नवी दिल्ली : भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महिनाअखेरीस रंगणाऱ्या तिरंगी वन-डे मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर करण्यात आला. या संघामध्ये काशवी गौतम, एन. श्री चरणी, शुची उपाध्याय या नवोदित खेळाडूंची निवड झाल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. (Women’s Team)
हरमनप्रीत कौर या मालिकेसाठी पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत परतणार आहे. यापूर्वी, जानेवारी महिन्यात भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या वन-डे मालिकेत हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनाने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. हरमनप्रीतप्रमाणेच स्नेह राणा, यास्तिका भटिया, अरुंधती रेड्डी व अमनजोत कौर यांनीही संघामध्ये पुनरागमन केले आहे. रेणूका सिंह, पूजा वस्त्रकर आणि तितास साधू या वेगवान गोलंदाज मात्र दुखापतीमुळे तिरंगी मालिकेत खेळू शकणार नाहीत. विमेन्स प्रीमियर लीगमध्ये ९ डावांत ३०४ धावा करणाऱ्या शफाली वर्मालाही संघात स्थान मिळवता आलेले नाही. (Women’s Team)
मध्यमगती गोलंदाज असणाऱ्या २१ वर्षीय काशवीने यंदाच्या डब्ल्यूपीएलमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळताना ९ सामन्यांत ११ विकेट घेतल्या होत्या. एन. श्री चरणी आणि शुची उपाध्याय या दोघीही डावखुऱ्या फिरकीपटू आहेत. चरणीने डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना २ सामन्यांत ४ विकेट घेतल्या. शुचीने मागील वर्षी डिसेंबरमध्ये देशांतर्गत वरिष्ठ महिला वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये मध्य प्रदेशतर्फे ९ सामन्यांत १८ विकेट घेतल्या होत्या. मध्य प्रदेशला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारी शुची स्पर्धेत ती सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली होती. (Women’s Team)
संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काशवी गौतम, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, तेजल हसबनीस, एन. श्री. चरणी आणि शुची उपाध्याय.
- तिरंगी वन–डे मालिकेचे वेळापत्रक
- २७ एप्रिल – श्रीलंका वि. भारत
- २९ एप्रिल – भारत वि. द. आफ्रिका
- २ मे – श्रीलंका वि. द. आफ्रिका
- ४ मे – श्रीलंका वि. भारत
- ७ मे – भारत वि. द. आफ्रिका
- ९ मे – श्रीलंका वि. द. आफ्रिका
- ११ मे – अंतिम सामना
- (सर्व सामने प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे रंगतील.)
हेही वाचा :
विराट कोहली १३,००० पार