पुण्यात आमचं बिऱ्हाड होतं. विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या वाड्यात आम्ही राहत होतो. सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांचं घर कसं, तर दोन शंकराची मंदिरं, अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर आणि त्याचे पुजारी म्हणून पेशव्यांनी चित्रावांची नेमणूक केली होती. चित्रावांनी चारही वेदांचे सर्वात आधी भाषांतर केले. त्यांचे हे भाषांतराचे काम चालू असायचे. ग्रंथसमृद्धी म्हणजे काय, हे मी त्या वाड्यात अनुभवले. त्या वाड्यात चित्रावांची एक स्वतंत्र अभ्यासिका होती. तेथे निरनिराळे मोठमोठाले जड ग्रंथ असायचे. चित्राव तेथे मांडीवर ते ग्रंथ घेऊन वाचत बसलेले दिसायचे. या वातावरणाचा नकळत प्रभाव माझ्यावर पडला, पुढच्या आयुष्यात एकाहून एक थोर ज्ञानवंतांनी माझे आयुष्य समृद्ध केले.
- तारा भवाळकर
………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….
बालपणातील जडणघडणीवर कोणत्या ज्ञानवंतांचा प्रभाव पडला याचा विचार केला तर लोकसंस्कृतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने लहानपणी फार काही कळत नव्हते. मात्र ज्याला आपण अनुभव म्हणतो तो गोळा करत गेले. मग जेव्हा सैद्धांतिक अभ्यास सुरू केला तेव्हा त्याचे विश्लेषण या अनुभवाच्या आणि अनुभव देणाऱ्या ज्ञानवंतांच्या आधारे जमत गेले. (Tara Bhawalkar)
माझे एक आजोबा होते, ते नाशिकला राहायचे. त्यावेळी हल्लीच्या सारखे नातेसंबंध बंदिस्त नव्हते, त्यामुळे सर्व चुलते, मामा, काका आत्या सर्वांचे एकमेकांकडे जाणे येणे असायचे. मी नाशिकला माझ्या पहिल्या नोकरीसाठी गेले, त्याअगोदर नाशिकला माझ्या आईचे काका रावसाहेब पिंगळे असल्यामुळे आमचे जाणे होई. ते काका त्या काळात खूप शिकलेले आणि एज्युकेशन इन्स्पेक्टर होते. त्यांचे मूळ नाव नारायणराव पिंगळे, रावसाहेब हा किताब त्यांना इंग्रजांच्या काळात मिळाला होता. नारायणराव हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. ते एकीकडे डेक्कन कॉलेजचे पदवीधर होते, एज्युकेशन इन्स्पेक्टर होते, सोबतच त्यांना अनेकविध छंदही होते.
भवतालच्या ज्ञानाचे धडे
माझी पहिली नोकरी नाशिकला लागली ती वयाच्या अठराव्या वर्षी. एका शाळेत शिक्षिका म्हणून ती नोकरी होती. आजोबा त्यावेळी नोकरीतून निवृत्त झाले होते, मात्र अनेकविध कामांमध्ये ते व्यग्र असायचे. श्रीधर व्यंकटेश केतकरांचा ज्ञानकोश मी पहिल्यांदा त्या घरात बराचसा वाचू काढला. आजोबा बागेत काम करायचे. म्हणजे झाडांना पाणी घालताना, झाडांवर जंतुनाशकांचा फवारा मारताना त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने हे शिकवले, की जंतुनाशकांचा फवारा पानांच्या मागील बाजूने मारायचा, वरच्या बाजूने कधीही फवारा घालायचा नाही. त्यांचे घर नाशिकला गावाच्या बाहेर होते, बाजूने एक ओढा वाहात होता. त्या ओढ्यामध्ये केतकीची झाडे होती. ज्याला आपण केवडा म्हणतो,
ते केवड्याचे झाड कसे दिसते, कुठे उगवते व त्या केवड्याचे कणीस कसे उगवते, त्या केवड्याच्या कणसाभोवती नाग कसा वेटोळा घालतो, हे आजोबांनी मला प्रत्यक्ष तेथे नेऊन दाखवले. तेथे खाली नागरमोथा नावाची वनस्पती होती. त्याची मुळं असायची खाली, त्या मुळाच्या खाली गाठी येतात व त्या गाठींच्या आत सुगंध येतो ज्याला आपण ‘खस’ म्हणतो, म्हणजे खसची निर्मिती या वनस्पतीपासून होते. आजोबा ती मुळं उपटून आणून ती ठेचून आम्हाला त्याचा कसा सुगंध येतो, हे दाखवत असत. म्हणजे जगण्यातल्या या मूलभूत गोष्टी ज्याला तुम्ही आताच्या काळात पर्यावरण म्हणा किंवा वनस्पतीशास्त्र म्हणा, ते मला त्या आजोबांनी शिकवले. (Tara Bhawalkar)
