समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आसिम आजमी यांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भारतीय जनता पक्षाला त्याचा थेटपणे फायदा झालेला आहे. त्यामुळे अबू आजमी हे भारतीय जनता पक्षाचे एजंट आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहत नाही. (Abu Azami controversy)
-डॉ. विजय चोरमारे
अबू आजमी यांनी वारी संदर्भात जे वक्तव्य केलेले त्या वक्तव्याच्या संदर्भात येथे चर्चा करणार आहोत, पण त्याच वेळी अबू आजमी यांनी आतापर्यंत काय काय वक्तव्ये केलेली आहेत आणि त्यामुळे काय वाद निर्माण झाले त्याचा सुद्धा आढावा घेणार आहोत. आपल्याला आठवत असेल की त्यांनी औरंगजेबासंदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यामुळे मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झालेला होता. आजमी यांनी
औरंगजेबाला न्यायप्रिय शासक आणि उत्तम प्रशासक असं म्हटलं होतं. म्हणजे औरंगजेब हा कूर प्रशासक नव्हता असं त्यांचं वक्तव्य होतं. म्हणजे औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरं बांधली. त्यांच्या काळातील लढाया धर्मासाठी नव्हे तर राजकीय कारणासाठी होत्या, असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. अर्थात हे वक्तव्य कोणत्या काळात केलेलं होतं तर ज्या काळात ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता तेव्हा.(Abu Azami controversy)
चित्रपटामध्ये औरंगजेबाकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा अनन्वीत छळ केल्याचं चित्रण अत्यंत आक्रमकपणे मांडण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे त्या काळात चित्रपटाचा प्रभाव होता लोकांच्यामध्ये क्षोभ होता अशा
काळात आजमी यांनी औरंगजेबाच्या संदर्भात हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्या वक्तव्याला एकूण मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चेचे स्वरूप आलेलं होतं. आपल्याला आठवत असेल, म्हणजे मुद्दाम आपल्याला आणखी एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे त्याच काळात म्हणजे त्या दिवशी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार होतं आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या त्याच काळात बीड जिल्ह्यातले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय, संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आलेली होती त्या संदर्भातले फोटो प्रसिद्ध झालेले होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात प्रचंड क्षोभ आणि संताप निर्माण झालेला होता. त्याचा परिणाम म्हणून ज्या धनंजय मुंडे यांचा बचाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार करत होते. त्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं सरकारला भाग पडलं होतं. म्हणजे त्या दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार होता. धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही सरकारसाठी अत्यंत नामुषकीजनक गोष्ट होती, पण त्या दिवशी राजीनामा झालाच पण त्या राजीनाम्याची बातमी फार चर्चेत येऊ नये यासाठी सरकार पक्षाकडून अबू आजवी यांनी औरंगजेबाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा विषय आक्रमकपणे मांडण्यात आलेला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर औरंगजेबाच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला सभागृहात आणि सभागृहाबाहेरही पाहायला मिळालं होतं.
संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अबू आजमी देशद्रोही आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला होता. म्हणजे एकूण संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण, तो विषय हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, बीडमधली वाढलेली गुंडगिरी, त्या गुंडगिरीला संरक्षण देणारे वाल्मिक कराड, त्या वाल्मिक कराडाचे आका धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं त्या मंत्रिमंडळात असणं असं सगळं दुष्टचक्र होतं. त्यातून सरकारची प्रचंड नाचक्की झाली होती आणि सरकारला प्रचंड नामुष्की सहन करावी लागलेली होती. ते प्रकरण दाबण्यासाठी औरंगजेबाचा विषय ऐरणीवर आणण्यात आलेला होता आणि त्या संदर्भातलं वक्तव्य अबू असिम आजमी यांनी केलेलं होतं. याचाच अर्थ धनंजय मुंडे यांच्यामुळे होणाऱ्या नामुष्कीची तीव्रता टाळण्यासाठी मुद्दाम अबू आजमींना भारतीय जनता पक्षाने फूस दिली होती आणि त्यातून त्यांनी त्या संदर्भातल हे वक्तव्य केलं होतं. हे सरळ सरळ राजकारण स्पष्टपणे दिसत होतं. म्हणजे सरकारच्या अत्यंत अडचणीच्या काळात अबू असिम आजमी यांनी औरंगजेबाच्या संदर्भातलं वक्तव्य करून सरकारला मदत केली होती. अर्थात त्यावरून त्यांना त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरतं निलंबित करण्यात आलेल होतं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. या सगळ्या गोष्टी घडल्या पण त्यांना फारसा अर्थ नव्हता.(Abu Azami controversy)
सरकारचा बचाव करायला त्यावेळी अबू आजमी यांचं वक्तव्य उपयोगी ठरलं होतं. ही गोष्ट त्यातली अंतिम होती. नंतर त्यांनी माफी मागितली वगैरे ठीक आहे.
