कोल्हापूर : प्रतिनिधी : मित्रासमवेत क्रिकेट खेळत असताना बॉल टेरेसवर गेला. टेरेसकडे जाणाऱ्या जिन्यावरील टोपीच्या पत्र्यावर बॉल अडकला होता. तो पत्र्यावर चढला आणि पत्रावरुन जाणाऱ्या हाय व्होल्टेजच्या विद्युत तारेचा स्पर्श त्याच्या मानेला झाल्याने मोठा विजेचा शॉक बसून त्याचा मृत्यू झाला. ही घटना करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथे घडली. महमद असिफ बागवान (वय १३ रा. विमानतळ रोड, उजळाईवाडी, ता. करवीर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. (A boy who picked up a cricket ball was shocked)
टीईटीच्याविरोधात आज शिक्षकांचा मोर्चा असल्याने शाळेला सुट्टी होती. त्यामुळे उजाळाईवाडी येथे मित्रासमवेत पाचवी इयत्तेत शिकणारा मोहम्मद क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळताना मारलेला शॉटवर बॉल अर्जुन खांडेकर यांच्या बंगलाच्या स्लॅबवरील टोपीवर अडकून पडला. बॉल काढण्यासाठी मोहम्मद स्टंप घेऊन टोपीवर चढला. त्यावेळी वरुन जाणाऱ्या हाय होल्टेज तारेचा स्पर्श त्याच्या मानेला झाल्याने त्याला विजेचा जोरात शॉक बसला आणि तो उडून तो खाली कोसळला. तो खाली कोसळलयाने मोठा आवाज झाल्याने शेजारचे नागरिक धावले. परिसरातील नागरिकांनी बेशुदधावस्थेत असलेल्या मोहम्मदला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे. मोहम्मद हा पाचवीत शिकत असून त्याचे वडील रेमंड कंपनीत नोकरी करतात. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. (A boy who picked up a cricket ball was shocked)