-संजीव चांदोरकर
तुमच्या सर्व प्रश्नांची मुळे दुसरीकडे म्हणजे जात, धर्म, प्रांत, वंश, राष्ट्र, स्थलांतरित … इत्यादी मध्ये आहेत “एक झालात तर सेफ राहाल” अशी मांडणी करणाऱ्या पक्ष, नेते, संघटना, व्यासपीठे यांना प्रस्थापित व्यवस्थेने उचलून धरले. हे वाटते तेवढे अमूर्त देखील नाही; व्यक्तींची नावे पब्लिक डोमेन मध्ये आहेतच. एलॉन मस्क काय मूर्ख आहे? स्वतःच्या मुलीच्या लग्नात राबतात तसा डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात राबायला?
जगातील अनेक देशात सामान्य नागरिक मतदार जुन्या परंपरागत नॅरेटिव्हना भीक घालत नाही हे दिसून आले. ते वैफल्यग्रस्त आहेत. एकूणच व्यवस्थेबद्दल अविश्वास आहे. अनेक देशात उजव्या, वंशवादी, फॅसिस्ट शक्तींचा वाढता प्रभाव आहे. पुढची लाट युरोपियन देशात येणार आहे. ती लाट एंट्रीसाठी विंगेत उभी आहे. ट्रम्पच्या एंट्रीची वाट बघत होती. अर्थातच हे काही एका वर्षात घडलेले नाही, अनेक दशकांची प्रक्रिया आहे ही. हे काही कोरोना व्हायरस सारखा कोठून तरी उद्भवून जगभर पसरलेले नाही ना परग्रहावरून उडत्या तबडकीवरून येऊन लोकांच्या कवटीत घुसले आहे. गेली ४० वर्षे जगातील अनेक देशात (विकसित आणि गरीब / विकसनशील दोन्ही) नवउदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानांवर आधारित धोरणे राबवली गेली. दोन्ही फिनॉमिनॉनची, नवउदारमतवाद आर्थिक तत्वज्ञान आणि उजव्या / फॅसिस्ट राजकीय शक्ती, फूटप्रिंट वैश्विक असेल तर त्यांच्यात काही जैविक संबंध असला पाहिजे !
गेल्या ४० वर्षात काय घडत गेले ?
अर्थव्यवस्थेतून शासनाने अंग काढून घेतले, कल्याणकारी योजनांचे टोकानिझम केले गेले, अर्थव्यवस्थांचे अनौपचारिकरण झाले, कामगार संघटनांचा बीमोड, अनौपचारिकरणामुळे / गिग इकॉनॉमी मुळे कष्टकरी / कामगार यांची वर्गीय ओळख पुसून टाकण्यात येते; प्रचंड असुरक्षिता, माझी नोकरी जाईल, मी आवाज उठवला तर गेटबाहेर उभ्या असणाऱ्याला नोकरी दिली जाईल यातून वैफल्य. त्याचवेळी प्रत्येक देशात १० टक्के विरुद्ध ९० टक्के असे ध्रुवीकरण झाले; वर्ग तर शेकडो वर्षे आधीपासून होते. पण हे वेगळे प्रकरण आहे. टोकाची आर्थिक विषमता. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने जागतिक एलिट तयार झाला. सामाजिक / आर्थिक विषमता आणि पर्यावरणाचे इश्यू आणणारे / आंदोलने करणारे विकास विरोधी , म्हणून जनविरोधी आहेत असे बिंबवण्याचे प्रयत्न झाले.
