Home » Blog » ठाकरेंची मशाल घराघरांत आग लावणारी

ठाकरेंची मशाल घराघरांत आग लावणारी

मुख्यमंत्री शिंदे यांचा घणाघात; त्यांच्या काळात फक्त स्थगिती

by प्रतिनिधी
0 comments
Eknath Shinde File Photo

धाराशिव : प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी आहे, त्यांनी अडीच वर्षात फक्त विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी परंडा येथे शिंदे यांची सभा झाली. या वेळी ते बोलत होते. शिंदे यांनी सावंत यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी देण्याचे संकेत दिले आहेत. ‘तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी’, असा शब्द शिंदे यांनी दिल्याने महायुतीचे सरकार आल्यावर सावंत यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी  लागण्याची शक्यता आहे. शिंदे म्हणाले, की बाळासाहेबांचे विचार विकायला निघाले, तेव्हा आम्ही उठाव करण्याचे धाडस केले. त्या वेळी तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्याचे भाग्य मला मिळाले.

पूर्ण बहुमताचे सरकार  आणल्यावर आम्ही अधिकृतपणे उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे काम केले आहे. शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. धनुष्यबाण आमचा आहे, असे म्हणणाऱ्यांनी आपली मशालसुद्धा आता दुसऱ्याच्या हातात देऊन टाकली आहे. ठाकरेंची मशाल ही क्रांतीची मशाल नाही, ती घराघरात आग लावणारी मशाल आहे’, अशी टीका शिंदे यांनी या वेळी केली. आम्ही आमच्या कार्यकाळात राज्याचा विकास केला. परंडा येथील प्रचारसभा ही विजयाची सभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00