मुंबई : प्रतिनिधी : विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद नियुक्तीवरुन विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी झाली. हा प्रश्न थेट सरन्यायाधीशांसमोर बोलावे लागेल. लोकशाहीचा गळा कसा घोटला जात आहे, याबाबत सांगावे लागेल असा इशाराच आमदार जाधव यांनी यावेळी दिला. या खंडाजंगीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचा राज्य सरकारच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचे संविधानावर व्याख्यानही झाले. (Bhaskar Jadav)
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, भारताचे सरन्यायाधीश आज विधीमंडळात येणार आहेत. त्यांच्या सत्कार समारंभासाठी आम्हीही सरकारसोबत येणार आहोत. जेव्हा सरन्यायाधीशांचे स्वागत करेल. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याने विरोधी पक्षाच्यावतीने त्यांचे स्वागत होणार नाही.
भास्कर जाधव म्हणाले, आम्हाला विधीमंडळाकडून कायदेशीर पत्रही मिळाले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी दहा टक्के आमदारांची अट कुठेही नाही. लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही निर्णयाचा संदर्भ दिला होता. त्यावर चर्चा झाली आहे. विधीमंडळाकडून मला पत्रही आलेले आहे. (Bhaskar Jadav)
जाधव आपला मुददा मांडत असताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत असे चालणार नाही असे सुनावले. त्यावर भास्कर जाधवही चिडले. का नाही चालणार? असे म्हणत अध्यक्षांना भिडले. मी तुम्हाला विनंती केली आहे. त्यात वावगं काय आहे?.
या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. भास्कररावांना हा मुद्दा मांडायला हरकत नाही. पण बोलण्याची परवानगी देण्याचे अधिकार अध्यक्षांच्या हातात आहेत. आपण प्रश्नोत्तर, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अभिनंदनाचा ठराव करु त्यानंतर भास्कररावांना म्हणणे मांडण्याची परवानगी द्यावी.
त्यावर अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, जाधवांना बोलण्यास मी परवानगी देतो. विरोधी पक्षनेते नियुक्तीचे संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहेत. त्यासंदर्भात सभागृहात चर्चा करणे कितपत योग्य आहे, ते तुम्ही ठरवा. याच मुद्दावरुन तुम्ही मला दालनात येऊन भेटलात. तुम्ही माझ्याशी चर्चा केलेली आहे. योग्य निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष नार्वेकर यांच्या स्पष्टीकरणानंतर जाधव बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. सनदशीर मार्गाने विरोधी पक्षनेतेपदाचा विषय सुटावा, अशी आमची मागणी आहे. विरोधी पक्षेनेते नियुक्तीचा विषय आपण एका मिनिटात सांगितला तर आम्ही एका सेकंदात बसतो. नाही तर सरन्यायाधीशांसभोर लोकशाही गळा कसा घोटला जातो हे आम्हाला सांगावे लागले. हे आम्हाला बाहेर जाऊन बोलावे लागेल. (Bhaskar Jadav)