शियामेन : सुदिरामन कप बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय संघाला मंगळवारी सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाने भारतावर ४-१ अशी मात केली. (India’s loss)
चीनमधील शियामेन येथे ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारताचा डेन्मार्ककडून १-४ असा पराभव झाल्यामुळे पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला इंडोनेशियाविरुद्ध विजय महत्त्वाचा होता. इंडोनेशियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीने विजय मिळवून आश्वासक सुरुवातही केली होती. भारताच्या ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो यांनी या सामन्यात इंडोनेशियाच्या रेहान कुशारजांतो-ग्लोरिया विद्जाजा या जोडीला १०-२१, २१-१८, २१-१९ असे नमवले. १ तास १० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर ध्रुव-तनिशा यांनी जोरदार पुनरागमन केले. पुढील सलग दोन गेम जिंकून विजयावर शिक्कामोर्तब करत त्यांनी भारताला १-० अशी आघाडीही मिळवून दिली. (India’s loss)
पुढील महिला एकेरीच्या सामन्यात मात्र इंडोनेशियाच्या पुत्री वार्दानीने पीव्ही सिंधूचा २१-१२, २१-१३ असा पराभव केला. सिंधूने केवळ ३८ मिनिटांमध्ये हा सामना गमावला. या स्पर्धेतील तिचा हा सलग दुसरा पराभव ठरला. तिसऱ्या पुरुष एकेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणाऱ्या जोनाथन ख्रिस्टीने एचएस प्रणॉयचे आव्हान १९-२१, २१-१४, २१-१२ असे परतावून लावले. सुमारे सव्वा तास रंगलेल्या या सामन्यात प्रणॉयने पहिला गेम जिंकून चांगली सुरुवात केली होती. पुढील दोन गेममध्ये मात्र त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. (India’s loss)
भारत १-२ असा पिछाडीवर पडल्यामुळे लढतीतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला महिला दुहेरीचा सामना जिंकणे आवश्यक होते. तथापि, लॅनी मायासरी-सिती रामधंती या इंडोनेशियाच्या जोडीने प्रिया कोंजेंगबाम-श्रुती मिश्रा या भारतीय जोडीला २१-१०, २१-९ असे पराभूत केले. या विजयानंतर इंडोनेशियाने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. अखेरच्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात महंमद फिक्री-डॅनिएल मार्थिन यांनी हरिहरन अम्साकरुणन-रुबेन रेंथिनासबापती या जोडीचा २२-२०, २१-१८ असा पराभव केला. भारताची या स्पर्धेतील अखेरची साखळी लढत १ मे रोजी इंग्लंडशी होणार आहे.
हेही वाचा :
वैभवची विक्रमांना गवसणी
भारताचा सलग दुसरा विजय