आजोबांची शिकवणी
भाजीबाजारातून भाजी निवडून कशी आणायची, हे मला आजोबांनी शिकवले. नाशिकला खूप मोठा भाजीबाजार भरतो. अनेक विविध प्रकारच्या भाज्या तेथे असत. चांगली भाजी कशी समजायची, फळ पक्व कसे होते, हे मला आजोबांनी शिकवले. आयुर्वेदाचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. उच्चार कसे करायचे, त्यामधील बारकावे काय हे ते शिकवायचे. मोडाची उसळ कशी शिजवायची यामागचे शास्त्रीय कारण ते सांगायचे. म्हणजे ती उसळ फोडणीला टाकल्यानंतर पूर्ण तडतडू द्यायची, ज्यामुळे त्यामधील स्टार्च फुटतो व कडधान्यांमधील स्टार्च फुटल्याशिवाय ते कडधान्य पूर्णपणे शिजत नाही, हे यामागचे शास्त्रीय कारण, जे आजकाल होम सायन्समध्ये देखील कितपत सांगितले जाते, मला याची कल्पना नाही. जगण्यातील अशा अनेक बारीकसारीक गोष्टी मी या आजोबांकडून शिकले. (Tara Bhawalkar)
आजोबांची सिलोनवारी
माझे हे आजोबा पाली भाषेचे अभ्यासकही होते. गौतम बुद्धांचे जे ग्रंथ मूळ पाली भाषेत लिहिले आहेत, ते त्यांनी वाचले होते. गौतम बुद्धांचा अभ्यास करणारे मोठे अभ्यासक धर्मानंद कोसंबी जे फर्गसन महाविद्यालयात इंडॉलॉजीचे प्राध्यापक होते, ते आणि हे आजोबा मित्र होते. श्रीलंकेत (आधीचे सिलोन) बौद्ध धर्माचे मोठमोठे मठ (पॅगोडा) आहेत. जेथे बौद्ध धर्माविषयीची प्राचीन हस्तलिखिते आहेत, त्यांचा अभ्यास करायला माझे आजोबा आणि धर्मानंद कोसंबी गेले होते. त्या काळात तो प्रवास लांबचा, दीर्घ आणि खूप बिकट होता. त्या अनुभवांवर त्यांनी पुस्तकही लिहिले आहे. त्यांच्या त्या आठवणी पुढे मला खूप उपयोगी ठरल्या.
बौद्ध धर्म आणि मांसाहार
त्या पुस्तकात हिंसा म्हणजे काय, मांसाहार करावा का याविषयीची तत्त्व नेमकी काय आहेत, ते मला सापडले. आज आपण शहरी लोक या सगळ्या तत्त्वांना खूप ढोबळमानाने घेतो. पण बौद्ध धर्माची शिकवण काय आहे, त्या तत्त्वांमधील बारकावे काय आहेत, हे मला त्या अनुभवांमधून कळले. बौद्ध धर्मात हिंसा चालत नाही, मात्र मांसाहार केला तर चालतो म्हणजे, दुसऱ्या कुणीतरी हिंसा केली आणि मी मांसाहार केला तर चालतो. कारण तो प्राणी कधी मारला गेला आहे, कुणी मारला आहे हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्ही स्वतः हिंसा केली नाही, म्हणजे बुद्धांच्या आदेशाचे पालन केले आहे. स्वतः हिंसा न करता दुसऱ्या कुणीतरी मारलेल्या जनावरांचे मांस आम्ही खाऊ शकतो,
असे अनेक मजेशीर युक्तिवाद बौद्ध भिक्षुनी केले आहेत. आजही जर आपण पाहिले तर ज्या ज्या देशांमध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला गेला आहे तेथील लोक प्रामुख्याने मांसाहारी आहेत, पण ‘अहिंसक’ मुळामध्ये लोकसंस्कृती समजून घ्यायची म्हणजे, ती अशा वेगवेगळ्या अंगांनी समजून घ्यावी लागते. म्हणजे त्यामध्ये मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, धर्माच्या चालीरीती हे सर्व काही येते. या अनुषंगाने आजोबांचा असा खूप प्रभाव माझ्यावर पडला.
