नवी दिल्ली : तेलंगणातील काँग्रेस सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार असून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महम्मंद अझरुद्दीन यांना मंत्रीपद मिळणार आहे. अझरुद्दीन यांची नुकतीच तेलंगणा विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त म्हणून आमदार म्हणून निवड झाली आहे. तेलंगणातील ज्युबली हिल्स विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
पोट निवडणूक जिंकण्यासाठी मंत्रीपद
शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी अझरुद्दींन यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. राज्यपाल त्यांना मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. तेलंगणा राज्यात ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या मतदार संघात मुस्लीम मतदारांची मोठी संख्या आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधीत्व म्हणून अझरुद्दीन यांना मंत्रीपद दिले जाणार आहे. ज्युबिली हिल्स निवडणूक जिंकण्यासाठी मुस्लीमांची मते मिळण्याची गरज असल्याने काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. ११ नोव्हेंबर रोजी पोट निवडणूक होणार आहे. (Azharuddin)
दोन महिन्यात मंत्रीपदाची लॉटरी
ऑगस्ट महिन्यात काँग्रेस पक्षाकडून अझरुद्दीन यांना आमदार दिली होती. अझरुद्दीन यांचे नाव सूचवण्यापूर्वी काँग्रेसने कोडांदारम आणि अमेर अली खान यांच्या नावाची शिफरास राज्यपालांकडे केली होती. पण राज्यपालांनी ही नावे फेटाळली होती. त्यानंतर काँग्रेसने कोडांदारम आणि अझरुद्दीन यांचे नाव सूचवले होते. राज्यपालांनी अझरुद्दीन यांचे नाव स्वीकारल्यानंतर ऑगस्ट महिन्यात ते आमदार झाले. अवघ्या दोन महिन्यात त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली.
अझरुद्दीन यांचा परिचय
६२ वर्षीय महम्मोद अझरुद्दीन यांचा जन्म हैद्राबाद येथे झाला. हैद्राबादमधील ऑल सेंटस् स्कूल, निजाम कॉलेज, उस्मानिया विश्वविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. ते कॉमर्सचे पदवीधर आहेत. १९८४ मध्ये भारतीय क्रिकेट संघात त्यांची निवड झाली. ९९ कसोटी सामन्यात त्यांनी ६२१५ धावा जमवल्या. १९९ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या. २२ शतके आणि २१ अर्धशतके झळकावली. एक दिवसीय सामन्यातही त्यांनी ठसा उमटवला होता. ३३४ सामन्यात ३०८ वेळा खेळताना ९३७८ धावा केल्या. १५३ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. वन डे मध्ये सात शतके आणि ५८ अर्धशतके झळकावली. अझरुद्दीन उत्कृष्ट आणि चपळ क्षेत्ररक्षक होते. त्यांनी १५६ झेल पकडले. एक दिवसीय सामन्यात वेगवान शतक झळकावण्याचा पहिला मान आझरुद्दीन यांना मिळाला होता. इंग्लंडविरुद्ध त्यांनी ८७ चेंडूत शतक केले होते. (Azharuddin)
ईडन गार्डन मैदानावर पाच शतके
कोलकोत्यातील ईडन गार्डन हे त्यांचे आवडते मैदान होते. सात कसोटी सामन्यात त्यांनी पाच शतके ठोकली होती. यशस्वी भारतीय कर्णधार म्हणून त्यांची गणना होते. १०३ सामन्यात त्यांनी भारतीय संघाला १४ सामने जिंकून दिले. त्यांचा विक्रम सौरभ गांगुलीने मोडला. १९८६ मध्ये अर्जुन पुरस्कार, पदमश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. १९९१ मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ एअर पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मॅचफिक्सिंगचा आरोप त्यांच्यावर केल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर आजन्म बंदी घतली. त्यामुळे त्यांची क्रिकेटमधील कारकीर्द थांबली. २०१२ मध्ये त्यांच्यावरील झालेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली.
२००९ मध्ये राजकीय प्रवासास सुरुवात
२००९ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. २००९ मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. ते ५० हजार मताधिक्यांनी विजयी झाली. २०१४ च्या निवडणूकीत ते पराभूत झाले. तरीही ते काँग्रेस पक्षाशी संग्लन राहिले. तेलंगणा विधान परिषदेत ते आमदार झाल्यानंतर आता मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. (Azharuddin)