आता ताज्या घटना बघा ताज्या घटना म्हणजे हिंदीच्या सक्तीवरून सरकार प्रचंड अडचणीत आलेलं आहे. साहित्यिक-कलावंत- सांस्कृतिक क्षेत्रात सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे, असंतोष आहे. सरकार कुणाच्या तरी हातचं बाहुलं बनून महाराष्ट्रात मराठीचं खच्चीकरण करायला निघालेलं आहे आणि तिथे हिंदीचं वर्चस्व प्रस्थापित करायला निघालेलं आहे असं चित्र निर्माण व्हायला लागले. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कोणाची सुपारी घेऊन काम करते, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
त्यामुळे सरकार अडचणीत आलेलं आहे. त्याच वेळी आणखी एक गंभीर गोष्ट पुढे येते. ती म्हणजे जनसुरक्षा विधेयक येत्या अधिवेशनात मंजूर करणारच अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. जनसुरक्षा विधेयक म्हणजे जे लोक सरकार विरुद्ध बोलतात, जे लोक सरकार विरुद्ध आंदोलन करतात त्यांची मुस्कटदाबी करणारे हे विधेयक आहे. म्हणजे त्याला मुलामा नक्षलवादाचा दिलेला आहे, पण सरकार विरुद्ध बोलणारा प्रत्येक घटक या जनसुरक्षा विधेयकाच्या म्हणजे या कायद्याच्या कक्षेत येणार आहे आणि त्या संदर्भातलं विधेयक सरकारला या अधिवेशनात आणायचं आहे. या विधेयकाच्या संदर्भात १२ हजार हरकती आलेल्या आहेत, परंतु त्या सगळ्या डावलून सरकारला त्याच्याशी काही देणं न घेता हे विधेयक मंजूर करायचं आहे.
म्हणजे इतके गंभीर प्रश्न आहेत आणि या गंभीर प्रश्नांवर चर्चा होऊन पुन्हा सरकार विरुद्ध एक प्रक्षोभ निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे पुन्हा अशा वेळी सरकारच्या मदतीला अबू आजमी आलेले आहेत हे लक्षात घ्यावं लागेल.
म्हणजे आषाढी वारी आणि नमाज पठण या संदर्भातलं त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे.
त्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलंय की आषाढी वारीमुळे रस्ते जाम होतात, पण मुस्लिम समाज याबाबत कधीही तक्रार करत नाही. मात्र जेव्हा मुस्लिम पाच दहा मिनिटं रस्त्यावर नमाज पठन करतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते.
म्हणजे मुस्लिमांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक कारवाया केल्या जातात असे त्यांचं वक्तव्य आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अबू आजमी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा त्यांच्यावर आरोप व्हायला लागला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अबू आजमी यांचं वक्तव्य अदखलपात्र असल्याचं आणि केवळ प्रसिद्धीसाठी ते वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीसाठी चाललेल्या या वक्तव्यांना प्रतिक्रिया देऊन मी त्यांना अधिक प्रसिद्धी देऊ इच्छित नाही, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. अर्थात मला असं वाटतं की अबू आजमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते. त्यामुळे
त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही. एका राज्यकर्त्याचं वक्तव्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य योग्यच आहे, पण जे वरवरचं आहे ते खरं असतंच असं नाही.
