बँकॉक : थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा प्रियांशू राजावतही पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत गारद झाला. उन्नती हुडा, मालविका बनसोड आणि आकर्षी कश्यप या भारतीय बॅडमिंटनपटूंनी मात्र महिला एकेरीत पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. (Thailand Open)
जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानी असणाऱ्या लक्ष्यला आयर्लँडच्या न्हॅट नग्युएनने २१-१८, ९-२१, २१-१७ असे पराभूत केले. ही लढत १ तास २० मिनिटे रंगली. प्रियांशूला थायलंडच्या अल्वी फरहानकडून १ तास १० मिनिटे रंगलेल्या लढतीत १३-२१, २१-१७, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीमध्येही भारताची पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय-साई प्रतीक के. ही जोडी सलामीलाच पराभूत झाली. मलेशियाच्या जुनैदी आरिफ-रॉय किंग यॅप या सहाव्या मनांकित जोडीने पृथ्वी-साई यांना २२-१०, १७-२१, २१-१८ असे पराभूत केले. (Thailand Open)
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत उन्नतीने थायलंडच्या थामोन्वान निथित्तीक्राई हिचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव केला. पुढील फेरीत तिचा सामना थायलंडच्याच अग्रमानांकित पोर्नापावी चोचुवाँग हिच्याशी होणार आहे. आकर्षीने जपानच्या काओरू सुगियामावर सुमारे सव्वा तास रंगलेल्या लढतीत २१-६, २०-२२, २२-२० अशी मात केली. पुढील फेरीत तिची लढत थायलंडच्या चतुर्थ मानांकित सुपानिदा केटथाँग हिच्याशी होईल. मालविकाने तुर्कीच्या नेस्लिहान आरिनला १ तास ४ मिनिटांमध्ये २१-१२, १३-२१, २१-१७ असे पराभूत केले. दुसऱ्या फेरीत मालविकासमोर थायलंडच्या सातव्या मानांकित रॅचनॉक इंटानॉनचे कडवे आव्हान आहे. रॅचनॉकने भारताच्याच अनुपमा उपाध्यायचा पहिल्या फेरीत २१-११, २१-९ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. (Thailand Open)
महिला दुहेरीत ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद या भारताच्या तृतीय मानांकित जोडीने विजयी सलामी दिली. त्यांनी मलेशियाच्या आँग शिन यी-कार्मेन तिंग या जोडीचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या रुई हिरोकामी-सायाका होबारा या जोडीशी होईल.