नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये बुधवारी पहिल्या दिवशी दानिश मालेवार आणि करुण नायर यांनी विदर्भाला केरळविरुद्ध सावरले. दानिशच्या नाबाद १३८ आणि करुणच्या ८६ धावांमुळे विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावामध्ये ४ बाद २५४ धावा केल्या. (Vidarbha Cricket)
नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर बुधवारपासून अंतिम सामना सुरू झाला. मागील वर्षी उपविजेता ठरलेला विदर्भाचा संघ यावेळी तिसऱ्या रणजी विजेतेपदाच्या शोधात आहे, तर केरळचा संघ प्रथमच अंतिम फेरीत दाखल झाला आहे. बुधवारी केरळने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. केरळच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत पहिल्या तासाभरामध्येच तीन विकेट घेऊन विदर्भाची अवस्था ३ बाद २४ अशी केली होती. त्यानंतर मात्र, दानिश मालेवार आणि करुण यांनी ही पडझड थांबवत संघाचा डाव सावरला. या दोघांनी तब्बल ६८ षटके खेळपट्टीवर ठाण मांडत चौथ्या विकेटसाठी २१५ धावांची भागीदारी रचली. दिवसाचा खेळ संपण्यास अर्धा तास शिल्लक असताना करुण धावबाद झाला. त्याने ११८ चेंडूंमध्ये ८ चौकार व एका षटकारासह ८६ धावांची खेळी केली. यादरम्यान, त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील ८,००० धावांचा टप्पाही ओलांडला. त्याने ११४ व्या प्रथमश्रेणी सामन्यात ही कामगिरी केली असून त्याच्या नावावर २२ शतके व ३५ अर्धशतके जमा आहेत. (Vidarbha Cricket)
करुण बाद झाल्यानंतर दानिशने यश ठाकूरसोबत दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवून संघाच्या अडीचशे धावा धावफलकावर लावल्या. दानिशने नाबाद शतक झळकावताना २५९ चेंडूंमध्ये १४ चौकार व २ षटकारांसह १३८ धावांची खेळी केली. केरळतर्फे निधीशने २ विकेट घेतल्या. (Vidarbha Cricket)
संक्षिप्त धावफलक : विदर्भ – पहिला डाव ८६ षटकांत ४ बाद २५४ (दानिश मालेवार खेळत आहे १३८, करुण नायर ८६, ध्रुव शौरी १६, एमडी निधीश २-३३, एडन ॲपल टॉम १-६६) विरुद्ध केरळ.
हेही वाचा :
भारतीय महिलांचा विश्वविजेत्या नेदरलँड्सला धक्का
सर्वोच्च न्यायालयाचा लक्ष्य सेनला दिलासा