सतीश घाटगे : कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने उर्दू भाषेत फलक लिहिणे बेकायदा नसल्याचा निकाल दिला आहे. भाषा ही संवादाचे माध्यम आहे. ती भेदभावाचे कारण ठरू नये असे न्यायालयाने म्हटले आहे. भारतात या भाषेला धार्मिक वळण दिले जात आहे. या भाषेचा उगम कुठे झाला, ती विकसीत कशी झाली आणि तिचा विस्तार कसा झाला, या भाषेला धार्मिक वळण कसे मिळाले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सतराव्या शतकापर्यंत मागे जावे लागते. (Urdu)
२०२२ मध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीवर मराठीसह उर्दू भाषेतील मजकूर फलक लावण्यात आला होता. त्याला माजी नगराध्यक्षाने हरकत घेतली. नगरपरिषदेने ती फेटाळली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. त्यांनी माजी नगराध्यक्षांची मागणी मान्य केली, पण विभागीय आयुक्तांनी फेटाळली. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की अधिकृत कामकाजासाठी मराठी आवश्यक आहे. तरीही दुसरी भाषा वापरण्यास मनाई नाही. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. उर्दूचा वापर संवादासाठी होत आहे. यात कायद्याचा भंग होत नाही. भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान राखत अतिरिक्त भाषा वापरणे महराष्ट्र स्थानिक प्राधिकारण (राजभाषा) अधिनियम २०२२ च्या तरतुदीचे उल्लंघन करत नाही. भाषा ही संवादाचे माध्यम आहे. ती भेदभावाचे कारण ठरू नये असे न्यायालयाने म्हटले आहे. (Urdu)
उगम भारतातच
उर्दूचा उगम भारतात झाला आहे. उर्दू हा तुर्की शब्द आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिम भागातील मीरत (मेरठ) या विभागात ही भाषा जन्मली. गंगा जमुना दोआबच्या प्रदेशात ती जास्त रुजली. तिथे पूर्वी खारी बोली म्हणजेच हिंदी बोलली जात असे. उर्दूच्या व्याकरणाचा पाया हिंदी भाषेवर आधारित आहे. पण उर्दूमध्ये पार्शियन आणि अरबी शब्दसंग्रहाचा समावेश आहे. सुधारित पर्शियन अरबी लिपीची छाप उर्दू लिपीवर आहे. हिंदीप्रमाणेच उर्दू ही हिंदुस्थानी भाषा आहे, असे भाषाशास्त्रज्ञांचे मत आहे. उर्दूची हिंदीशी जास्त जवळीक आहे, ती इंडो आर्यन भाषेत मोडते. (Urdu)
मुघलांची भाषा पर्शियन
मुघलांनी भारतात अनेक वर्षे राज्य केले. पण त्यांची राज्यकारभारातील भाषा पर्शियन होती. राजघराण्यातील मंडळी पर्शियन भाषा बोलत असले तरी सर्वसामान्य हिंदी भाषेतच बोलत असत. औरंगजेबानंतर उर्दू भाषेचा वापर राजकारभारातील कागदोपत्रात होऊ लागला. अमीर खुस्रो यांना उर्दू साहित्याचे जनक म्हटले जाते. मुस्लिम राजवाटींनी दक्षिणेत विस्तार केल्यानंतर कुलीन मुस्लिम कुटुंबे दक्षिणेकडे आली. बहामणी राजवटीत उर्दू भाषेला महत्व दिले. उर्दूला दख्खणी हिंदी असेही म्हणत. १३ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत उर्दू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाषेला हिंदी, हिंदवी, हिंदुस्तानी, देहलवी, लाहोरी, लष्करी भाषा म्हणून ओळखले जात असते. पण दिल्लीतील सल्तनतीने मात्र भारतात पर्शियन भाषेला अधिकृत भाषा म्हणून स्थापित केले होते. अवधच्या नवाबाने उर्दू भाषेला सरंक्षण दिले. लखनौमध्ये उर्दू भाषा सुधारली गेली. ही भाषा फक्त दरबारातच नव्हे तर शहरातील सामान्य हिंदू आणि मुस्लिम नागरिकही बोलत. लखनौ शहराने उर्दू गद्य साहित्याला जन्म दिला. या भाषेतील ‘उमराव जान अदा’ ही उल्लेखनीय कादंबरी होती.
