Home » Blog » प्रेमा तुझा रंग कसा

प्रेमा तुझा रंग कसा

प्रेमा तुझा रंग कसा

by प्रतिनिधी
0 comments
Editorial

प्रेम या अडीच अक्षरी शब्दाने अवघे विश्व व्यापले आहे. ते दिसते. जाणवते. खुणावते.दुरावते. खंतावते. दु णावते आणि उणावतेही. पण मुळात एखाद्यामध्ये ते का निर्माण होते, कसे निर्माण होते, ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट’ प्रकारातला चमत्कार कसा घडून येतो, प्रेमात माणसे वेडेपिशी का होतात, हिंसक का होतात, दुःखीकष्टी का होतात…असे नानाविध प्रश्न, प्रेमात पडणाऱ्यांना मात्र सहसा पडत नाहीत. अशा वेळी हेलेन फिशर नावाच्या जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र तज्ज्ञ असलेल्या संशोधिकेने प्रेमात पडलेल्यांच्या मेंदूतली गुंतागुंत उकलून मानवी ज्ञानात मोठीच भर घातली. अलीकडेच फिशरबाईंचे निधन झाले. ‘दी इकॉनॉमिस्ट’ने अलीकडे त्यांच्या या पाथब्रेकिंग संशोधनाची दखल घेत, या व्यक्तित्वाच्या समृद्ध कार्याचा  स्मृतिगंध शब्दांतून वाचकांपर्यंत पोहोचवला. त्याचाच हा साभार स्वैर अनुवाद.

प्रेमाची मेंदूशास्त्रीय उकल

अर्थात, एवढे सगळे हाती लागूनही एक गूढ मात्र काही उकलत नाही. ते म्हणजे, का म्हणून ‘एक्स’ व्यक्ती ‘वाय’ व्यक्तीकडेच आकृष्ट होते, ‘झेड’ कडे का होत नाही? आणि इथेच फिशरबाई आपल्याला अधिक खोलात शिरण्याचे आवाहन करतात. २००५ मध्ये या फिशरबाईंची मॅच डॉटकॉम या ऑनलाइन जोड्या जुळवणाऱ्या कंपनीच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारपदी नेमणूक झाली, तीच मुख्यतः वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी. फिशरबाईंच्या मते, हा मुद्दा मुख्यतः व्यक्तिमत्त्वाशी आणि त्या व्यक्तीमधल्या मेंदूतल्या रासायनिक प्रक्रियांशी जोडलेला असतो. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोप्रमाणे ( फिशरबाईंना प्रेमाचा गुंता सोडवू पाहणाऱ्या सर्व तत्त्वज्ञ आणि कवीमंडळींबद्दल आत्मीय सहानुभूती होती बरं का.) फिशरबाईंनी या विषयावरच्या संशोधनादरम्यान माणसामध्ये ढोबळमानाने चार प्रकारातल्या व्यक्तिमत्वे आढळतात, असे नोंदले.  त्यातले पहिलेः एक्सप्लोरर्स, दुसरेः बिल्डर्स, तिसरेः डायरेक्टर्स आणि चौथेः निगोशिएटर्स. म्हणजे, नवा नवा शोध घेणारे भुंगे. नात्यांची बांधणी करणारे. नात्यांना दिशा देणारे आणि नात्यांमध्ये वाटाघाटी करणारे. याला त्यांनी नावे दिले फिशर टेंपरामेंट इन्वेन्ट्री ( FTI) एक्सप्लोरर प्रकारातल्या माणसांमध्ये मेंदूतल्या अधिवृत्त ग्रंथींमध्ये निर्माण होणाऱ्या डोपामाइन संप्रेरकाची (हार्मोन्स) पातळी उंचावलेली असते. यामुळे ते अधिक सृजनशील ( काहींच्या दृष्टीने उचापती) आणि प्रेरणादीय असतात. बिल्डर्स प्रकारातल्या व्यक्तींमध्ये सिरोटोनिन नावाच्या संप्रेरकाची पातळी उंचावलेली असते. ते नियमबद्ध असतात,आणि सदासतर्कही. डायरेक्टर्स प्रकारातल्या व्यक्ती उच्च पातळीवरचे टेस्टोस्टेरॉन असलेल्या, तर्कशुद्ध, स्पर्धात्मक, कठोर स्वभावाच्या आणि मिलनोत्सुक असतात. तर निगोशिएटर्स प्रकारचे व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती परस्परसहमतीला मान देणाऱ्या, जडणघडणीत वाटा उचलणाऱ्या असतात. पण एक लक्षात असू दिले पाहिजे, कोणाही व्यक्तीमध्ये असे सगळे गुण एकवटलेले नसतात. किंवा या गुणांपैकी एकही गुण नाही, अशीही व्यक्ती जगात नसते. प्रत्येकामध्ये यातले कमी अधिक प्रमाणात गुणमिश्रण झालेले असते. प्रत्येक मिश्रण एकापासून अगदी तरल पातळीवर भिन्नही असते. म्हणून जगात दोन व्यक्ती अगदी दोन जुळ्या बहिणी वा भाऊसुद्धा स्वभाववैशिष्ट्यांनी एकसारखे नसतात.

