सांगली महापालिकेची निवडणूक रंगात आली असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक उमेदवार आझम काझी यांना जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे. आपल्या आडवे येणा-या कुणालाही सोडणार नाही, असाच इशारा भारतीय जनता पक्षाने याद्वारे दिला आहे. अंतर्गत असंतोषाने पोखरलेल्या भारतीय जनता पक्षाला ही रणनीती विजयाकडे नेणार का, हा खरा प्रश्न आहे.
विजय चोरमारे
सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी वीस प्रभागांमध्ये निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्ष स्वबळावर सर्व जागांवर लढत असून एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही बहुसंख्य जागा लढवत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आघाडी झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपने दूर ठेवल्यामुळे त्यांनीही स्वबळ अजमावायचे ठरवले आहे. परंतु त्यांचे आतून काँग्रेसच्या आघाडीशी संगनमत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही स्वतंत्रपणे काही जागांवर लढत आहे. त्यामुळे एकूणच सांगली महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांचाच नव्हे, तर पक्ष आणि उमेदवारांमध्येही मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपकडून मतदारांवर दौलतजादा सुरू असली तरी अंतर्गत असंतोषामुळे भाजपला गतवेळेसारखे यश मिळण्याची स्थिती नाही. याआधीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपने सर्वाधिक ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला २०, राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या होत्या. सांगली महापालिकेत २०१३ मध्ये जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांचा संघर्ष झाला होता, त्यात पतंगराव कदम यांनी बाजी मारली होती. २०१८ मध्ये भाजपने सत्ता मिळवली होती.
जयंत पाटील-विशाल पाटील एकत्र
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मधल्या काळात भाजपमध्ये स्थानिक नेत्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले. विधानसभा निवडणूक लढवलेल्या जयश्री मदन पाटील आणि काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठे नुकसान झाले. परंतु खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसची बाजू लावून धरली आहे. भाजपच्या आक्रमणापुढे अस्तित्वच धोक्यात आल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय़ घेतला आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या राजकारणात वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांचा संघर्ष वर्षानुवर्षे चालला. जयंत पाटील यांनी राजकारणात सक्रीय झाल्यावर हा संघर्ष पुढे सुरू ठेवला. विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही त्या संघर्षाचे पडसाद उमटायचे. परंतु या संघर्षाचा फायदा घेऊन भाजपने काँग्रेसच्या पारंपरिक संस्थानांवर वर्चस्व मिळवले. त्यामुळे शहाणपणा दाखवून यावेळी जयंत पाटील-विशाल पाटील यांनी एकत्र येण्याचा निर्णय़ घेतला. त्याअर्थाने पाहिले तर दादा-बापूंचे वारस पहिल्यांदाच एकत्रितपणे सांगलीत निवडणुकीला सामोरे जात आहेत. इस्लामपूर आणि आष्टा नगरपालिकेच्या सत्तेमुळे आत्मविश्वास मिळालेले जयंत पाटील सांगलीत जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे. (BJP faces a challenge from the Congress-NCP alliance)
भाजपवर विसंबून राहिल्याने राष्ट्रवादीला फटका
महायुती एकत्रित निवडणुका लढवण्याची चर्चा असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप आपल्याला सोबत घेईल, अशी आशा होती. परंतु भाजपमधल्याच इच्छुकांची संख्या वाढू लागल्यानंतर भाजपने सांगून टाकले की तुमचे तुम्ही बघा. आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्यांनी जनसुराज्य पक्षाला दोन आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा दिलीय आणि तेही भाजपच्या चिन्हावर. भाजपवर विसंबून राहिल्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसला. (BJP faces a challenge from the Congress-NCP alliance)
भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा सतरंज्या उचलण्यासाठीच मागे ठेवले
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गेल्या वर्षभरात मोठी भरती केली, त्यात खोगीरभऱतीही केली. त्या सगळ्यांना सामावून घेताना भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा सतरंज्या उचलण्यासाठीच मागे ठेवले. मिरजेतील सुरेश आवटी हे मोठे प्रस्थ. त्यांना आठ जागा दिल्या आहेत. जयश्री पाटील यांना नऊ जागा दिल्या आहेत. काँग्रेस-जनसुराज्य-भाजप असा प्रवास केलेल्या दिलीप सूर्यवंशी यांच्या दोन पुतण्यांना उमेदवारी देऊन घराणेशाहीचा मुद्दाही भाजपने हातातून घालवला आहे. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील तिसरी पिढी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपच्या जुन्या निष्ठावंत नीता केळकर यांच्या मुलाला उमेदवारी मिळू शकलेली नाही. माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या कुटुंबातील कुणालाही उमेदवारी मिळालेली नाही. भाजपच्या प्रसिद्धीचे काम करणारे चंद्रकांतदादांचे निष्ठावंत केदार खाडिलकर यांना दिलेले तिकीट रद्द केले. शेखर इनामदार सांगली भाजपमधले बडे प्रस्थ. त्यांचे उमेदवार असलेल्या विनायक सिंहासने आणि सविता मदने यांनाही डावलण्यात आले. मकरंद देशपांडे हे संघ परिवारातले मोठे नाव, ते निवडणूक प्रमुख आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी मिळू शकलेली नाही. त्या जागा सुरेश आवटी यांना दिल्या. संघाशी संबंधित असलेले अनिल कुलकर्णी हे जुने पदाधिकारी, त्यांचे जावई शैलेश देशपांडे यांनाही उमेदवारी नाकारली. दोन वेळा नगरसेवक असलेल्या भारती दिगडे यांनाही उमेदवारी मिळू शकलेली नाही. (BJP faces a challenge from the Congress-NCP alliance)
भाजपमध्ये पक्षांतर्गत मोठा असंतोष?
