मुंबई : विशेष प्रतिनिधी : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना शपथ दिली. देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. (Governor took Oath)
महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रपतींनी आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. (Governor took Oath)
यावेळी मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. भारतीय नौदलातर्फे मानवंदनाही देण्यात आली. (Governor took Oath)
शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी तसेच इतर कुटुंबीय, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, मुख्य सचिव राजेश कुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनिषा म्हैसकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.
२०१९ पासून आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी ते २०१५ ते २०१९ या कालावधीत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.