Home » Blog » Braille Book : शाहूंचे कार्य ब्रेल पुस्तिकेतून पोहोचवण्याचे प्रयत्न अनुकरणीय

Braille Book : शाहूंचे कार्य ब्रेल पुस्तिकेतून पोहोचवण्याचे प्रयत्न अनुकरणीय

विक्रम रेपे निर्मित पुस्तकाचे खासदार शाहू छत्रपतींकडून कौतुक

0 comments
Braille Book

कोल्हापूर : प्रतिनिधी : विक्रम रेपे आणि त्यांच्या मित्र परिवाराने सामाजिक जाणीवेच्या भावनेतून अंध व्यक्तींपर्यंत शाहू महाराजांचे जीवनकार्य पोहोचविण्यासाठी केलेला ब्रेल पुस्तिकेचा प्रयत्न अनुकरणीय आहे, असे कौतुक खासदार शाहू छत्रपती यांनी केले.  अंध विद्यार्थ्यांना विविध विषयांतील ज्ञान देण्यासाठी अशा अनेकानेक उपक्रमांची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी ऑडिओबुक्सही करता येऊ शकतील, अशी सूचनाही त्यांनी केली. (Braille Book)

राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन प्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने विक्रम रेपे संकल्पित ‘राजर्षी शाहू महाराज ब्रेल पुस्तिके’चे प्रकाशन खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झाले.  या वेळी प्र कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला. (Braille Book)

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी दृष्टीहीन व्यक्तींपर्यंत राजर्षी शाहूंचे कार्य पोहोचविण्याच्या दृष्टीने ब्रेल पुस्तिकेचा उपक्रम अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर पुरालेखागाराचे अभिलेखाधिकारी गणेशकुमार खोडके म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक यांसह सर्वच क्षेत्रांतील कार्य महान आहे. त्यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमांची माहिती आजही लोकांना नाही. महाराजांनी हत्तींची पैदास करण्यासाठी खास निर्माण केलेले शिवारण्य, चहा-कॉफीच्या मळ्यांचा यशस्वी प्रयोग, संस्थानात ठिकठिकाणी उभारलेली अंबाबाईची मंदिरे आदी बाबी अज्ञातच आहेत. महाराजांचा वारसा सांगत असताना आपण त्यांचे चरित्र अंगिकारणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. (Braille Book)

मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी शाहू महाराजांच्या चरित्राचा व कार्याचा सविस्तर वेध घेतला. ते म्हणाले, शाहू महाराज हे प्रत्येक नागरिकाला एक वेगळी जीवनदृष्टी प्रदान करणारे व्यक्तीमत्त्व आहे. दीनदुबळ्यांना माणुसकीची वागणूक देणारे आणि सर्वंकष मानवी विकासाची नवी परिभाषा निर्माण करणारे शाहू महाराज होते. महाराजांच्या जीवनचरित्रामधून सातत्याने विकासाची नवी दृष्टी मिळत राहते. (Braille Book)

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सदैव सहानुभूतीचा दृष्टीकोन बाळगला आहे. विशेषतः दृष्टीहीन व्यक्तींसाठी रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड या केंद्रामार्फत त्यांच्यासाठी अनेकविध उपक्रम राबविले जातात. अंध विद्यार्थी हे प्रयोगपद्धतीमुळे विज्ञानाच्या शिक्षणापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन वैज्ञानिक प्रयोग कसे करावेत, यासाठीचे प्रशिक्षण शिबीरही विद्यापीठ घेते. अंध विद्यार्थ्यांना बुद्धीबळाचे प्रशिक्षण देऊन असे दहा विशेष संचही त्यांना प्रदान केले आहेत. आता लवकरच त्यांच्या स्पर्धा भरविण्याचाही मानस आहे. (Braille Book)

यावेळी अंध विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात त्यांच्या हस्ते पुस्तिका प्रदान करण्यात आली. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विक्रम रेपे यांनी केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुरेश शिपूरकर, बाळ पाटणकर, वसंतराव मुळीक, डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. नमिता खोत, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. सचिन पवार, ‘नॅब’चे एम. बी. डोंगरे, भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री कासोटे -पाटील, डॉ. प्रतिभा देसाई, उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, विक्रम जरग यांच्यासह नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड्स, मिरजकर तिकटी अंधशाळा, अंध युवक मंच या संस्थांचे संचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुस्तिकेचे राज्यातील सर्व अंधशाळांमध्ये वितरण

आज प्रकाशित करण्यात आलेल्या शाहूचरित्राच्या ब्रेल पुस्तिकेचे मुद्रक स्वागत थोरात यांच्याकडून येत्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील सर्व अंधशाळांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुस्तिकेचा हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचाही मानस संकल्पक विक्रम रेपे यांनी यावेळी व्यक्त केला. (Braille Book)

You may also like

error: Content is protected !!