ज्या तरुणांना कोणतेही विधायक ध्येय नाही, जे कुणाच्याही कामात पडत नाही, ज्यांना कशाचीही जाणीव नाही, जे कोणतीही चांगली जबाबदारी उचलत नाहीत, जे फक्त आलेला दिवस ढकलून पुढे जात आहेत. यांनाच बुडेकीन हाडामांसाचा कचरा म्हणतो. खरंतर असे तरूण आज घराघरात सापडतात. (Parenting)
-अजय पाटील
कामानिमित्ताने एका घरी गेलो होतो. तिथे घरातील महिला आपल्या साधारण १४-१५ वर्षाच्या मुलावर ओरडत होती. तुला सगळं जागेवर आयतं पाहिजे, घरातलं कोणतंही काम करत नाही. साधं दळण दळून आणणे तुझ्या जीवावर येते. तिकडून मुलगा मात्र आईला उलट उत्तरं देत होता. आता असे संवाद घराघरात ऐकायला मिळतात.
काही वर्षांपूर्वी ‘ब्ल्यू व्हेल’ नावाचा एक व्हिडिओ गेम आला होता. हा गेम खेळून मुलं जगभरात आत्महत्या करायला लागली. विशेष म्हणजे या गेममुळे सर्वांत जास्त आत्महत्या भारतात झाल्या. या गेममध्ये खेळणाऱ्याला वेगवेगळे टास्क देण्यात यायचे. आणि शेवटचे टास्क आत्महत्या करण्याचे असायचे. साधारणपणे आपल्याला वाटतं असं कुणीही करू शकत नाही मात्र हा गेम खेळून मुलं चक्क आत्महत्या करायला लागली. एक चाइल्ड काऊन्सलर म्हणून माझ्यासाठी हा प्रचंड आश्चर्याचा विषय ठरला. त्यामुळे मी याचा अभ्यास केला. त्यानंतर याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी अनेक शाळांमध्ये कार्यक्रमही घेतले. या गेमचा डेव्हलपर होता रशियाचा ‘फिलिप बुडेकीन.’ या गेममुळे जगभरात आत्महत्या व्हायला लागल्यामुळे रशियात या तरुणाला अटक झाली. आणि जगभरात या गेमवर बंदी घालण्यात आली. हा तरुण तसा जीनियस वर्गात मोडणारा. मात्र याने त्याचं डोकं भलत्याच ठिकाणी वापरलं होतं. अटक झाल्यावर पोलीस आणि या तरुणाचे संभाषण जगभरात व्हायरल झाले आणि जगात खळबळ उडाली. हा बुडेकिन पोलिसांना म्हणाला तुम्ही मला अटक कशासाठी केली उलट तुम्ही मला पुरस्कार द्यायला हवा हे ऐकून पोलीस चक्रावले. (Parenting)
मात्र पोलिसांनी उत्सुकतेने त्याला विचारले की तुला पुरस्कार कशासाठी द्यायला हवा तू तर तुझ्या गेममुळे अनेकांचे जीव घेतले आहेत. मग या बुडेकीनने पोलिसांना प्रश्न केला ज्यांनी माझ्या गेममुळे आत्महत्या केली ते कोण होते याचा तपास केला का??
पोलीस म्हणाले हे तरुण वर्गातील मुलं होती, त्यातल्या त्यात टीनेजर मुलांनी सर्वांत जास्त आत्महत्या केल्या. (Parenting)
मग बुडेकिन पोलिसांना म्हणाला, तुम्ही ज्यांना तरुण आणि टीनेजर म्हणत आहात ते सर्व माझा गेम खेळत होते एवढा वेळ आणि डेडिकेशन त्यांच्याकडे होतं. याचाच अर्थ त्याशिवाय त्यांना आयुष्यात कोणतंही काम नव्हतं. त्यामुळेच त्यांनी माझ्या गेमला एवढं सीरियसली घेतलं. त्यांनी आत्महत्या करणं पसंत केलं याचा अर्थ जगण्यातही त्यांना विशेष रस नव्हता.
