मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेमध्ये चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाने रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) सराव केला. या सरावादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज आकाशदीप यांना दुखापत झाली. परंतु, ही दुखापत किरकोळ स्वरूपाची असून काळजीचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. (Team India Practice)
भारतीय संघातील लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी नेट्समध्ये नव्या चेंडूवर फलंदाजीचा सराव केला. दुसऱ्या नेट्समध्ये रोहित फिरकी गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव करत होता. त्याचवेळी, पुलचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याच्या गुडघ्यावर चेंडू आदळला. यानंतर, मैदानावरच त्याच्यावर उपचार करण्यात आले. सरावसत्राच्या अखेरपर्यंत तो पुन्हा चालताना व संघसहकाऱ्यांशी चर्चा करताना दिसल्याने त्याची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले.
आकाशदीपलाही नेट्समध्ये फलंदाजी करताना हाताला चेंडू लागला होता. तथापि, ही दुखापत गंभीर नसल्याचे त्यानेच सरावसत्रानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. “क्रिकेट खेळताना अशा दुखापती होणे सामान्य असते. नेट्समधील खेळपट्टी ही पांढऱ्या चेंडूसाठी तयार करण्यात आल्यामुळे तांबडा चेंडू येथे काहीवेळा खाली राहात होता. त्यामुळे तो बॅटवर न येता शरीरावर आदळला,” असे आकाशदीप म्हणाला. (Team India Practice)
भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत सरावसत्रादरम्यान प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करताना दिसला. आतापर्यंत या मालिकेत संधी न मिळालेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णानेही नेट्समध्ये गोलंदाजी केली. भारताचे सरावसत्र पाहण्यासाठी एमसीजीवर क्रिकेटप्रेमींची गर्दी जमली होती. बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलबर्न कसोटीस २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पाच कसोटींच्या या मालिकेत तिसऱ्या कसोटीअखेर १-१ अशी बरोबरी झाली आहे. (Team India Practice)
हेही वाचा :