शियामेन : सुदिरामन चषक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सलामीच्या लढतीत डेन्मार्ककडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. पी. व्ही. सिंधू आणि एस. एस. प्रणॉय हे भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीच्या सामन्यांत पराभूत झाले. (India at Sudiraman)
चीनमधील शियामेन येथे या स्पर्धेस रविवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत भारत ड गटात आहे. या गटात भारताची सलामीची लढत डेन्मार्कशी झाली. पहिल्या सामन्यात भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिशा क्रॅस्टो या जोडीला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. डेन्मार्कच्या जेस्पर टॉफ्ट-ॲमेली मॅग्लुंड या जोडीने ध्रुव-तनिशा यांना अवघ्या ३३ मिनिटांत २१-१३, २१-१४ असे सहज नमवले. दुसऱ्या सामन्यात डेन्मार्कच्या आंद्रेस अँटॉन्सनने प्रणॉयचा ४९ मिनिटांमध्ये २१-१५, २१-१६ असा पराभव केला. (India at Sudiraman)
सुरुवातीच्या दोन पराभवांनंतर या लढतीतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकणे आवश्यक होते. मात्र, पुरुष दुहेरीच्या या सामन्यात हरिहरन अम्साकरुणन-रुबेनकुमार रेथिनसबापती या भारतीय जोडीचा प्रतिस्पर्ध्यांसमोर निभाव लागला नाही. किम ॲस्ट्रप-आंद्रेस रॅसमसन या जोडीने हरिहरन-रुबेनकुमार यांना केवळ २१ मिनिटांत २१-७, २१-४ असे हरवले. त्यानंतर, महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने डेन्मार्कच्या लिन काएर्सफिल्टला कडवी लढत दिली. मात्र, अखेर ५२ मिनिटांच्या संघर्षानंतर लिनने हा सामना २२-२०, २३-२१ असा जिंकला. दोन्ही देशांतील अखेरच्या महिला दुहेरीच्या सामन्यात तनिशा क्रॅस्टो-श्रुती मिश्रा यांनी भारताला विजय मिळवून दिला. तनिशा-श्रुती यांनी नताशा अँथनीसन-अलेक्झांड्रा बोए या जोडीला २१-१३, २१-१८ असे ३३ मिनिटांमध्ये पराभूत केले. (India at Sudiraman)
या पराभवानंतर भारत या गटात तिसऱ्या स्थानी आहे. भारताची पुढील लढत २९ एप्रिल रोजी इंडोनेशियाशी होणार आहे.
हेही वाचा :
‘जुना बुधवार’ चे पहिलेवहिले विजेतेपद