हे सर्व आत्महत्या करणारे त्यांच्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या काहीही कामाचे नव्हते. हा फक्त ‘हाडामांसाचा कचरा’ होता जो मी साफ केला. यासाठीच तुम्ही मला पुरस्कार द्यायला हवा. कारण मी समाजातून हा कचरा हटवण्याचे महान कार्य केले आहे.
हे संभाषण वाचल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला. बुडेकिनने एक भयंकर प्रश्न जगासमोर उपस्थित केला होता. तो सायकोपॅथ होता. त्याने सरळ अशा मुलांना मरणाची शिक्षा दिली. पण एक प्रश्न मात्र जगासमोर उपस्थित होतोच जो मुळात घराघरात विचारला गेला पाहिजे जो या ‘जाणीव’ आणि ‘जबाबदारी’ नसलेल्या तरुण पिढीबद्दल आपल्याला अंतर्मुख करतो. आपली मुलं खरंच बुडेकीन म्हणतो तशी हाडामांसाचा कचरा आहे तर नाही ना !!!
ज्या तरुणांना कोणतेही विधायक ध्येय नाही, जे कुणाच्याही कामात पडत नाही, ज्यांना कशाचीही जाणीव नाही, जे कोणतीही चांगली जबाबदारी उचलत नाहीत, जे फक्त आलेला दिवस ढकलून पुढे जात आहेत. यांनाच बुडेकीन हाडामांसाचा कचरा म्हणतो. खरंतर असे तरूण आज घराघरात सापडतात. एक काऊन्सलर म्हणून तरी मला बुडेकिनने उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असेच वाटते. ही तरुणाई पालक, नातेवाईक, शाळा, कॉलेज, समाज सर्वांपासून तुटलेली आहे. ते शरीराने सगळीकडे असतात मात्र मनाने कुठेच नाही. असे तरुण मानसिक, भावनिक विकलांग होत चालले आहे. पालकांचे अशा घरातील तरुणाईकडे खूप दुर्लक्ष होत आहे. फक्त मुलं म्हणून आंधळ्या प्रेमाने या तरुणांचे पालन पोषण केले जात आहे. पण घरातील कोणतीही जबाबदारी यांच्यावर टाकली जात नाही. यामुळेच या तरुणाईमध्ये पोकळ अहंकार वाढत जातो. या तरुणाईला फक्त सर्व सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे. मात्र, त्या बदल्यात कोणतीही जबाबदारी उचलायला ही तरुणाई तयार नाही. खऱ्या जगामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यापेक्षा स्मार्टफोनच्या काल्पनिक जगामध्ये रमायला या तरुणाईला आवडते. आणि इथेच फिलीप बुडेकिनसारखे लोक त्यांना भेटतात जे त्यांना आत्महत्यासारखे आयुष्य संपवणारे भयानक ध्येय देऊ शकतात. आणि विशेष म्हणजे ही तरुणाई ते ध्येय स्वीकारते सुद्धा.
पालकांनो, तुमच्या घरातही अशी तरुणाई असेल तर त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाका. त्यांना सर्वच गोष्टी आयत्या देऊ नका. शाळा, कॉलेज, अभ्यास आणि मार्क्स यापलीकडे त्यांचं आकाश विस्तारायला मदत करा. त्यांच्यामध्ये वेगवेगळे खेळ आणि छंद रुजवायला पुढाकार घ्या. त्यांना माणसांमध्ये मिसळणे शिकवा, त्यांना सोशल बनवा. तसेच समाजाप्रती एखादी जबाबदारी उचलण्याची त्यांना प्रेरणा द्या. ‘आयुष्य सुंदर आहे’ असे या तरुणाईला वाटायला हवे. जे त्यांना त्यांच्यात ‘जाणीव’ आणि ‘जबाबदारी’ निर्माण झाल्याशिवाय वाटणार नाही.
नाहीतर तुमच्या घरातली ही तरुणाई सुद्धा फक्त हाडामांसाचा कचरा बनून जाईल. तुमचे दुर्लक्ष झाल्यास तुमची मुलं तुम्ही गमावून बसाल. पश्चातापाची वेळ येण्याआधी काळजी घ्या.
(चाइल्ड काऊन्सलर, जिंदगी फाउंडेशन, जळगाव)