Home » Blog » राहुल गांधी, दलित किचन्स आणि देश समजून घेण्याचा प्रयत्न…

राहुल गांधी, दलित किचन्स आणि देश समजून घेण्याचा प्रयत्न…

राहुल गांधी, दलित किचन्स आणि देश समजून घेण्याचा प्रयत्न...

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi

– विजय चोरमारे

धर्म समजून घेण्याच्या मार्गांमध्ये अन्न हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. धर्म आणि अन्न यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणात बदलतात आणि अनेकदा खूप गुंतागुंतीचे असतात. हेच समजून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करीत आहेत. कोणत्याही समाजघटकाचे जगणे त्याच्या खाद्यसंस्कृतीमधूनच समजून घेता येते, या जाणिवेतून कोल्हापूर दौऱ्यामध्ये त्यांनी एका टेम्पोचालकाच्या घरी स्वयंपाक बनवून भोजन केले. राहुल गांधी अनेक मार्गांनी देश समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत, त्यातलाच हा एक मार्ग असल्याचे त्यांच्या निकवर्तीयांकडून सांगण्यात आले.

‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे शाहू पाटोळे यांचे बहुचर्चित पुस्तक असून त्याचा ‘दलित किचन्स ऑफ मराठवाडा’ या नावाने भूषण कोरगावकर यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे. काही आठवड्यांपूर्वी हे पुस्तक वाचनात आल्यानंतर राहुल गांधी यांचे त्यासंदर्भातील कुतूहल वाढले होते. कोल्हापूरजवळ एका टेम्पोचालकाच्या थेट स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक बनवण्याचा आणि जेवण करण्याचा प्रयोग त्यातूनच आकाराला आला. पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे आणि राहुल गांधी यांची टीम एवढेच यावेळी उपस्थित होते. या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ एक-दोन दिवसांत राहुल गांधी यांच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. त्यामध्ये कोल्हापूरलगतच्या उचगाव येथील अजय सनदे या टेम्पोचालकाच्या घरी त्यांनी दिलेली भेट आणि तेथे स्वतः स्वयंपाक करून भोजन केल्याची घटना विशेष चर्चेची ठरली. यावेळी स्वयंपाकघरात सनदे यांच्या कुटुंबातील चार व्यक्ती, राहुल गांधी, शाहू पाटोळे आणि राहुल गांधी यांच्यासोबतची टीम एवढेच लोक होते. काँग्रेसचे अन्य नेते वेगळ्या खोलीत वाट पाहात बसले होते.

शाहू पाटोळे हे प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) मधून निवृत्त झालेले अधिकारी असून त्यांची विविध विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. ईशान्य भारतात त्यांनी अनेक वर्षे नोकरी केली. ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे त्यांचे दलित खाद्यसंस्कृतीवर प्रकाश टाकणारे महत्त्वाचे पुस्तक आहे. ‘दलित किचन्स ऑफ मराठवाडा’ हा त्याचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाल्यामुळे देशभर त्याचा प्रसार झाला आहे. उचगावच्या सनदे कुटुंबीयांकडे राहुल गांधी यांनी जाण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचा दुवा ठरले. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी कमालीची गुप्तता पाळून या भेटीचे नियोजन केले होते.

पुस्तक वाचल्यानंतर राहुल गांधी यांच्या टीमने शाहू पाटोळे यांच्याशी संपर्क साधला होता. सुमारे दोन महिन्यांपासून ते संपर्कात होते आणि कोल्हापूर दौरा निश्चित झाल्यानंतर भेटावयाचे ठरले होते. मराठवाड्यात राहणाऱ्या पाटोळे यांच्यासाठी वाहन व्यवस्थाही करण्यात येणार होती, परंतु त्यांनी ती नाकारली आणि हे सामाजिक काम असल्यामुळे स्वतःच्या खर्चाने ते कोल्हापुरात आले.

राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा आधी दोन दिवसांचा ठरला होता. चार तारखेला ते मुक्कामाला येणार होते. आणि पाच तारखेला सकाळी लवकर स्वयंपाकाचा हा कार्यक्रम होणार होता. परंतु दौऱ्यात अचानक बदल झाल्यामुळे विमानातून उतरल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा हा कार्यक्रम केला. पूर्वनियोजित वेळेनुसार सुमारे चाळीस ते पन्नास मिनिटांचा हा कार्यक्रम ठरला होता. परंतु राहुल गांधी यांनी सनदे कुटुंबीयांशी तसेच शाहू पाटोळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली, त्यामुळे वेळ वाढत गेला. टीमने त्याची जाणीव करून दिल्यावर राहुल गांधी यांनी वेळेचे बंधन नको, असे सांगितले. दलित खाद्य संस्कृतीसंदर्भात त्यांनी माहिती घेतली. तसेच पाटोळे हे ईशान्य भारतात अनेक वर्षे राहिल्यामुळे ईशान्य भारतासंदर्भातही चर्चा झाली.

राहुल गांधी यांनी स्वतः भाज्या निवडल्या. धुऊन घेतल्या. कुकर लावला आणि स्वयंपाक केला. अजय सनदे यांच्या पत्नी अंजली सनदे यांनी भाकरी घातल्या. नवरात्र असल्यामुळे शाकाहारी भोजनाचा बेत करण्यात आला होता. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, हरभरा डाळ आणि कांद्याच्या पातीची भाजी आणि तुरीची डाळ आणि वांगे अशा तीन भाज्या राहुल गांधी यांनी बनवल्या. मूळ चवीसाठी शेंगदाणा कूट आणि लाल चटणी शाहू पाटोळे घेऊन आले होते. अंजली सनदे यांनी खर्डा करून दिला, परंतु तो तिखट असल्याने त्रास होईल म्हणून न खाण्याचा सल्ला दिला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00