Home » Blog » Four-way fight in Tasgaon Municipality : तासगाव नगरपालिकेत चौरंगी लढतीने प्रचार शिगेला

Four-way fight in Tasgaon Municipality : तासगाव नगरपालिकेत चौरंगी लढतीने प्रचार शिगेला

by प्रतिनिधी
0 comments
Four-way fight in Tasgaon Municipality

दत्तात्रय पिसाळ : तासगाव : सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच यंदा पालिका निवडणुकांमध्ये मोठ्या चुरशीचा सामना होत असून प्रथमच चौरंगी लढत असल्याने कोण जिंकणार आणि कोण हरणार याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की नगराध्यक्ष निवडणुकीत कोण कुणाची किती मते खाणार यावरच नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होईल त्यामुळे या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची मोठ्या प्रमाणात शक्यता व्यक्त केली जात आहे.

चौरंगी लढतीने अर्थकारणाला गती

यापूर्वीच्या निवडणुकीत पारंपारिक आर. आर. पाटील गट विरुद्ध संजय काका पाटील गट असा सामना झाला आहे त्यामध्ये यापूर्वी संजय काका पाटील गट यशस्वी ठरला. यंदाही अशीच लढत होईल असे चित्र असताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये आपल्याला जाणीवपूर्वक डावलले गेले म्हणून आर. आर.  पाटील गटाच्या अजय पाटील यांनी काडीमोड घेत अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष प्रचारात सोशल मीडिया व अन्य माध्यमातून जोरदार मुसंडी मारली तर संजय काका गटाने आपल्याला पैशांसाठी डावलले असा आरोप करीत महादेव पाटील यांनी विरोधात भूमिका घेतली.त्यातच भाजपाने आपल्या पक्षाची तासगाव शहरात पाळेमुळे रुजावी म्हणून स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.यामुळे यंदाची तासगाव येथील ही निवडणूक चौरंगी बनली आणि अखेरच्या टप्प्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.त्यातूनच अर्थकारणाला मोठी गती मिळाली आहे. (Four-way fight in Tasgaon Municipality)

संजयकाका पाटील, आमदार रोहित पाटील यांचा घरोघरी प्रचार

प्रत्येक पॅनल तर्फे आम्हीच निवडणूक जिंकणार असा दावा केला जात आहे. संजय काका गटाने स्वाभिमानी आणि वंचित आघाडी स्थापून त्यामार्फत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.गेल्या पाच वर्षात विकास कामांचा डोंगर उभारला आहे आणि त्या विकास कामांची चावी नागरिकांच्या हातात देत आहोत असा चित्ररुपी लेखाजोखा संजय काका यांनी सादर केला आहे.त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनीही प्रत्येक प्रभागात जाऊन प्रचार मोहीम राबवली तर आर आर पाटील गटाचे सर्वेसर्वा आमदार रोहीत पाटील यांनी मतदारांना परिवर्तनाची साद घातली आहे.यावेळी सत्ता द्या आणि तासगाव राज्यातील सर्वात चांगले शहर बनविण्यासाठी मोठा निधी खेचून आणू अशी ग्वाही आमदार रोहीत पाटील यांनी दिली आहे.त्यांनी कोपरा सभा आणि घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. तसेच माजी आमदार सुमनताई पाटील,स्मिता पाटील यांच्यासह आर आर आबांचे सर्व कुटुंबिय प्रचारात उतरले. एक दिवस प्रत्येक प्रभागात मुक्काम अशी टॅग लाइन करीत रोहीत पाटील यांनी प्रचारात मोठी मुसंडी मारली. (Four-way fight in Tasgaon Municipality)

‘आमची नियत स्वच्छ’ टॅगलाईने अजय पाटील याचा प्रचार

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या अजय पाटील यांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून  शहर विकासात तासगाव आघाडीवर नेऊ यावर प्रचारात भर दिला आहे.आमची नियत स्वछ अशी टॅग लाइन घेत तासगावचा स्वाभिमान जपण्यासाठी आम्हाला साथ द्या असे आवाहन अजय पाटील यांनी केले आहे त्यांना संदीप गिड्डे पाटील  यांची मोठी साथ मिळाली.

भाजपकडून धनशक्ती वि. जनशक्तीचा मुद्दा

भाजपाने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा मुद्दा मांडत प्रचारात आघाडी घेतली आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्यांच्याकडे राज्य किंवा देशाची सत्ता नाही ते शहराच्या विकासासाठी निधी आणूच शकत नाही असे सांगत तासगाव येथील पैशाचे राजकारण मोडीत काढण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करा असे त्यांनी आवाहन केले आहे. (Four-way fight in Tasgaon Municipality)

क्रॉस व्होटिंगमुळे धाकधूक

एकूणच नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक स्वाभिमानी आणि वंचित आघाडीच्या उमेदवार विजया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वासंती सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्योती पाटील, भाजपच्या विद्या चव्हाण यापैकी कोण जिंकणार याबाबत कमालीची उत्सुकता असून विजयी होणारा उमेदवार फार मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होणार नाही असे सांगितले जात आहे तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आपण 14 ते 16 जागा जिंकून बहुमत आम्हीच मिळवू असा दावा चारही आघाड्या करीत आहेत त्यामुळे येत्या बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कुणाचा दावा वास्तवात येईल हे स्पष्ट होईल तसेच ही निवडणूक पक्षीय किंवा गटापेक्षा व्यक्ती पाहून झाली का हेही कळणार आहे.त्यातूनच क्रॉस व्होटिंग झाले का याचाही फैसला ठरणार आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00