अबू आदमींचं हे वक्तव्य सरकारच्या मदतीसाठी आहे, भारतीय जनता पक्षाच्या मदतीसाठी आहे. कारण त्यामुळे
सरकारच्या पुढचे जे काही गंभीर प्रश्न आहेत ते प्रश्न बाजूला सरकलेत. आपण सर्व वृत्तवाहिन्यांवर बघितलं असेल तर अबू आजमी यांचं वक्तव्य, त्या वक्तव्यांना वारकऱ्यांच्यातल्या काही लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया, हे सगळं म्हणजे महाराष्ट्रात आता बाकी सगळे विषय संपलेले आहेत आणि वारी आणि वारीला विरोध असं काहीतरी एक नवं युद्ध सुरू झालेले आहे असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न वृत्तवाहिन्या करायला लागल्या आहेत.
अबू आजमी यांच्या म्हणण्या संदर्भात चर्चा होऊ शकते का? तर चर्चा होऊ शकते, पण कोणतं वक्तव्य कोणत्या काळात करायचं असतं यासंदर्भातला एक विवेक सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या नेत्यांनी, लोकांनी बाळगायचा असतो. सध्या आषाढी वारीचे दिवस आहेत. हजारो वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहेत. अशावेळी त्या वारीच्या विरोधात एका मुस्लिम व्यक्तीने वक्तव्य करणं याचा अर्थ त्या पाठीमागचा हेतू वेगळा आहे. म्हणजे हिंदू-मुस्लिम तेढ वाढवणं, हिंदू मुस्लिमांच्यात एक दरी निर्माण करणं, असा या वक्तव्याचा थेट अर्थ होतो आणि अबू आजमी यांच्या वक्तव्यामुळे तेच घडताना दिसत आहे. कारण सत्ताधारी पक्षातील नेते प्रतिक्रिया द्यायला लागले आहेत. वारकऱ्यांच्या थेट दिंडीतनं लोक प्रतिक्रिया द्यायला लागले आहेत. म्हणजे अबू आजमीचे एक साधं वक्तव्य आहे आणि त्या वक्तव्यावरून मग अशा असं काही आक्रमक वातावरण निर्माण व्हायला लागलंय की, मुसलमान समाज वारीच्या आडवा यायला लागलाय किंवा अबू आजमींच्या प्रतिमेला चपलानं मारणं, अशाही प्रतिक्रीया यायला लागल्या आहेत. अर्थात या संदर्भात कोणी कशा प्रतिक्रिया द्याव्यात, ते त्याच्या त्याच्या आकलनानुसार या प्रतिक्रिया व्यक्त होतील, पण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य महत्त्वाचं वाटतं. त्यांनी सरळ सरळ त्या संदर्भात म्हटलेलं आहे की अबू आजमींनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू-मुस्लिमचा फायदा घ्यायचा. तो प्रश्न घेऊन हिंदू-मुस्लिम भांडण लावायचं आणि अबू आजमीनं एक पिल्लू सोडून द्यायचं हे ठरलेलं आहे. अबू आजमीचे पाय खोलात आहे त्यामुळे अबू आजमी हे जे स्टेटमेंट करतो आहे हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय असा माझा स्पष्ट आरोप आहे. अबू आजमी यांच वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या सोयीचं आहे, भारतीय जनता पक्षाकडून फूस असल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलेलं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे आणि त्यात तथ्य आहे. कारण ज्या पद्धतीने अबू आजमी वेळोवेळी भूमिका घेतात त्या मुळे भारतीय जनता पक्षाला फायदा होतो. भारतीय जनता पक्षाला ते पथ्यावर पडतं. त्यामुळे वडेट्टीवार यांनी जे काही म्हटलं आहे त्यात तथ्य आहे असं म्हणावं लागतं.
