Home » Blog » थोडा हैं, थोडेकी जरुरत है…

थोडा हैं, थोडेकी जरुरत है…

६३ वे महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Drama Competition

प्रा. प्रशांत नागावकर :  ‘आणि कुंभाराचं काय झालं?’ हे दोन अंकी नाटक गडहिंग्लज कला अकादमी या संस्थेने चांगल्या पद्धतीने सादर केले. प्रा. शिवाजी पाटील हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. पाटील हे अत्यंत उत्साही आणि हरहुन्नरी कलाकार. आपल्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजे गडहिंग्लजमध्ये मोठ्या कष्टाने आणि प्रयत्नपूर्वक नाट्यकला पुन:श्च रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत जवळजवळ ४० वर्षानंतर गडहिंग्लजचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत तीन वेळा राज्य नाट्यमध्ये सहभाग नोंदवला आहे. (Drama Competition)

आणि कुंभाराचं काय झालं? हे नाटक चांगल्या पद्धतीने सादर झाले. सादरीकरणात उत्स्फूर्तता आणि प्रामाणिकपणा असला तरी एका सशक्त संहितेचे सादरीकरण करताना एवढ्याच गोष्टी पुरत नाहीत. त्यामुळे ‘थोडा है, थोडे की जरुरत है,’ असे या नाटकाच्या बाबतीत म्हणता येईल.

कोल्हापुरातील नाट्यलेखक, कवी, कथा-कादंबरीकार आणि पत्रकार जयसिंग पाटील यांचे हे महत्त्वाचे नाटक. मंत्रक हा एकांकिका संग्रह त्यांच्या नावावर आहे. अनेक नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. अलीकडेच त्यांची ‘नामशेष होणारा माणूस,’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. कोल्हापुरातील साहित्य लेखन परंपरेतील तिसऱ्या पिढीतील एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

व्यंकटेश माडगूळकर यांची ‘वेडा कुंभार’ या कथेतील व्यक्तिरेखेच्या पुढच्या पिढीची कथा जयसिंग पाटील यांनी नाट्यरूपात मांडली आहे. थोडक्यात ‘आणि कुंभाराचं काय झालं’ हे नाटक व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेच्या पुढच्या पिढीचे नाटक आहे. २००१ साली हे नाटक कोल्हापूरच्या टीएफटी नाट्यसंस्थेच्या वतीने सादर झाले होते.  २००७ ला या नाटकाची संहिता पुस्तक रूपाने प्रकाशित झाली.

मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर ओबीसी समाजात आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. सर्वच क्षेत्रात आरक्षणामुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. विशेषतः राजकारणात त्याचे सकारात्मक परिणाम जाणवले.  आतापर्यंत राजकारणामध्ये मराठा समाजाचे प्राबल्य दिसत होते. मंडल आयोगानंतर ओबीसींना संधी मिळाली. त्याचे प्रतिबिंब या नाटकात पाहायला मिळते. (Drama Competition)

व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेतील म्हातारा कुंभार या नाटकात आहे. तो जख्ख म्हातारा झाला आहे. राजकारणाने बदलत जाणारा गाव आणि उद्ध्वस्त होणारी नाती तो तटस्थपणे बघत सरपट जगत असतो. जातीय राजकारण नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. मागे उल्लेख केल्याप्रमाणे ग्रामीण भागातील राजकारणाचे केंद्र मराठा समाजापासून दुरावत जात ओबीसींकडे सरकत चालले आहे.

नाटकात अण्णा ही प्रमुख व्यक्तिरेखा आहे. हा म्हाताऱ्या कुंभाराचा नातू. काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय पूर्ण मोडीत निघाला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या पैशातून सुरू केलेले हॉटेल तो चांगल्या पद्धतीने चालवत असतो. त्याच्या जीवावर तो आपल्या भावांना शिकवतो. एकाला नोकरी लावतो तर दुसऱ्या भावाला बियर बार काढून देण्याच्या तयारीत असतो. गावात काही ठिकाणी प्लॉट घेतले आहेत. सरपंच होण्यासाठी धडपड सुरू आहे, पण त्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत त्याच्या पत्नीला तिकीट मिळते. निवडणुकीत अण्णांचे सारे घर राबते. यांत प्रचंड पैसा खर्च करतो. परिणामी अण्णांची बायको निवडून येते. पण यामध्ये अण्णांच्या मधल्या भावाचा, बापूचा बळी जातो.

भावाचा खून आणि आपल्या बायकोचे राजकारणात वाढत चाललेले वजन यातून अण्णांचा अहंकार दुखावतो. तो दारूच्या आहारी जातो. नवरा बायकोचे सतत खटके उडू लागतात. तुका नोकरीच्या मागे न लागता हॉटेल सांभाळतो. हळूहळू घर उद्ध्वस्त होत जातं, हे सारे तटस्थपणे पाहणाऱ्या म्हाताऱ्याचे निधन होते. एका अर्थी कुंभाराच्या घराण्याचा वंश थांबतो. कुंभार घराची, पर्यायाने समाजाची पडझड या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. या नाटकाच्या माध्यमातून कुंभार समाजाचे पर्यायाने ओबीसी समाजाचे चित्रण पहिल्यांदा मराठी नाटकात आले.

नाटकाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील कोल्हापुरी भाषा. कलाकारांनी नेमकेपणाने ती पकडली आहे. विशेषतः गडहिंग्लजसारख्या मराठी-कन्नड भागातल्या कलाकारांनी ही भाषा जाणीवपूर्वक आत्मसात केल्याचे दिसून येते. या नाटकात अनेक व्यक्तिरेखा आहे. आपापल्या वाट्याला आलेली भूमिका सर्वांनीच उत्तमपणे निभावली आहे. दत्ता सुतार यांनी तुकाची व्यक्तिरेखा अतिशय तन्मयतेने उभी केली आहे.

रामय्या हिरेमठ यांनी अण्णा आपल्या पद्धतीने उभा केला आहे. राजकारणाला गरजेचा असलेला बेरकीपणा त्यांनी समर्थपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आपल्यापेक्षा आपल्या पत्नीला राजकारणात खूप महत्त्व येत आहे, यातून आलेले नैराश्य दाखवताना मात्र ते काहीसे कमी पडतात. नैराश्यातून आलेली व्यसनाधीनता काही प्रसंगात दारू पिल्यानंतर त्याचे त्यांच्या हालचाली हास्यास्पद वाटतात. नैराश्यातून आलेली हातबलता नेमकेपणाने व्यक्त करू शकले नाहीत.  साहजिकच प्रेक्षकांची सहानुभूती मिळण्याऐवजी ते काही ठिकाणी हास्यास्पद ठरले आहेत.

प्रणोती कुमठेकर यांनी त्यांची भूमिका मात्र खूप चांगल्या पद्धतीने सादर केली.  नवऱ्याखाली आपलं अस्तित्व दबलं जात आहे, हे मान्य करून त्या पद्धतीने बुजरेपणाने जगणारी. आणि संधी मिळतात राजकारण समजून घेत स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना कळत नकळतपाने आणलेली बंडखोरीही त्यांनी तितक्याच ताकदीने व्यक्त केली आहे. अभिनयात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समतोल साधला आहे.

मीनाक्षी टेंबुकडे हिने मुक्ता रंगवत असताना उच्च शिक्षण घेऊनही आपले अस्तित्व आपल्याला सिद्ध करता येत नाही. त्याचबरोबर घरातील जाचामुळे आपल्याला आवडलेल्या मुलाशीही आपण नीट बोलू शकत नाही ही खंत अतिशय संयमितपणे सादर केली आहे. (Drama Competition)

अरुण पाटील यांनी बापू प्रामाणिकपणे सादर करण्याचा प्रयत्न केला. पण काही ठिकाणी आवाजाची पट्टी नको तितकी उंच केल्याने संवादफेक रसभंग करत होती.

वार्ताहरच्या छोट्याशा भूमिकेत दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी रंगतदारपणा आणला आहे. दिग्दर्शनाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळून त्यांनी केलेली भूमिका एकूण नाटकात रंगतदार बनली आहे.

तांत्रिक बाबतीत बोलायचे झाले तर नेपथ्य वास्तववादी स्वरूपाचे होते. कुंभाराचे घर उभा करण्यासाठी अनेक बारीकसारीक गोष्टींची अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली होती. ओबीसी समाजातील एका कुंभाराचे घर नेमकेपणाने उभारण्यात नेपथ्यकार यशस्वी ठरले आहेत.

प्रकाश योजना अनावश्यक अशी रंगीबेरंगी झाली. नाटकाचा आशय लक्षात घेता अशा प्रकाश योजनेची कितपत गरज होती?  हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे. तेच पार्श्वसंगीताच्या बाबतीत झाले आहे.  प्रसंगाला उठाव देणाऱ्या पार्श्वसंगीताची गरज असताना विनाकारण पाश्चिमात्य सुरावटीच्या संगीताचे तुकडे प्रसंग रसभंग करत होते.

नाटक :  …आणि कुंभाराचं काय झालं?

लेखक : जयसिंग पाटील

सादरकर्ते : गडहिंग्लज कला अकादमी

दिग्दर्शक, नेपथ्य : शिवाजी पाटील

प्रकाश योजना : रोहन घोरपडे

संगीत : शुभम चौगुले

वेशभूषा : सारिका पाटील, वैशाली पाटील

केशभूषा : गीता पाटील

रंगभूषा : विजय ढेरे

भूमिका आणि कलावंत (Drama Competition)

म्हातारा : आर्यन हरणे

आई : उर्मिला कदम

आण्णा : रामय्या हिरेमठ

बापू : अरुण पाटील

तुका : दत्ता सुतार

मुक्ता : मीनाक्षी टेंबुकडे

थोरली : प्रणोती कुमठेकर

मधली : सोनम धनुकटे

छोटी : संस्कृती पाटील

गणा : विजय टेंबुकडे

रंगा : संतोष बोरनाक

(छाया : अर्जुन टाकळकर)

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00