समाज सुट्या सुट्या माणसांचा बनलेला आहे, प्रत्येकाला स्पर्धा करायची आहे; स्पर्धेला बिचकणारी कमी कुवतीची माणसे आहेत. समोरच्या प्रत्येकाला स्पर्धक म्ह्णून बघायला लागल्यामुळे, कम्युनिटी फीलिंग लयाला गेले; स्पर्धा म्हटले की अल्पसंख्य जिंकणार आणि बहुसंख्य हरणार ओघाने आले. आणि त्यातून वैफल्य. शहरात जाऊन राहणे, इंटरनेट यातून उपभोगाच्या आकांक्षांना आग लावण्यात आली. पण त्यामानाने, अभ्यासाची, राबण्याची तयारी असून, नव्हे राबून नोकऱ्या / उत्पन्न मात्र मिळत नाही. यातून पुन्हा वैफल्य. हक्काच्या आरोग्य सेवा नाहीत कधीही, आपण, आपल्यातील कोणीही कधीही मरू शकतो ही भावना वाढत गेली. कोरोना काळात तर ही भावना अजून खोलवर गेली
मी धुळीचा कण देखील नाही, अशी भावना झालेली माणसे आयडेंटिटी शोधायला लागली; त्यातून जातपंचायत / धर्म / कुटुंब संस्था / राष्ट्र यात आयडेंटिटी दिसायला लागली. कारण ही आयडेंटी जन्मापासून कातडीवर गोंदलेली असते, फारसे काही करावे लागत नाही. ; आपल्या आयुष्यातील प्रश्नांना दुसरा कोणीतरी जबाबदार आहे, तो परजातीचा , परधर्माचा, दुसऱ्या वर्णाचा, भाषेचा, प्रांताचा आहे, मला नोकरी मिळत नाही याला सरकारची अर्थनीती नाही कोणी तरी स्थलांतरीत जबाबदार आहे हा विचार प्रयत्नपूर्वक रुजवला गेला; टू मच ऑफ डेमोक्रसी, टू मच ऑफ चर्चा, टू मच मानवतावादी लेक्चरिंग, अमेरिकेतील शब्द “वोकीझम” प्रस्थापित राजकारण्यांनी वाट लावली; आघाडी बिघाडी; यातून एक उत्तुंग व्यक्तिमत्व / ताकदीचा नेता असला पाहिजे ही भावना रुजवली गेली.
गेल्या चाळीस वर्षांत तयार झालेल्या आर्थिक, भौतिक, पर्यावरणीय प्रश्नांचा लोकांनी सिस्टीमकेंद्री विचार केला तर ते संघटित होऊ शकतील, कॉर्पोरेट / वित्त भांडवलाला आव्हान मिळू लागेल हे उमजून “तुमच्या सर्व प्रश्नांची मुळे दुसरीकडे म्हणजे जात, धर्म, प्रांत, वंश, राष्ट्र, स्थलांतरित … इत्यादी मध्ये आहेत. तुमची जी जन्मजात आयडेंटिटी आहे त्यावर “एक झालात तर सेफ राहाल” अशी मांडणी करणाऱ्या पक्ष / नेते / संघटना / व्यासपीठे यांना प्रस्थापित व्यवस्थेने उचलून धरले. हे वाटते तेवढे अमूर्त देखील नाही; व्यक्तींची नावे पब्लिक डोमेन मध्ये आहेतच ; एलॉन मस्क काय मूर्ख आहे ? स्वतःच्या मुलीच्या लग्नात राबतात तसा डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात राबायला?
ट्रम्प यांच्या निवडणुकीचा मैलाचा दगड
प्रौढ मतदानावर आधारित संसदीय लोकशाही प्रणाली प्रचलित असणाऱ्या सर्वच देशांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन आठवड्यापूर्वीच्या विजयाने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. याचे काही धागेदोरे आपल्या देशापर्यंत अगदी आपल्यापर्यंत येऊन पोचतात. आज नाही तर भविष्यात येऊन थडकतील.
संसदीय निवडणुकांच्या राजकारणात “मला निवडून द्या” सांगणाऱ्या उमेदवाराकडे शुद्ध व्यक्तिगत चारित्र्य असावे, सार्वजनिक जीवनात नैतिकता असावी असे संकेत आहेत. परंतु इथे तर आर्थिक गैरव्यवहार आणि संसदेवरील हल्ल्याला चिथावणी देण्यासारखे गंभीर आरोप असलेली व्यक्ती अर्ध्याहून अधिक मते (साडेसात कोटींहून जास्त ) घेऊन देशातील सर्वोच्च पदावर निवडून येते. याचा अर्थ कोट्यवधी मतदारांसाठी त्या उमेदवाराचे चारित्र्य नैतिकता हा मुद्दा बनलेला नाही. अब्जाधीश असून देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ कोटी मतदारांना पैसे वाटलेले नाहीत हे देखील नमूद करूया. आता या अण्णा हजारे टाईप लोकांचे काय करायचे ? मी नैतिकतेचा / स्वच्छ चारित्र्याचा आग्रह धरणाऱ्यांची खिल्ली उडवण्याच्या मूडमध्ये नाही. नैतिकतेचा आग्रह हा ज्यांची पर्सनल ट्रिप आहे त्यांना देखील मश्गुल राहू दे आपल्यात. मी खरा. लोक मूर्ख असे म्हणणाऱ्या लोकांना देखील जाऊदे पण माझ्या भूमिकेचा / आग्रहाचा प्रभाव का पडत नाही ? कोट्यवधी लोकांना आपले म्हणणे का पटत नाही ? हा प्रश्न ज्यांना पडतो (माझ्यासकट) त्यांच्यासाठी हे अंतर्मुख करणारे आहे.
