सासाराम (उत्तर प्रदेश) : हाथरस म्हटले की अंगावर शहारे आणणारी ती घटना आजही तशी आठवते. दलित मुलीवर झालेला अमानुष अत्याचार, तिची हत्या आणि अत्यंत निर्दयीपणे तिची पेटवलेली चिता आठवली की थरकाप उडतो. याच हाथरस जिल्ह्यात आणखी एक थरारक घटना घडली आहे. अर्थात ती अत्याचाराची नाही तर अपहरणाची. तीही प्रस्तावित वधू म्हणून जिने पाहायला बोलावले तिनेच काही साथीदारांच्या मदतीने केलेल्या पाहुण्यांच्या अपहरणाची. (UP Men Abducted)
लग्नाची स्वप्ने बाळगून मुलगी पाहायला आलेल्या पाहुण्यांचे मुलीनेच अपहरण करून त्यांना जंगलात बंदी बनवले तेव्हा त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. वाजत-गाजत वऱ्हाडी नेण्याच्या स्वप्नाची वास्तवातील जागा एकाकी जंगलात अपहरणकर्त्यांच्या टोळीने घेतली. रात्रीची वेळ आणि ध्यानीमनी नसताना जीवावर बेतलेल्या प्रसंगाने त्यांच्या घशाला कोरड पडली.
पोलिसांना याची माहिती मिळताच सुमारे पाच तास धाडसी मोहीम राबवून या ओलिसांची सुटका करण्यात आली. बंटी शर्मा, पप्पू कुशवाह आणि नरेंद्र गुप्ता अशी अपहृतांची नावे आहेत. (UP Men Abducted)
या तिघांना संबंधित महिला आणि तिच्या टोळीने भगवानपूर पोलीस ठाण्यांतर्गत घनदाट बाभणी जंगलात ओलीस ठेवले. त्यांच्याकडचे १० हजार रुपये काढून घेतले. आणखी १० लाखाची खंडणी मागितली. पैसे न मागितल्यास जीवे मारून किडनी विकण्याचीही धमकी दिली.
पोलिसांनी राबवलेल्या मोहीमेत सुटका झालेल्या नरेंद्र गुप्ता यांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी या चित्तथरारक घटनेचा तपशील उघड केला. १० जानेवारीला ते काशी विश्वनाथ दर्शनासाठी वाराणसीला आले होते. गुप्ता यांच्यासोबत त्यांचे मित्र मनीष वाजपेयी, त्यांची आई शशी देवी, पप्पू कुशवाह आणि ड्रायव्हर बंटी शर्मा होते. त्यावेळी कुद्रा, कैमूर येथील एका मध्यस्थाने भेटीची व्यवस्था केली होती. त्यानेच त्यांची माया नावाच्या महिलेशी ओळख करून दिली होती, जी लग्नाच्या प्रस्तावासाठी मनीषला भेटणार होती. त्यांनी वाराणसीला येण्याआधी मायाला व्हिडिओ कॉलही केला होता.(UP Men Abducted)
११ जानेवारीला भाभुआमध्ये मायाची भेट झाली. त्यावेळी मायाने बंटी आणि पप्पूला तिच्यासोबत अज्ञातस्थळी यायला सांगितले. त्यानुसार ते गेले. तो जंगलचा परिसर होता. तेथे गेल्यावर सात-आठ जणांच्या टोळीने त्यांच्यावर झाडप घातली. त्यांच्याकडील १० हजार रुपये आणि त्यांचे मोबाईल काढून घेतले. त्यांना तेथील एका घरात ओलीस ठेवले. विशेष म्हणजे मायाही या कृत्यात सहभागी होती.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी सापळा रचला. अपहरणकर्त्यांच्या दोन मोटारसायल्सचा माग काढला. शिवाय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुमारे पाच तास मोहीम राबवली आणि या टोळीला पकडले. विकास, राजेश, हरीश, मनीष आणि पिंकी अशी या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत.