Home » Blog » ही राजकीय नव्हे; तर विचारधारेची लढाई : राहुल गांधी

ही राजकीय नव्हे; तर विचारधारेची लढाई : राहुल गांधी

Rahul Gandhi : ‘शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज नसते तर आज संविधान नसते ’

by प्रतिनिधी
0 comments

कोल्हापूर; प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ज्या विचारधारेने विरोध केला होता त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे. याच विचारधारेने राम मंदिर, संसद भवन उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना आमंत्रित केले नाही. देशात ही विचारधारा हजारो वर्षे सुरू असून, तिच्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे ही राजकीय लढाई नसून विचारधारेची लढाई आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केले. (Rahul Gandhi)

कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वसामान्य रयत सुखी व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले. शिवाजी महाराजांची विचारधारा आणि संविधानाची भूमिका एकच आहे. हा देश सर्वांचा आहे, कुणावरही अन्याय करायचा नाही, सर्वांना सोबत घेऊन जायचे, अशी शिकवण त्यांनी दिली. शिवाजी महाराजांचे विचार म्हणजे २१ व्या शतकातील हे संविधान आहे.  शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज नसते तर संविधान निर्माण झाले नसते, असे  सांगत खासदार राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत उंचावून दाखविली. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांना भरभरुन दाद दिली.

सध्या देशात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. संविधानातून समता, एकता निर्माण करणे ही एक विचारधारा आहे. दुसरीकडे संविधान बदलण्याबाबतची विचारधारा आहे. दुसरी विचारधारा देशातील संस्था संपवत आहेत. लोकांना घाबरवत आहेत, धमकावत आहेत, असे सांगून राहुल गांधी म्हणाले, ही मंडळी शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतात, पण कृती नेमकी शिवाजी महाराजांच्या विचारांविरोधात करतात. त्यांना तुम्ही विचारा, शिवाजी महाराजांना नमस्कार करता तर मग शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरित झालेल्या संविधानाला वाचवता का? गरिबांचे सरंक्षण करता का? (Rahul Gandhi)

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची विचारधारा जपण्याचे आणि संविधान वाचवण्याचे काम करायचे आहे. तुम्ही हे करणे म्हणजे शिवाजी महाराज यांचे विचार जपणे आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.  शिवाजी महाराज यांची विचारधारा महाराष्ट्राच्या या भूमीतून आली. मी ज्या ज्यावेळी महाराष्ट्रात येतो तेव्हा मला तुमच्यात सतत शिवाजी महाराजांचा विचार दिसतो. शिवाजी महाराजांच्या विचाराचे रक्षण करणे म्हणजेच संविधानाचे रक्षण करणे होय, असे सांगून भाषणाच्या प्रारंभीच राहुल गांधी यांनी काल (शुक्रवारी) संध्याकाळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने कार्यक्रमासाठी येऊ शकलो नाही, असे स्पष्ट करत सर्वांची माफी मागितली.

काँग्रेसचे विधिमंडळातील नेते आमदार सतेज पाटील म्हणाले, कसबा बावडा ही राजर्षी शाहूंची जन्मभूमी आहे. याच भूमीत ज्यांनी भारत जोडो यात्रा काढून सर्वसामान्य माणसाला बळ दिले त्या राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. आगामी काळात तुम्हाला पाहिजे असलेले, तुमच्या विचारांचे, सर्वांना न्याय देणारे सरकार आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभेतील विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार, माजी आमदार उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील, प्रणिती शिंदे,  आमदार विश्वजीत कदम, भाई जगताप, नसीम खान, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयंत आसगांवकर, जयश्री जाधव, डॉ. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती,  आदींची प्रमुख उपस्थिती होती. (Rahul Gandhi)

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांच्या हस्ते मूर्तिकार सतीश घारगे यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीतील सर्व कार्यकर्त्यांची राहुल गांधी यांच्याशी आमदार सतेज पाटील यांनी भेट घडवून आणली. मानसिंग जाधव यांनी आभार मानले.

नियत चांगली असावी लागते

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या मूर्तीसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, त्यांनी शिवाजी महाराज यांची मूर्ती बनविली, पण थोड्याच दिवसांत मूर्ती तुटली. मूर्ती बनविण्यामागची नियत चांगली असावी लागते. त्याचबरोबर मूर्ती बनविली तर महाराजांची विचारधाराही जपली पाहिजे, असा टोलाही त्यांनी भाजप-शिंदे शिवसेना सरकारला लगावला.

राहुल गांधी यांनी घेतला पुतळ्याचा फोटो

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यावर राहुल गांधी भारावून गेले. त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये पुतळ्याचा फोटो काढून घेतला. चबुतरा परिसरात जाऊन त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच आ. सतेज पाटील आणि मूर्तिकार सतीश घारगे यांच्याकडूनही माहिती जाणून घेतली.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00