जमीर काझी : मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्यात येणार आहे. ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील पथकर नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूमार्गे जाणाऱ्या वाहनांनाही पथकरमाफीचा लाभ देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवारी परिपत्रक काढण्यात आले. (Toll waiver for Ganesha devotees traveling to Konkan)
मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो कुटुंबीय गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात. या काळात मुंबई–गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. गणेशभक्तांचा हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा, तसेच त्यांना प्रवासादरम्यान अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरटीओकडून टोलमाफीचे पास देणार
गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समन्वयातून आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या तसेच आरटीओ कार्यालयांमध्येही पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. . (Toll waiver for Ganesha devotees traveling to Konkan)
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान असते. टोलमाफीच्या निर्णयामुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस आणि परिवहन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.टोलमाफीची सुविधा आणि पास उपलब्धतेबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने आवश्यकतेनुसार सूचना, जाहिराती आणि जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना माहिती द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Toll waiver for Ganesha devotees traveling to Konkan)
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी व्हावा, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करावे,”
: शिवेंद्रसिंहराजे भोंसले ( सार्वजनिक बांधकाम मंत्री)