अशा रितीने भाजपने मित्र पक्षांनाही सोबत घेतले नाही आणि स्वतःच्या अनेक कार्यकर्त्यांनाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला एक सभा घेतली. त्यानंतर स्थानिक पातळीवरच सगळा प्रचार सुरू आहे. पहिल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगलीकडे फिरकले नाहीत. अखेरच्या आठवड्यात ते सांगलीत मुक्काम ठोकण्याची शक्यता आहे.
संजयकाकांचा भाजपविरोधात आवाज
सांगली महापालिकेच्या राजकारणातील चर्चेतले चेहरे म्हणून किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान हे दोन माजी महापौर, तसेच विद्यमान आमदार इद्रिस नायकवडी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत राष्ट्रवादी लढत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन करून संजय पाटील यांनी भाजपविरोधात आवाज दिला आहे.
मधल्या काळात जयंत पाटील सांगलीच्या राजकारणात बॅकफुटवर गेले होते. त्यामुळे त्यांचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. त्यामुळे सांगलीतील त्यांची ताकद खच्ची झाली. जयश्री मदन पाटील आणि पृथ्वीराज पाटील सोडून गेल्यामुळे काँग्रेसचा पायाही भुसभुशीत झाला. जयश्री पाटील यांच्यासोबत अनेक नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता होती. परंतु मिरजेत मुस्लिम मतदारांची निर्णायक भूमिका ठरते. भाजपसोबत गेल्यास त्याचा फटका बसेल म्हणून अनेकांनी जयश्री पाटील यांची साथ सोडली. फक्त सहा नगरसेवक त्यांच्यासोबत गेले. (BJP faces a challenge from the Congress-NCP alliance)
दोन पाटील, कदमांचे भाजपसमोर आव्हान
जयश्री पाटील यांना भेटायला चंद्रकांतदादा त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्या म्हणतील तेवढ्या जागा आम्ही त्यांना देऊ असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले होते. त्यावर जयश्री पाटील यांना २२ जागा देण्याची अफवा पसरली आणि त्यामुळे भाजपमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. भाजपमधील भरतीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ होते. त्यांना धीर देण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांना पत्र काढून, भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही द्यावी लागली होती.
दरम्यान भाजपचे आव्हान लक्षात घेऊन जयंत पाटील-विशाल पाटील-विश्वजित कदम एकत्र आले आहेत. त्यामुळे सांगलीत भाजपपुढे आव्हान निर्माण झाले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही ताकदीचे उमेदवार उभे केल्यामुळे त्यांनाही चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
सांगलीतील गुन्हेगारी निवडणुकीच्या केंद्रस्थानी
सांगलीतील गुन्हेगारी हा निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा आहे. सांगलीत अंमली पदार्थांचे प्रस्थ वाढत चालले आहे. गुन्हेगारी वाढते आहे. एका वर्षात इथे ६३ खून झालेत. जयंत पाटील यांनी त्यावर लक्ष केंद्रीत करून नशामुक्त आणि भयमुक्त सांगलीचा नारा दिला आहे.सांगलीची यावेळची निवडणूक कमालीची रंगतदार बनली आहे. परंतु एकूण गोंधळाचे वातावरण पाहता मतदारांचा उत्साह किती राहील, याबाबतही सांशकता व्यक्त केली जात आहे. त्यावरही ब-याच गोष्टी अवलंबून आहेत.
एकूण परिस्थिती पाहता सांगलीत त्रिशंकू चित्र राहण्याचा अंदाज आहे. अशा वेळी अजित पवार यांचा राष्ट्रवादी निर्णायक भूमिका बजावू शकतो. भाजपविरोधात लढणारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला साथ देणार की, महायुतीचा गजर करीत भाजपला साथ देणार, हा खरा प्रश्न आहे.