मुंबई : प्रतिनिधी : पोलिसांची दडपशाही झुगारून मराठी अभ्यास केंद्राने मराठी शाळांच्या प्रश्नांवर मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा काढला. मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण सांगून पोलिसांनी मोर्चाला अडकाठी घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी उधळून लावला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांची धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी डॉ. दीपक पवार यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आचारसंहितेचे कारण सांगून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आंदोलकांनी चर्चा करण्यास नकार दिला. गगराणींच्या मराठीद्रोही भूमिकेबद्दल आंदोलकांनी केली त्यांच्या राजीनाम्याची मागणी
प्रारंभी पोलिसांनी मोर्चास परवानगी नाकारली. मात्र आंदोलकांच्या ठाम निर्धारावर चार चार जणांनी जावून हुतात्मा स्मारकाला अभिवादन करावे असा पर्याय पोलिसांनी मान्य केला. त्यानंतर डॉ. दीपक पवार, चिन्मयी सुमीत, आनंद भंडारे, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. अजित अभ्यंकर, राजन राजे, धनंजय शिंदे, गोवर्धन देशमुख या आंदोलकांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर मोर्चा शांततेत मुंबई मुख्यालयाच्या दिशेने सुरू झाला. मात्र मोर्चाला परवानगी नाही असे म्हणत आंदोलकांना ठिकठिकाणी अडविण्याचे प्रकार पोलिसांनी केले. आंदोलकांनी हातात धरलेले फलक पोलिसांनी जबरदस्तीने हिसकावून घेण्याचे प्रकार झाले. (A protest march against the Mumbai Municipal Corporation)
पोलिस आणि आंदोलकांत धुमश्चक्री
महानगरपालिका मुख्यालयाजवळ आंदोलक पोचल्यानंतर सर्वांना जबरदस्तीने ढकलून आझाद मैदानात रेटण्यात आले. तिथे पोलिस आणि आंदोलक यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. आयुक्तांची भेट मिळत नाही तोवर तिथेच बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर पोलिसांनी मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार, आनंद भंडारे, साधना गोरे, स्वप्नील थोरात या कार्यकर्त्यांना अटक केली. त्याचबरोबर कॉ. प्रकाश रेड्डी, धनंजय शिंदे, गोवर्धन देशमुख, राज्यसभेचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर यांसह अनेकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर आझाद मैदानात सोडून देण्यात आले. (A protest march against the Mumbai Municipal Corporation)
आझाद मैदानात सर्व आंदोलक जमलेले असताना मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडून शिष्टमंडळाला भेटीची वेळ देण्यात आली. डॉ.दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली चिन्मयी सुमीत, आनंद भंडारे, डॉ. प्रकाश परब आणि सुशील शेजुळे या मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे आणि आयुक्तांचे अतिरिक्त अधिकारी चवरे यांची भेट घेतली.
आयुक्तांची चर्चा करण्यासाठी आडमुठी भूमिका
या वेळी आयुक्तांनी “आंदोलकांना त्यांचे निवेदन तुम्हाला द्यायचे आहे असे मला पोलिसांनी कळविले आहे, त्यामुळे मी केवळ तुमचे निवेदन स्वीकारतो आहे. पण निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने मी आपल्याशी कोणतीही चर्चा करू शकणार नाही” अशी सुरुवातीलाच आडमुठी भूमिका घेतली.
त्यावर डॉ. पवारांनी विचारले की, “सहा महिने आम्ही पत्रव्यवहार करत होतो, त्याला आपण उत्तरे दिली नाहीत. ही असंवेदनशीलता नाही का?” आनंद भंडारे यांनी आयुक्तांना मोर्चानिमित्त कालच पाठवलेले पत्र बैठकीत वाचून दाखवले आणि आम्ही मांडलेल्या दहा शाळांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण भेटीची वेळ द्यावी असे पत्रात स्पष्टपणे म्हटल्याचे दाखवून दिले. यावर गगराणी म्हणाले, “आचारसंहिता असल्यामुळे आता चर्चा करता येणार नाही. निवडणूका झाल्यानंतरच या प्रकरणावर चर्चेसाठी वेळ देवू शकतो. आम्ही शाळांच्या प्रश्नांवर चर्चा करतच असतो. महापालिका काहीच करत नाही असे नाही.” मात्र, दहा शाळांच्या प्रश्नांवर बैठक का आयोजित केली नाही, असे विचारले असता उपायुक्त प्राची जांभेकर यांनी भेटीची वेळ दिली होती, पण आपणच आला नाही, असे सांगितले. (A protest march against the Mumbai Municipal Corporation)
न्यू माहिम स्कूल पाडण्याचा निर्णय १० ऑक्टोबरला घेतला आहे
शिष्टमंडळाच्या मागण्यांवर अनौपचारिक चर्चा करण्यासही गगराणी यांनी आचारसंहितेचे कारण सांगून चर्चा करण्यास स्पष्टपणे नकार दिला. शेवटी चिन्मयी सुमीत यांनी आयुक्तांना सांगितले की ज्या शाळा पाडायचा निर्णय पालिकेने घेतला आहे त्या तरी निर्णयाला निवडणूका होईपर्यंत स्थगिती द्यावी. त्यावर आयुक्त असे म्हणाले की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जे निर्णय झालेत त्याची अंमलबजावणी ठरल्याप्रमाणे होईल. मात्र आचारसंहिता काळात कोणतीही नवी शाळा पाडायचा निर्णय घेतला जाणार नाही. याचा अर्थ न्यू माहिम स्कूल पाडायचा निर्णय १० ऑक्टोबरला घेतला आहे त्याची आचारसंहितेचे कारण सांगत आयुक्तांनी कोणतीही औपचारिक चर्चाही करण्याचे सौजन्य दाखविले नाही.
या भेटीचा सर्व वृत्तांत शिष्टमंडळाने आंदोलकांना सांगितला तेव्हा उपस्थित सर्वांनी आयुक्त गगराणी यांचा तीव्र निषेध केला. आयुक्तांच्या मराठीद्रोही भूमिकेबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मराठी शाळा, मराठी भाषा हे मुद्दे सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात येतील यासाठी सर्वांनाच कसून प्रयत्न करावे लागतील, असे डॉ. दीपक पवार यांनी आंदोलकांना सांगितले.
आंदोलनात आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत, कॉ. आनंद अभ्यंकर, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, माकपचे शैलेंद्र कांबळे, बिदर-भालकीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिनेश मुधाळे, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रमोद पार्टे, कृष्णा जाधव, प्रदीप सामंत, राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम, युवराज मोहिते, आविष्कारचे दीपक राज्याध्यक्ष, नाट्यकर्मी संदीप मेहता, शिवनाथ दराडे, जालिंदर सरोदे, संतोष सुर्वे, संगीता कांबळे, आनंद निकेतनच्या विनोदिनी काळगी, संभाजी ब्रिगेड, डीवायएफआय आणि विविध शैक्षणिक, सामाजिक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.