कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोउत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी करवीरनिवासिनी अंबाबाई ची श्री तारा माता रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली. आज पाऊस नसल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिराच्या आवारात दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (Shri Tara Mata)
अंबाबाईची रोज विविध रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती. आज श्री तारा माता रुपातील पूजा बांधण्यात आली होती. श्री तारा माता रुपातील अंबाबाईची डावा पाय शवावर असून ती विराट हास्य करत आहे. देवीच्या चार हातात विळा, नीलकमल, कात्री आणि मातीचे भांडे आहे. देवीचा जटालाप पिंगट छटेचा असून तो नागयुगुलांनी युक्त आहे. तिने मुंडमाला धारण केली आहे. सर्व जडत्व, नैराश्य, दारिद्र्य खप्परात खेचणारी ही दिव्य देवता आहे. (Shri Tara Mata)
ही दशमहाविद्यालयातील द्वितीय देवता असून, कालीकुलातील पूर्वाम्नायपीठ देवता आहे. चैत्रशुद्ध नवमीला हिची उत्त्पती झाली. हिचा भैरव अक्षोभ्यरुद्र आहे. मेरूपर्वताच्या पश्चिमेस चोलना नदीकाठी श्री तारा माता प्रगट झाली. वसिष्ठांनी हिची विशेष उपासना सिद्धी केली. स्पर्शतारा, चिंतामणीतारा, सिद्धिजटा, उग्रतारा, हंसतारा, निर्वाणतारा, महानीला ही अनेक हिची रूपे व उपासना भेद आहेत. देवीच्या उपासनेने सर्वज्ञत्व, संसृतिनाश, मोक्षलाभ, सर्वासिद्धीप्राप्ती, शत्रूनाश, सकल भोग-सुख प्राप्ती असे अनेक फललाभ होते. श्रीपूजक रामप्रसाद ठाणेकर, सचिन ठाणेकर, अमित देशपांडे, निखिल शानभाग यांनी पूजा बांधली. (Shri Tara Mata)