“मेक अमेरिका ग्रेट अगेन” ही घोषणा डोनाल्ड ट्रम्प गेली दहा वर्ष देत आहेत. त्याला चांगले ट्रॅक्शन मिळाले हे निवडणुकीतून दिसत आहे. “आपले राष्ट्र आपल्याला सर्व जगात श्रेष्ठ बनवायचे आहे” या मांडणीमध्ये प्रचंड अपील आहे हे अधोरेखित झाले. राष्ट्र या संकल्पनेत अपील आहे. संकुचित विरुद्ध व्यापक या बायनरीच्या चिमटीत गोष्टी येत नाहीयेत.
स्वतः अब्जाधीश असून देखील हा उमेदवार, जगातील टोकाची आर्थिक विषमता असणाऱ्या देशात, “मी प्रस्थापित व्यवस्था विरोधी आहे” अशी प्रतिमा बनवून त्यावर कोट्यावधी कामगार / कष्टकऱ्यांची / गरीब निम्न मध्यमवर्गीय मतदारांची मते मिळवू शकतो. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षात लॅटरल एंट्री घेतलेले नेते आहेत. उद्या आपल्या देशात एखादा उद्योगपती गौरवर्णीय वंशवादी मांडणी करत “आपल्या देशात बिगर गौरवर्णीय स्थलांतरित येण्यामुळे आपली बहुसंख्या असून देखील आपलेच प्रश्न तयार झाले आहेत” अशी मांडणी करून देखील बिगर गौरवर्णीय नागरिक मतदारांची लक्षणीय मते जिंकून घेऊ शकतो. बातम्यांप्रमाणे अर्ध्या लॅटिनो आणि एक पंचमांश कृष्णवर्णीयांनी ट्रम्प यांना मते दिली आहेत. गेल्या काही वर्षात लैंगिक गैरव्यवहारांचे अनेक आरोप होऊन, जाहीर सभांमध्ये स्त्रियांबद्दल अश्लाघ्य विधाने करून, स्त्रियांच्या गर्भपाताविषयीच्या अधिकाराबद्दल संदिग्ध भूमिका घेऊन देखील कोट्यवधी स्त्रियांनी ट्रम्प यांना मतदान केले. ज्या जागतिकीकरणाचे प्रवक्तेपण आणि नेतृत्व अमेरिकेने केले त्याच अमेरिकेमध्ये “राष्ट्राचे हित प्रथम” जागतिकीकरणामागील आर्थिक तत्त्वज्ञान आणि मुक्त जागतिक व्यापाराविरोधी भूमिका घेऊन लोकांना ट्रम्प यांचे अपील पोचले पण मुळात जे देशांच्या अर्थव्यवस्थांचे जागतिकीकरण गेली काही शतके आपल्या वेगाने होतच होते, त्या जागतिकीकरणाचा बुलडोझर टर्बो चार्ज करून स्वतःच्या आणि इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या पाया उखडण्याची गरज काय होती ? राष्ट्राचे नुकसान झाले असेल तर यात नक्की कोणत्या वर्गाचा फायदा झाला ? असे प्रश्न काही सार्वजनिक चर्चा विश्वात आले नाहीत / येत नाहीत. उद्या १०-१५-२० वर्षांनी अमेरिका आणि जगाच्या व्यापारी, आर्थिक, भू राजनैतिक नकाशाकडे मागे वळून बघितले जाईल त्यावेळी २०२४ सालातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीचा मैलाचा दगड ठळक दिसत असेल. पुढच्या चार वर्षात बरेच काही घडणार आहे हे नक्की.