एकीकडे महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढत असताना उत्तराखंड राज्यात हिमालयन काळ्या अस्वलांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे उत्तराखंडच्या वन विभागाने पौरी जिल्ह्यात हिमालयीन काळ्या अस्वलांना गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश काढले आहेत. गेल्या तीन महिन्यात राज्यात अस्वलांनी ७१ हल्ले केले, यात ६ लोकांचा मृत्यू झाला आणि ६० जनावरे मारली गेली. (Himalayan black bears)
का वाढले हल्ले? Himalayan black bears
तज्ज्ञ सांगतात की, जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) हे मुख्य कारण आहे. यामुळे अस्वलांचा नैसर्गिक हिवाळ्यातील झोपेचा काळ (हायबरनेशन) बिघडला आहे. पूर्वी थंडी जास्त असल्याने अस्वले डिसेंबर-जानेवारीत ३-४ महिने गाढ झोपत असत. आता थंडी कमी पडते, बर्फ कमी पडतो, म्हणून अस्वल लवकर जागे होतात आणि खाण्याच्या शोधात वस्तीकडे येतात. (Himalayan black bears)
सर्वात जास्त त्रास कुठे?
पौरी जिल्ह्यातील पैठाणी (थलिसैन ब्लॉक) हे आता अस्वल हल्ल्यांचे केंद्र बनले आहे. आतापर्यंत ४० गायी-बैल मारले आहेत. दोन गावकरी जखमी झाले आहेत. त्यामुळे संध्याकाळनंतर लोक घराबाहेर पडायला घाबरतात. संपूर्ण गावात संचारबंदीसारखी स्थिती आहे. (Himalayan black bears)
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील धारकुडी गावात जंगलात गवत आणायला गेलेल्या सात महिलांवर हल्ले करून अस्वलांनी जखमी केले. गोपेश्वर, नैनिताल, पिथौरागड, भवाली या शहरांजवळही आता अस्वले सहज दिसू लागली आहेत.
वन विभाग काय करतोय? Himalayan black bears
पौरीचे डीएफओ अभिमन्यू सिंग म्हणाले, “मुख्य वन्यजीव रक्षकांनी अस्वल मारण्याचे आदेश दिले होते. १४ नोव्हेंबरपर्यंत मारायचे होते, पण आम्ही मुदत संपेपर्यंत ते मारू शकलो नाही. कॅमेरा ट्रॅपमध्ये ४-५ वेगळी अस्वले दिसत आहेत. म्हणून नेमके कोणते अस्वल हल्ला करतेय हे ओळखणे कठीण आहे. आता आम्ही पिंजरे लावले आहेत आणि ट्रॅन्क्विलायझर मारून पकडण्याचा प्रयत्न करतो आहोत.”
दरवर्षी हल्ल्यांत वाढ
उत्तराखंड मध्ये गेल्या पंचवीस वर्षांमध्ये काळ्या अस्वलांच्या हल्ल्यांत १९७२ लोक जखमी झाले असून ६८ लोकांचे मृत्यू झाले आहेत. (Himalayan black bears)
२०२२: ५७ जखमी आणि १ मृत्यू
२०२३: ५३ जखमी
२०२४: ६५ जखमी, ३ मृत्यू
२०२५ (आतापर्यंत): ७१ जखमी, ७ मृत्यू
हिमालयीन काळे अस्वल कुठे राहते?
थंड डोंगरात: काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, नेपाल, अरुणाचल
उबदार जंगलात: राजाजी नॅशनल पार्क, कॉर्बेट, मिझोराम पर्यंत.
थंड भागात हिवाळ्यात अन्न कमी पडते. म्हणून अस्वल खूप खातात आणि झोपतात. उबदार भागात मात्र वर्षभर जागेच राहतात.
आता काय बदलले?
बर्फ कमी पडतो. त्यामुळे खूप थंडी नाही. परिणामी अस्वल लवकर जागे होतात. जंगलात फळे-बेरी कमी झाल्या. गावाजवळ कचरा टाकला जातो. अस्वले रात्री कचऱ्यातून अन्न शोधून खातात. अस्वलांची संख्या वाढली आहे, पण लक्षात येत नाही. जपान, कॅनडासारख्या देशांतही असे हल्ले वाढले आहेत. (Himalayan black bears)
भारतात पहिल्यांदाच असा आदेश
वन्यजीव तज्ज्ञ डॉ. यादवेंद्रदेव झाला म्हणाले, “भारतात आतापर्यंत अस्वलांना ‘गोळ्या घालून मारण्याचे’ आदेश कधीच दिले गेले नव्हते. उत्तराखंडमध्ये प्रथमच असे झाले आहे.”
हवामान बदलामुळे अस्वलांची झोप बिघडली, जंगलात अन्न कमी पडले, म्हणून ते गावात येऊन लोक आणि जनावरांवर हल्ले करत आहेत. ही समस्या फक्त उत्तराखंडची नाही, जगभरात वाढते आहे.