क्वालालंपूर : भारताच्या एचएस प्रणॉय, सतीशकुमार करुणाकरन, किदाम्बी श्रीकांत आणि आयुष शेट्टी या बॅडमिंटनपटूंनी मलेशिया मास्टर्स स्पर्धेमध्ये विजय नोंदवले. महिला एकेरीत मात्र भारताच्या पीव्ही सिंधू, उन्नती हुडा आणि आकर्षी कश्यप या पहिल्या फेरीतच पराभूत झाल्या. (Prannoy)
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये प्रणॉय आणि सतीशकुमारचे विजय सर्वांत सनसनाटी ठरले. त्याने जपानच्या पाचव्या मानांकित केंता निशिमोतोला १९-२१, २१-१७, २१-१६ असे पराभूत केले. ही लढत १ तास २२ मिनिटे रंगली. या सामन्यात प्रणॉयने पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत सलग दोन गेम जिंकून विजय निश्चित केला. दुसऱ्या फेरीत प्रणॉयचा सामना जपानच्याच युशी तानाकाशी होणार आहे. सतीशकुमारने सलामीच्या सामन्यात तैवानच्या तृतीय मानांकित तिएन चेन चोऊला अवघ्या ३९ मिनिटांत २१-१३, २१-१४ असे नमवले. जागतिक क्रमवारीत सतीशकुमार ५१ व्या, तर चोऊ तिसऱ्या स्थानी आहे. पुढील फेरीत सतीशचा सामना फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोव्हशी होईल. (Prannoy)
श्रीकांतने पहिल्या फेरीत चीनच्या सहाव्या मानांकित लू गुआंग झू याला ५७ मिनिटांमध्ये २३-२१, १३-२१, २१-११ असे हरवले. पुढील फेरीत तो आयर्लंडच्या न्हॅट एन्गुएनशी होईल. आयुषने कॅनडाच्या ब्रायन यँगवर एक तास रंगलेल्या लढतीमध्ये २०-२२, २१-१०, २१-८ अशी मात केली. पुढील फेरीत तो फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोवविरुद्ध खेळेल. महिला एकेरीमध्ये व्हिएतनामच्या थूयलिन्ह एनग्युएनने सिंधूचा तीन गेममध्ये २१-११, १४-२१, २१-१५ असा पराभव केला. सिंगापूरच्या नवव्या मानांकित पुत्री वर्दिनीने आकर्षीला २१-९, २१-८ असे सरळ गेममध्ये नमवले. तैवानच्या सिआंग ती-लिनने उन्नतीवर ४३ मिनिटांमध्ये २१-१२, २२-२० अशी मात केली. (Prannoy)
दरम्यान, मिश्र दुहेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी बुधवारचा दिवस संमिश्र ठरला. ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो या भारतीय जोडीने सिंगापूरच्या अदनान मौलाना-इन्दाह जमिल या जोडीचा २१-१८, १५-२१, २१-१४ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्यांच्यासमोर फ्रान्सच्या ज्युलियन मायो-लिआ पेलेर्मो या जोडीशी होईल. सतीश-आद्या वारियाथ या जोडीला इंडोनेशियाच्या व्हेरेल मुलिया-लिसा कुसुमावती या जोडीने २१-१५, २१-१६ असे पराभूत केले. चीनच्या चौथ्या मानांकित शिन वा गुओ-फेंग हुई चेन यांनी रोहन कपूर-ऋत्विका शिवानी गड्डे यांचा २१-१०, २१-१४ असा पराभव केला.
हेही वाचा :
आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला