मुल्लनूपूर : फटकेबाजी आणि मोठ्या धावसंख्यांमुळे ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या अठराव्या मोसमातील मंगळवारचा सामना गोलंदाजांनी गाजवला. पंजाब किंग्जने या सामन्यात धावफलकावर केवळ १११ धावा असतानाही कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १६ धावांनी विजय नोंदवला. या विजयासह पंजाब किंग्जने काही विक्रमही आपल्या नावावर केले. या सामन्यातील काही रंजक आकडेवारीचा हा आढावा. (Punjab Kings)
- १११ – पंजाब किंग्जने या सामन्यात १११ धावा करूनही विजय मिळवला. याबरोबरच पंजाब आयपीएलमधील सर्वांत कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करणारा संघ ठरला. यापूर्वी, चेन्नई सुपरकिंग्जने २००९ च्या आयपीएल मोसमात पंजाबविरुद्धच ११६ धावा करूनही सामना जिंकला होता. (Punjab Kings)
- ५ – आयपीएलमध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी संघांचा डाव संपुष्टात येण्याची ही पाचवी वेळ होती. या पाचपैकी तीन सामन्यांमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा संघ सहभागी आहे. मात्र, अगोदरच्या दोन सामन्यात कोलकाता संघाने विजय मिळवला होता, तर मंगळवारी त्यांना पंजाबकडून पराभव पत्करावा लागला.
- ९५ – कोलकात्याचा डाव या सामन्यात ९५ धावांमध्ये संपुष्टात आला. आयपीएलमधील कोलकात्याची ही तिसरी नीचांकी धावसंख्या ठरली. त्याचप्रमाणे, २००९ पासून प्रथमच त्यांचा डाव १०० धावांच्या आत आटोपला. पंजाबविरुद्ध कोणत्याही संघाने नोंदवलेली ही तिसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली. (Punjab Kings)
- १५.३/१५.१ – या सामन्यामध्ये पंजाबचा डाव १५.३ षटकांमध्ये, तर कोलकात्याचा डाव १५.१ षटकांमध्ये संपला. दोन्ही संघांचे डाव सोळाव्या षटकापूर्वीच संपुष्टात येण्याची ही आयपीएल इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर, आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा हा सर्वांत कमी षटकांचा डाव ठरला. यापूर्वी, २०११ च्या मोसमात मुंबई इंडियन्सचा डाव पुणे वॉरियर्सविरुद्ध १७.२ षटकांत आटोपला होता.
८ – या सामन्यात ४ विकेट घेणाऱ्या पंजाबच्या युझवेंद्र चहलने आयपीएलमध्ये आठवेळा चार व त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. याबरोबरच, आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा चार व त्यापेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सुनील नरेनसह आघाडीवर पोहोचला. या दोघांनीही आयपीएलमध्ये प्रत्येकी सातवेळा चार, तर एकदा पाच विकेट घेतल्या आहेत. चहलने तिसऱ्यांदा कोलकात्याविरुद्ध चार विकेट घेतल्या. (Punjab Kings)
हेही वाचा :
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
झाम्पाच्या जागी स्मारनची निवड