हिंदी– उर्दू वाद
ब्रिटीशांचा भारतात अंमल सुरू झाल्यानंतर त्यांनी पर्शियन भाषेऐवजी १८३७ मध्ये उर्दू भाषेला स्थान दिले. दरम्यान वायव्य भारतात आर्य समाजाने पर्शियन अरबी लिपी वापराविरोधात आंदोलन केले. भारतातील मूळ भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे लाहोरच्या ‘अंजुमन-ए-इस्लामिया’ने देवनागरीत लिहिलेल्या हिंदीच्या वापराला विरोध केला. १८६७ मध्ये हिंदी-उर्दू वादाने हिंदू आणि मुस्लिमांमधील भाषिक आणि सांस्कृतिक दरी अधोरेखीत केली. ज्यामध्ये उर्दू ही भारतीय मुस्लिमांच्या भाषिक देशभक्तीचे प्रतिक म्हणून उदयास आली. या उदयानंतर उर्दू भाषा ही मुस्लिम समाजाची भाषा म्हणून प्रचार सुरू झाला आणि राजकारणातील मुस्लिम नेत्यांनी उर्दू भाषेला पाठिंबा दिला.
पाकिस्तानाची राष्ट्रीय भाषा उर्दू
फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र देश झाले. पाकिस्तानने उर्दू भाषेला एकमेव राष्ट्रीय भाषा म्हणून घोषीत केले. पाकिस्तानमध्ये उर्दू भाषा जास्त बोलली जाते हा समज खोटा आहे. २०२३ च्या पाकिस्तानाच्या जनगणनेनुसार पाकमधील ९.२५ टक्के लोक उर्दू बोलतात. बहुतांशी पाकिस्तानी स्थानिक भाषा बोलतात. (Urdu)
जिथे मुस्लिम भाषिक तिथे उर्दू भाषा
भारतात ज्या ठिकाणी मुस्लिम लोकांची वस्ती आहे तिथे उर्दू भाषा बोलली जाते. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात मराठवाडा आणि कोकणात बोलली जाते. भारतातील ८०० जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात उर्दू भाषेचा वापर होते. बिहारमधील अररिया जिल्ह्यात उर्दू भाषिकांची संख्या जास्त आहे. तेलंगणातील हैद्राबाद जिल्ह्यात उर्दू बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तिथे ४३.३५ टक्के तेलगू तर ४३.२४ लोक उर्दू भाषिक आहेत. भारतात उर्दूसह अनेक भाषांना राज्यभाषेचा दर्जा दिला आहे. स्वातंत्र्यानंतर उर्दूचा वापर कमी झाल्याने उर्दू भाषा शिकणाऱ्यांचे आणि बोलणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मुस्लिमधर्मीयही रोजच्या जीवनात स्थानिक भाषेत बोलतात. तामिळनाडूतील मुस्लिम तामिळ, आंध्र मधील तेलगु, कर्नाटकातील कन्नड, केरळमधील मल्याळमसह वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक भाषा मुस्लिम बोलतात.
प्रेमचंदाचे साहित्य उर्दूमधूनच
पहिल्या महायुद्धानंतर १९२० च्या सुमारास उर्दू साहित्यात फार मोठे परिवर्तन घडून आले. ह्या परिवर्तनाची सुरूवात प्रेमचंदांच्या कथांपासून झाली. कारण प्रेमचंदांनी मजूर, शेतकरी आणि गोरगरिबांची सुखदु:खे, अडीअडचणी यांना उर्दू साहित्यातून वाचा फोडली. त्यांना उर्दू साहित्यातील वास्तववादाचे जनक म्हटले जाते. ह्या घटनेचा प्रभाव उर्दू काव्यावरही पडू लागला. भारतात स्वातंत्र्यानंतर उर्दूमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण झाले. उर्दू दैनिकेही मोठ्या प्रमाणात प्रकाशित झाली. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात आजही उर्दू दैनिकांचे प्रमाण जास्त आहे. भारतातील अनेक नेत्यांचे प्राथमिक शिक्षण उर्दूमध्ये झाले आहे. भारताची माजी पंतप्रधान लालबहाददूर शास्त्री यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा उर्दू शाळेतूनच झाला होता. भारतातील अनेक नेते भाषणे हिंदीत करत असले तरी उर्दू भाषेत लिहित असत. कवी गुलजार आजही हिंदी गाणी उर्दू भाषेतच लिहितात.
हेही वाचा :
पुरोगामी धाग्याने जुळली शतजन्माची लग्नगाठ
देशभर शिवजयंतीची सुट्टी जाहीर करा