या प्रकारांना फिशरबाईंच्या व्यक्तिमत्वाशी ताडून पाहायचे, तर त्या स्वतः कामाच्या ठिकाणी उच्च पातळीवरचे डोपामाइन असलेल्या अर्थात सृजनशील स्त्री होत्या. एका पातळीवर मिलनोत्सुक, संस्थेतल्या इतरांची काळजी वाहणाऱ्या, मात्र गणितात कच्च्या आणि टेस्टोस्टेरॉनच्या तर्कानुसार थोड्याशा अस्वस्थ नि विखुरलेल्या मनःस्थितीतल्याही होत्या.

यथावकाश मानवी प्रेमामागची मेंदूंतर्गत गुंफण उलगडणारी फिशरबाईंनी शोधलेली ही पद्धती प्रेमीयुगुलांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली. फिशरबाईंना आशा, ही पद्धती शाळा, ऑफिसेस, सल्ला केंद्रे किंवा जिथे माणसांना एकमेकांशी जुळवून घेणे भाग पडत असते, तिथे मानवी नातेसंबंधांतली गुंतागुंत सोडवण्यासही उपयुक्त ठरावी. नव्हे, जगातल्या ४० देशांनी ही निदान पद्धती अवलंबलीदेखील. पुस्तके आणि टेड टॉक्सने या विषयाचे गांभीर्य हजारो-लाखो लोकांपर्यंत सर्वदूर पोहोचवण्यास फिशरबाईंना मोलाची मदतच केली. पण या सगळ्यात प्रणयी प्रेम मात्र ‘पतली गली से’ निसटून  जात होते. फिशरबाईंच्या ‘एफटीआय’ निदान पद्धतीला लव अॅट फर्स्ट साइट प्रकारातल्या प्रेमामागची उलथपालथ उलगडण्यास अद्याप यश आलेले नव्हते. इतकेच कशाला, वेगवेगळ्या वयोगटातल्या त्यातही वयाच्या पन्नाशीत असलेल्या आणि किमान २१ वर्षाहून अधिक काळ लग्नबंधनात असलेल्यांच्या जोडीदारावरच्या निस्सिम प्रेमामागची भानगडही फिशरबाईंच्या निदानपद्धतीच्या आवाक्यात आलेली नव्हती. बरे, हे पन्नाशीचे लोक केवळ बढाया मारत नव्हते किंवा प्रेमाचे खोटेनाटे नाटकही रचत नव्हते. कारण, जेव्हा फिशरबाईंनी या पन्नाशीच्या प्रेमवीरांच्या मेदूंचा उभा आडवा छेद टिपला, तेव्हा डोपामाइनची निर्मिती करणारा त्यांच्या मेंदूचा मध्य प्रदेशीय भाग अर्थात व्हेंट्रल टॅगमेंटल एरिआ दिनदिनदिवाळीसारखा उजळल्याचे सिद्ध झाले होते.