म्हणजे लव्ह जिहादबाबत त्यांनी मागे एक वक्तव्य केलं होतं. धुळ्यातल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं होतं की, लव्ह जिहाद काल्पनिक मुद्दा आहे. हिंदू मुस्लिम विवाह पूर्वीपासून होत आहेत, परंतु लव्ह जिहादच्या नावाखाली कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. त्याबद्दलही गदारोळ झालेला होता. सीएए आणि एनआरसीच्या संदर्भातही त्यांनी काही वक्तव्य केलेलं होतं. हे कायदे लागू झाले तर मुस्लिम समुदायाला रस्त्यावर उतरून विरोध करावा लागेल या त्यांच्या वक्तव्य त्यावरूनही अनेक तक्रारी झाल्या होत्या, गदारोळ झालेला होता.
मुलामुलींच्या विवाहाच्या वयाबाबतही त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून टीका केली होती म्हणजे केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाच वय १८ वरून २१ करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अबू आजमी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला होता. ज्यांना स्वतःची मुलं नाहीत त्यांनी हा कायदा आणलाय, असं एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि विवाहाच वय ठरवणं हे कुटुंबावर सोडलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा त्या काळात एक वाद झालेला होता.(Abu Azami controversy)
अलीकडच्या काळात आपल्याला आठवत असेल की त्यांनी पॅलेस्टाईनच्या झेंड्या संदर्भातले वक्तव्य केले होते. तुम्ही पाकिस्तान किंवा बांगलादेशचे झेंडे जाळा, फाडा, पण पॅलेस्टाईनचा झेंडा जाळाल तर त्या संदर्भात आम्ही प्रतिक्रिया देऊ असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे एकूण आता हिंदी-मराठी भाषेचा वाद चाललाय. त्यावरून त्यांनी म्हटले की मराठीचा सन्मान व्हायला हवा, पण हिंदीचा अपमान होता कामा नये.
‘‘सेंट्रल गव्हर्मेंट का सारा काम हिंदी मे होता है और अगर महाराष्ट्र मे तीन लंग्वेज है तो सबसे पहले मराठी होना चाहीए, उसके बाद हिंदी और हिंदी के बाद इंग्लिश होना चाहीए, ’’ असे त्यांनी म्हटले आहे.(Abu Azami controversy)
एका भाषेच्या मुद्द्यावर मतांचं राजकारण केलं जातं, असा त्यांनी आरोप केलेला होता. म्हणजे वेळोवेळी जे वादग्रस्त प्रश्न असतात त्यावेळी अत्यंत वादग्रस्त वक्तव्यं करायची, तो प्रश्न चिघळेल अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करायची आणि अंतिमतः त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला कसा होईल हे बघायचं हे अबू आसिम आदमी यांच्या राजकारणाचं सूत्र राहिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडचं गेल्या काही वर्षातलं म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेलं वातावरण आहे- धार्मिक विद्वेषाचं वातावरण. कुठलाही धार्मिक विद्वेषाचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार असतो. त्यामुळे अशा राजकारणाला भारतीय जनता पक्ष खतपाणी घालत असतो. असे राजकारण वाढावं यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करीत असतो अशा वेळी समोरून अत्यंत संयमानं, अत्यंत शांततेनं आणि अत्यंत प्रगल्भतेने व्यक्त होण्याची गरज असते, परंतु अबू आजमी यांच्यासारखे वाचाळ नेते भारतीय जनता पक्षाला पूरक ठरेल अशा पद्धतीने काही आक्रस्ताळी विधानं करतात आणि विद्वेषाची दरी किंवा विद्वेष वाढवण्याचं काम करतात. हिंदू-मुस्लिम यांच्यातली दरी वाढवण्याचं काम करतात. खरं तर प्रत्यक्षात आपण वारी बघितली तर वारीमध्ये अनेक मुसलमान लोक सहभागी होत असतात. अनेक मुस्लिम संतांची परंपरा सुद्धा या महाराष्ट्रातल्या संत परंपरेत आहे, पण अबू आसिम आजमी यांच्यासारखे लोक मात्र त्याला छेद देण्याचा प्रयत्न करतात, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात आणि भारतीय जनता पक्षाला जे धार्मिक विद्वेषाचं सतत काहीतरी घडत राहावं असं अपेक्षित आहे त्याला पूरक काम करतात, असं मानायला हरकत नाही.