Home » Blog » शिवसेना शिंदे गटात घराणेशाहीचे लोण!

शिवसेना शिंदे गटात घराणेशाहीचे लोण!

by प्रतिनिधी
0 comments
Nepotism in the Shiv Sena Shinde group

जमीर काझी :  मुंबई  : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोणताही धोका न पत्करता नेत्यांच्या मुला-मुलींना आणि त्यांच्या नातलगाना मैदानात उतरवले आहे. विजयाची जास्ती जास्त खात्री असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामध्ये शिंदे गटाने आठ विद्यमान आमदार- खासदारांच्या कुटूंबियात तिकीट दिले आहे. तर भाजपाने विद्यमान लोकप्रतिनिधीच्या कुटूंबियांना थेटपणे उमेदवारी देण्याचे टाळले आहे. त्याऐवजी त्यांचे अन्य नातेवाईक आणि माजी आमदार- खासदाराच्या मुलामुलींना तिकीट दिले आहे. (Nepotism in the Shiv Sena Shinde group)

 काही वर्षांपूर्वीपर्यत विरोधकांकडून काँग्रेसवर घराणेशाहींबद्दल टीका केली जात होती. मात्र आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये ही घराणेशाही पाहायला मिळत आहे. नगरपालिका निवडणुकीत नांदेडमधील लोहा नगरपालिकेत चक्क एकाच घरातील सहा जणांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्याबाबत सोशल मीडियावरून जोरदार टीका झाली. निवडणुकीत त्या सर्व सहा जणांचा पराभव झाला.त्यानंतर भाजपने महापालिका निवडणुकांत’ यु टर्न’ घेत आमदार, खासदार आणि मंत्र्‍यांच्या मुलांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला. या नेतेमंडळींच्या नातलगांना मैदानात उतरवले आहे. तर, दुसरीकडे शिंदेंच्या पक्षातील आठ आमदार, खासदारांची मुले आणि नातेवाईकांना मुंबईत उमेदवारी दिली आहे. . ठाकरेंच्या शिवसेनेवर घराणेशाही आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले असे म्हणत टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आपल्याच पक्षात घराणेशाही पुढे नेल्याचे पाहायला मिळत आहे. (Nepotism in the Shiv Sena Shinde group)

मुंबईत वॉर्ड क्रमांक १९१ मधून माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव-सरवणकर यांना तर वॉर्ड क्रमांक १६९ मधून आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर यांना तिकीट दिले आहे. तसेच, चांदिवलीमधून वॉर्ड क्रमांक १६३ मधून आमदार दिलीप लांडे यांची पत्नी शैला लांडे यांना तर चेंबूरमधून वॉर्ड क्रमांक १५३ मधून आमदार तुकाराम काते यांची सून तन्वी काते यांना उमेदवारी दिली आहे. अणुशक्ती नगर वॉर्ड क्रमांक १४६ मधून आमदार तुकाराम काते यांची सून समृद्धी काते यांना मैदानात उतरवले आहे. भांडुप वॉर्ड ११३ मधून आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रुपेश पाटील यांना तर जोगेश्वरी पूर्व वॉर्ड ७३मधून खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्या दिप्ती वायकर यांना उमेदवारी दिली आहे.  धारावीतून वॉर्ड क्रमांक १८३ मधून शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली नयन शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे. प्रामुख्याने ८ जणांच्या कुटुंबातील सदस्यांना शिवसेनेनं तिकीट दिलं आहे. यासह अनेक ठिकाणी माजी नगरसेवक आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकांच्या घरातच उमेदवारी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. (Nepotism in the Shiv Sena Shinde group)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00