मुंबई : जमीर काझी : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार (३ मार्च)पासून सुरुवात झाली आहे. वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला. ‘महाराष्ट्र मे दो गुंडे, मुंडे और कोकाटे, अशी घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले तर विधान परिषदेत दोघांच्या राजीनाम्याची मागणी करत गोंधळ घातला.(Uproar in assembly)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटे यांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून त्यांच्या निकालानंतर राज्यपाल आणि सभागृह त्याबाबत निर्णय घेईल, असे उत्तर देत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्रितपणे विधानभवनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर महायुती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले. ‘महाराष्ट्रात दोन गुंडे, कोकाटे आणि मुंडे,’ अशी घोषणाबाजी करीत विधानभवनाच्या पायऱ्यावर काहीकाळ आंदोलन केले. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधान परिषदेत झालेल्या कामकाजावेळी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शोक प्रस्ताव मांडत असताना हा मुद्दा पुन्हा लावून धरला. एखाद्या मंत्र्याला न्यायालयाने दोषी जाहीर केले असतानाही त्याला पाठीशी घातले जाते, राजीनामा घेतला जात नाही, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे सांगून यावर तातडीने सभापतीने निर्णय द्यावा, अशी मागणी केली. शोक प्रस्ताव मांडत असताना हा मुद्दा मांडल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्याला आक्षेप घेतला. सभापती रामराजे शिंदे यांनीही दानवे यांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.(Uproar in assembly)
कोकाटे यांनी शिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली असून कोर्टाने निर्णय प्रलंबित ठेवला आहे. त्यांचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्यपाल तसेच सभागृह मंत्री कोकाटे यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे आश्वासन दिले, मात्र विरोधकांची त्यावर समाधान झाले नाही. त्यातच सभापती शोक प्रस्ताव मांडून दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले.(Uproar in assembly)
आव्हाडांची हातात बेड्या घालून विधानभवनात एन्ट्री!
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधिमंडळात पोहोचले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांचे आवाज बंद केले जात आहेत. ही पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणे हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. आम्हाला व्यक्त होता आलेच पाहिजे. राईट टू एक्स्प्रेशन, राईट टू स्पीच हे आमचे मूलभूत अधिकार आहेत. ते शाबूत राहिलेच पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत,’ असे ते म्हणाले.
मुंडे, कोकाटे यांचे मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्रपणे बैठक
विरोधकांच्या रडारवर असलेल्या वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी राज्यपालाचे अभिभाषण झाल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या दालनात त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. यावेळी त्यांच्या राजीनाम्यांबाबतची भूमिका निश्चित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असल्याचे समजते.(Uproar in assembly)
विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे गट तर परिषदेत काँग्रेसला संधी महाविकास आघाडीच्या तोकड्या संख्याबळामुळे अद्याप विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदीची निवड झालेली नाही. तिन्ही पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक वीस आमदार असल्याने त्यांच्याकडे हे पद दिले जाईल तर विधान परिषदेत काँग्रेसचे सर्वांत जास्त सदस्य असल्याने या सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या आमदाराला संधी दिली जाईल असे आघाडीच्या बैठकीत ठरले आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी जाहीर केले. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्करराव जाधव तर विधान परिषदेत सतेज पाटील यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावावर रात्री उशिरापर्यंत शिक्कामोर्तब करून मंगळवारी विधानसभा अध्यक्ष आणि सभापतीकडे नावे देण्यात येतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.(Uproar in assembly)
हेही वाचा :
प्रगतशील महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल