तिरुप्पूरः तामिळनाडूमधील एका धक्कादायक घटनेने सुरक्षित प्रसूतीचा प्रश्न चर्चेत आणला आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केल्याने ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, वैद्यकीय देखरेखीशिवाय घरी प्रसूती करणे आई आणि बाळ दोघांच्याही जीवासाठी गंभीर धोका ठरू शकते. (women dies after You tube guided home birth)
तामिळनाडूतील तिरुप्पूर जिल्ह्यातील के. शशिकला या ३२ वर्षीय महिलेला २४ जून रोजी प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्यानंतर तिचे पती कोलंथासामी आणि सासू यांनी यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. शशिकलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला; मात्र प्रसूतीनंतर गर्भनाळीसोबत बाहेर पडणारा प्लेसेंटा (अपरा) पूर्णपणे बाहेर आला नाही. त्यामुळे तिला प्रचंड रक्तस्राव सुरू झाला.
तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला प्रथम पेरुंदुरई येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात आणि नंतर कोईमतूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच २८ जून रोजी तिचा मृत्यू झाला. (women dies after You tube guided home birth)
पतीविरुद्ध गुन्हा दाखल
द हिंदूच्या वृत्तानुसार, कुटुंबीयांनी सुरुवातीला कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी आधीपासूनच घरी नैसर्गिक प्रसूती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र तालुका वैद्यकीय अधिका-यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमानुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुदैवाने नवजात मुलगी पूर्णपणे निरोगी आहे.
यूट्यूब हा डॉक्टरांचा पर्याय नाही
दिल्लीतील प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गीता जैन यांनी यासंदर्भाने सांगितले की, कोणत्याही डॉक्टर, नर्स किंवा प्रशिक्षित दाईशिवाय घरी प्रसूती करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. (women dies after You tube guided home birth)
त्यांच्या मते, प्रसूती ही अत्यंत गुंतागुंतीची वैद्यकीय प्रक्रिया आहे. यूट्यूबवरील व्हिडिओमधून प्रसूतीची माहिती मिळू शकते; मात्र अचानक उद्भवणाऱ्या गुंतागुंतींवर कशी मात करायची, हे त्यातून कळत नाही. अशा वेळी काही मिनिटांचा विलंबही जीवघेणा ठरू शकतो. आणि त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरच मदत करू शकतात.
प्रसूतीनंतरचा अतिरक्तस्राव जीवघेणा
या प्रकरणात शशिकलाचा मृत्यू पोस्टपार्टम हेमरेजमुळे झाला. म्हणजेच प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे.
गर्भधारणेदरम्यान तयार होणारा प्लेसेंटा पूर्णपणे बाहेर न पडल्यास किंवा गर्भाशय योग्य प्रकारे आकुंचन पावले नाही, तर तातडीने औषधे आणि विशेष वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. हे उपचार केवळ प्रशिक्षित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीच करू शकतात. (women dies after You tube guided home birth)
रुग्णालयात प्रसूतीदरम्यान बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांवर सतत लक्ष ठेवले जाते. त्यामुळे बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आहे की नाही, हे वेळेवर समजते.
जर जन्मानंतर बाळाने श्वास घेतला नाही, तर तातडीने नवजात सीपीआर (Neonatal CPR) आणि श्वसनमार्ग स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते. अशा सुविधा घरच्या घरी उपलब्ध नसतात.
खांदे अडकल्यास गंभीर परिस्थिती
कधी कधी बाळाचे डोके बाहेर येते; पण खांदे अडकतात. ही अत्यंत गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असते. अशा वेळी काही मिनिटांचा विलंबही बाळाच्या मेंदूला कायमस्वरूपी इजा पोहोचवू शकतो. (women dies after You tube guided home birth)
तज्ज्ञांच्या मते, प्रसूती ही कधीही वैद्यकीय आणीबाणीमध्ये बदलू शकते. त्यामुळे प्रसूतीवेदना सुरू होताच किंवा त्यांची शक्यता जाणवताच महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करावे.
यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरी प्रसूती करण्याचा प्रयोग कधीही करू नये. आई आणि बाळ या दोघांच्या सुरक्षिततेसाठी प्रसूती नेहमी सुसज्ज रुग्णालयात आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखालीच व्हावी, असा डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला आहे.