जमीर काझी : मुंबई : दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयकल्लोळ कायम असतानाच त्यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचेही हेलिकॉप्टर लँडिंगवेळी हवेत भरकटण्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील खानवडीत शनिवारी घडली. गोंधळलेल्या वैमानिकाने हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी चक्क कार पार्किंगच्या जागेत उतरवले. त्यामुळे आणखी गोधळ उडाला. सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली.
दरम्यान, याबाबतच्या हलगर्जीपणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. (Chhagan Bhujbal’s helicopter also went off course)
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खानवडी येथे ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळे’च्या उद्घाटन होते. या कार्यक्रमासाठी मंत्री भुजबळ यांच्या आगमनासाठी प्रशासनाकडून हेलिपॅडची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, हेलिकॉप्टर येताच पायलटने नियोजित हेलिपॅडवर न उतरता थेट पार्किंगच्या जागेत हेलिकॉप्टर उतरवले. हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाहनधारकांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांसाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही अप्रिय घटना घडली नाही किंवा मोठे नुकसान झाले नाही. भुजबळ हेलिकॉप्टरमधून बाहेर आल्यानंतर पार्किंगमध्ये उतरवलेलं हेलिकॉप्टर हे पुन्हा मूळ हेलिपॅडकडं नेण्यात आले. (Chhagan Bhujbal’s helicopter also went off course)
हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी का उतरवण्यात आले?, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. प्रशासनाकडून याची दखल घेतली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, छगन भुजबळ यांनी नियोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. महात्मा ज्योतिबा फुलेच्या स्मृती स्थळास अभिवादन करुन शाळेचं उद्घाटन पार पडले . मात्र, हेलिकॉप्टर वाहन पार्किंगच्या जागेवर उतरल्यामुळे एकूणच सुरक्षा व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत .
हेलिपॅड असल्याचा समज – दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागेत फारशा गाड्या नव्हत्या. त्यामुळं ती जागा हेच हेलिपॅड असल्याचा समज होऊन पायलटनं तिथं हेलिकॉप्टर उतरवल्यांचे सांगण्यात येत आहे. (Chhagan Bhujbal’s helicopter also went off course)