प्रेम प्रेमाला मिळाले…

हे खरेच की, प्रेम या ना त्या रुपात आश्चर्याचे धक्के देत राहते. खुद्द फिशरबाईंचे आयुष्यदेखील त्यास अपवाद नव्हते. १९६८ मध्ये फिशरबाईंचे पहिले लग्न झाले, तेव्हा त्यांनी पदवीची परीक्षाही दिलेली नव्हती. ही त्यांची पहिली वहिली विवाहवेदी, जेमतेम चार महिने टिकली. त्यानंतर कितीतरी वेळा त्या भावबंधात अडकल्या, पण लग्नाच्या भानगडीत पडल्या नाहीत. त्या पुन्हा एकदा त्या लग्नाच्या मोहात पडल्या, तेव्हा त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली होती. १९९४ पासून ज्या पुरुषाला त्या ओळखत होत्या, ज्याच्या प्रेमात त्या अडकल्या होत्या, त्याच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.  तत्पूर्वी म्हणजेच २०१४ मध्ये हे प्रेमी जोडपे  मोन्टाना इथे राँचवर मौजमजा करण्यासाठी गेले, तेव्हा दोघांनाही हे जाणवले की, आपल्या मेंदूतले डोपामाइन उसळ्या मारतेय. पण जसे त्यांच्यातल्या डोपामाइनने उसळी मारली तसे ते अल्पकाळातच थंडावलेही. पुढच्या वर्षी, एका रेस्टॉरंटमध्ये दोघांनी छानपैकी डिनर घेतले. मग  बिलियर्ड खेळून झाल्यानंतर दोघांनी रात्र एकत्र घालवली. पण हे जरी अतीच होते की काय असे वाटून फिशरबाईंचा जोडीदार चिंतेत (सिरोटोनिन उसळले!) पडला. मग ग्रँड सेंट्रल स्टेशनवर दोघे एकमेकांपासून विलग झाले. त्या क्षणी फिशरबाई हमसूनहमसून रडल्या. दोन महिन्यांनी पुन्हा दोघे एकत्र आले. प्रेम पुन्हा वस्तीला आले.

या प्रेमळ संघर्षानंतर फिशरबाई मोन्टाना पर्वताच्या पार्श्वभूमीवर विवाहबद्ध झाल्या. तेव्हा नवरी झालेल्या फिशरबाईंनी इंडियन पेंटब्रश (कुंचल्यासम टोक असलेली उत्तर अमेरिकन फुले) फुलांचा गुच्छ हाती धरला होता, तर लग्न लावून देणाऱ्या गोऱ्या भटजींनी बदामच्या राजाचा ( किंग ऑफ हार्ट्स) वेश परिधान केला होता.

लोक नेहमी असे विचारतात, प्रेमाच्या विज्ञानाचे एवढे सगळे ज्ञान झालेल्या या फिशरबाईंना प्रेमाने तर नाही बिघडवले? प्रेमाची इंगळी तर नाही, त्यांना डसली? त्यावर फिशरबाईंचे उत्तर होते-जवळपास नाहीच! तुम्हाला चॉकलेट केकमध्ये कोणकोणते घटक पदार्थ असतात, हे नेमकेपणाने ठाऊक असते, पण जेव्हा तुम्ही तो केक खाता, तेव्हा फक्त मौज असते. आनंद असतो. टिकाऊ प्रेमाची खरी किल्ली, आयुष्यभर प्रणयभावना जपण्यातच असते. त्याच अनुषंगाने न्यूयॉर्क मध्ये वेगवेगळी घरे करण्यात फिशरबाईंना उतारवयात बहरणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी नामी युक्ती गवसली होती. कारण, प्रत्येकवेळी विलग होताना, एमिली डिकिन्सन म्हणायची तसे, ऑल वुई नीड ऑफ हेल…म्हणजे, छिन्नावस्थेत आपल्याला स्वतःचा असा नरक गरजेचा असतो. पण त्यानंतर येते घटिका मिलनाची. त्या मिलनात असते, हवीहवीशी झिंग आणि जादू! थोडक्यात, जादू हैं नशा है, मदहोशिया है…!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00