर्णय घेत नाही. सरकसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा, केंद्र सरकारकडून अधिकची मदत जरूर आणा, पण राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी ७८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तो निधी शेतकऱ्यांसाठी वापरा, असे त्यांनी सांगितले
पक्षप्रवेशासाठी भाजपाकडून ब्लॅकमेलिंग
माजी आमदार राहुल बोंद्रे यांना राहुल गांधी यांनी फोन करून पक्ष न सोडण्याचे आवाहन केले, त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्ष म्हणजे परिवार, ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भूमिका आहे. मुद्दा एका नेत्याचा नाही तर भाजपा ब्लॅकमेल करून, धमकी देऊन पक्षप्रवेश करून घेतो हे सातत्याने दिसून आले आहे. वन नेशन, वन पार्टी हा त्यांचा डाव आहे. अशा पद्धतीच्या दंडेलशाहीचा सर्वांनी विरोध केला पाहिजे. खोटे गुन्हे दाखल करून विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. राज्यातही पक्ष फोडणारी गँग असून या प्रवृत्तीचा धिक्कार केला पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.
साहिल वाकोडेच्या कुटुंबासोबत काँग्रेस
आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याने आत्महत्या केली, हा पहिलाच प्रकार नाही तर याच संस्थेत याआधी अशा तीन घटना घडल्या आहेत. साहिल वाकोडे या विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे हे दिसून आले म्हणूनच पोलिसांनी ऍट्रॉसीटीचा गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्ष साहिल वाकोडेच्या परिवाराबरोबर आहे. देशभरात १८० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, देशातील शैक्षणिक धोरणात मोठ्या उणिवा आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलले पाहिजे, नवीन शिक्षणमंत्र्यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. (3.28 crore voters were deleted in the state)