कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवसेना जिल्हा प्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या नियुक्तीनंतर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेत पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. शिवसेना उप नेते संजय पवार आणि नवनियुक्त हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना गटातील बंडाळी शिवसेनेचे मुंबईचे नेतृत्व कसे रोखणार? असा शिवसैनिकांकडून विचारला जात आहे. (Pawar Surve resign)
शिवसेना जिल्हा प्रमुख इंगवले यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तीव्र नाराजी पसरली. पक्षाने निवड करताना निष्ठावंतांवर अन्याय केला असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते तर नियुक्ती प्रक्रिया राबवताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप करण्यात आला. इंगवले यांची नियुक्ती करताना कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुखपदी हर्षल सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांना पद दिल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करताना नाव न घेता रविकिरण इंगवले यांच्यावर टीका केली होती. नाराज गट सोमवारी निर्णय घेणार होता. (Pawar, Surve resign)
आज सोमवारी सकाळी हर्षल सुर्वे यांनी कोल्हापूर दक्षिण शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी पत्रात असे म्हटले आहे की, “साहेब माझी जिल्हाप्रमुख पदी निवड झाली नाही त्यामुळे मनातील खद व्यक्त केली होती. मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली तिच जास्त जिव्हारी लागली. आज पर्यंत आदेश माणूनच काम केले होते. कधी आदेश डावलला नाही. पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला, निर्णय मान्य नसेल तर निघुन जावा. मला निर्णय मान्य नाही साहेब. साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे. मी माझा पदाचा आणि सक्रिय सभासदचा राजीनामा देत आहे”. (Pawar Surve resign)
दरम्यान शिवसेनेचे उप नेते संजय पवार यांनी शिवसेना उपनेतेपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. उपनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी आपण शिवसेनेत शेवटपर्यंत राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ज्या प्रमाणे प्रभू रामचंद्राच्या पायाशी हनुमंत राहिले. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या पायाशी शेवटपर्यंत राहणार असल्याचे सांगितले. गेली ३६ वर्षे आपण शिवसेनेत काम करत आहे. पण नवीन निवड प्रक्रियेत उप नेतेपद असूनही विश्वासात घेतले नसल्याचे वाईट वाटले असे त्यांनी सांगितले. नवीन निवडीला आपला विरोध नसून निवड प्रक्रियेला आपला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना जिल्हाध्यक्षापदासाठी अनेक पदाधिकाऱ्यांची नावे होती. पण त्यांची मते जाणून न घेतला आणि स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतल्याबददल पवार यांनी नाराजी व्यक्त केली. (Pawar Surve resign)
मालोजीराजे, मधुरिमाराजेंवर टीका
संजय पवार म्हणाले, शिवसेनेने पक्षाचा आदेश म्हणून लोकसभा निवडणूकीत शाहू छत्रपतींचा प्रचार करुन जीवाचे रान केले. विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला कोल्हापूर उत्तरमध्ये संधी असतानाही काँग्रेसला जागा दिली. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्या निवडीचे आम्ही स्वागत केले. पण त्यांनी शेवटच्याक्षणी माघार घेतली. त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतानाही त्यांनी माघारीच्यावेळी आम्हाला विचारले नाही. त्यानंतर आम्ही राजेश लाटकरांच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले. त्यावेळी मालोजीराजेंचे कार्यकर्ते कुणाचा प्रचार करत होते?. मधुरिमा राजे यांच्या आई कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपच्या प्रचार होत्या. आम्ही जीवाचे रान करुन राजेश लाटकरांचा प्रचार करत असताना राजेंचे कार्यकर्ते आमच्या विरोधकांचा प्रचार करत होते, अशी टीका केली. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना निवडणूक लढली असती, पराभूत झालो असलो तरी घराघरात शिवसेनेचे मशाल चिन्ह पोचले असते. हे शिवसेनेच्याविरोधात केलेले षढयंत्र होते, असा आरोपही त्यांनी केला. (Pawar Surve resign)