उपजत शहाणिवेतून ज्ञान
माझी आई इयत्ता दुसरी शिकलेली बाई. मात्र तिची विचार करण्याची क्षमता जबरदस्त होती. हे मला आता जाणवते. आजकालच्या तथाकथित उच्चशिक्षित बायका कर्मकांड, पूजा अर्चा, व्रतवैकल्य यामध्ये इतक्या गुंतलेल्या आहेत. माझ्या आईच्या भोवताली तर हाच सगळा गोतावळा होता खेड्यातही आणि शहरात सुद्धा. म्हणजे आम्ही पुण्यात आलो तेव्हाही. मी लहानपणापासून खूप वाचन करायचे म्हणजे अगदी सहावी-सातवीत असताना मी सावरकरांची ‘माझी जन्मठेप’ आणि ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ ही पुस्तके वाचली होती. तेव्हा माझ्या वाचनात श्री. म. माट्यांचे एक पुस्तक आले. ज्यामध्ये त्यांनी शंकराच्या मंदिरात जे शिवलिंग असते, त्याची आदिम काळात कशी निर्मिती झाली व पूजेला सुरुवात कशी झाली याचे वर्णन केले होते. माझ्या आईने त्यावेळी माझ्याकडे असलेले ते पुस्तक वाचले आणि ती म्हणाली, अरेच्चा, यासाठी करतात ही पूजा, मग आता ही पूजा मी करणार नाही आणि तिने त्यानंतर हरतालिका आणि शिवलिंग पूजा करणे सोडून दिले.
आपण आज स्त्रीमुक्तीच्या गोष्टी करतो. स्त्रियांना अमुक सवलत आणि पुरूषांना तमुक सवलत असे सगळे आपण म्हणतो, पण त्या काळात माझे वडील सेवानिवृत्त झाल्यावर माझ्या आईने मला एक प्रश्न विचारला, की बायकांना कधीच सेवानिवृत्त होता येत नाही का? आता ‘आई रिटायर होते आहे’ अशी नाटके येतात. मात्र दुसरी इयत्ता शिकलेल्या एका खेड्यातील बाईला त्या काळात हा प्रश्न पडला होता आणि तिने तो विचारला होता.
शिक्षणाने शहाणपण येत नाही
केवळ शिक्षणाने शहाणपण येत नाही, हे मी लोकसंस्कृतीत मुरलेल्या बायकांकडून शिकले. जात्यावर दळणाऱ्या बायकांनी मला खूप शिकवले. जात्यावरची ओवी माझा खूप प्रिय विषय आहे. माझे असे म्हणणे आहे, की मला पुस्तकांनी बरेच शिकवले, जगाने बरेच शिकवले, पण माझी जी सुरुवात केली ती आमच्या जात्यावर दळण दळणाऱ्या स्त्रियांनी आणि संत स्त्रियांनी. दिसायला या सगळ्या तुमच्या भाषेत ‘अडाणी’ होत्या, म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. मात्र लिहिता वाचता येणारे लोक प्रत्यक्षात किती अडाणी आहेत, हे माझ्या ‘अडाणी’ बहिणाबाईने सांगितले.
“अरे माणसापरी माणूस राहतो रे येडाजाना आणि छापिसनी होतो कोरा कागद शहाना”
कोऱ्या कागदावर छापले तर कोरा कागदही शहाणा होतो. मात्र छापलेले हे कागद वाचणारा माणूस शहाणा होईलच. याची खात्री नाही म्हणजे माणूस हा येडाजाणाच राहणार.
मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले. पुण्यापासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आमचं गाव, शेतीचं गाव आमचं त्यामुळे दळण, कांडण व्रतवैकल्य हे सर्व काही यथासांग चालत असे. अठरापगड जातीची माणसं घरी असायची.
हादग्याची गाणी, भोंडल्याची गाणी, कीर्तन, प्रवचन हे सगळे कानावर पडायचे. अंधश्रद्धा निर्मूलनच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींमधून मी शिकत गेले. मला एका कीर्तनकार बुवांचे कीर्तन आठवते, लहानपणी ऐकलेले. ते कीर्तनकार बुवा त्यांच्या कीर्तनात एक वाक्य म्हटले होते, ते माझ्या आजही लक्षात आहे. ते म्हणाले होते की, “देव कुणालाही स्वतःच्या पदरचे काहीही देत नाही, तर एकाचे काढून दुसऱ्याला देतो.” आपल्या आजच्या व्यापारी अर्थव्यवस्थेत हे विधान किती तंतोतंत लागू होते.
लिहिता वाचता येणारे लोक प्रत्यक्षात किती अडाणी आहेत, हे माझ्या ‘अडाणी’ बहिणाबाईने सांगितले. “अरे माणसापरी माणूस राहतो रे येडाजाना आणि छापिसनी होतो कोरा कागद शहाना” कोऱ्या कागदावर छापले तर कोरा कागदही शहाणा होतो. मात्र छापलेले हे कागद वाचणारा माणूस शहाणा होईलच. याची खात्री नाही म्हणजे माणूस हा येडाजाणाच राहणार.
ज्ञानस्रोतांचा अधिवास
या सगळ्या वातावरणात मी लहानाची मोठी झाले. पुण्यात आमचं बिऱ्हाड होतं. विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या वाड्यात आम्ही राहत होतो. सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांचं घर कसं, तर दोन शंकराची मंदिरं, अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर आणि त्याचे पुजारी म्हणून पेशव्यांनी चित्रावांची नेमणूक केली होती. त्यांची पूर्ण पदवी होती महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव अशी होती. ज्यांनी काशीला जाऊन सर्व दशग्रंथांचे भाषांतर केले आहे, वेदाध्ययन केले आहे त्यांना ही पदवी दिली जाते. चित्रावांनी चारही वेदांचे सर्वात आधी भाषांतर केले. त्यांचे हे भाषांतराचे काम चालू असायचे. ग्रंथसमृद्धी म्हणजे काय, हे मी त्या वाड्यात अनुभवले. त्या वाड्यात चित्रावांची एक स्वतंत्र अभ्यासिका होती. तेथे निरनिराळे मोठमोठाले जड ग्रंथ असायचे. चित्राव तेथे मांडीवर ते ग्रंथ घेऊन वाचत बसलेले दिसायचे. या वातावरणाचा नकळत प्रभाव माझ्यावर पडला, असे मला वाटते. त्या चारही वेदांचे भाषांतर आजही माझ्याकडे आहे.
त्या वाड्यात दरवर्षी एक यज्ञ होत असे. शंकराचार्य स्वतः त्या वाड्यात येत असत तेव्हा त्यांची पालखी कशी असते, यज्ञ कसा करतात, हे सर्व मी जवळून पाहिले.
लग्नसोहळ्यांचे अवलोकन
एका बाजूस अमृतेश्वर, एका बाजूस सिद्धेश्वर एका बाजूला लक्ष्मी आणि विष्णूचे मंदिर तर दुसऱ्या बाजूला प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचे मंदिर दारात पहाऱ्याला मारूती आणि मधे आम्ही काही माणसं या देवांच्या गराड्यात राहत होतो. तेथे मोठेमोठे मंडप होते. या ठिकाणी सण, व्रतवैकल्य, पूजा, प्रवचन, कीर्तन, बायकांची गाणी हे सर्व अखंड चालू असे. घरी गावाकडे गणपतीचे देऊळ होते. तिथे आजोबांची पूजाअर्चा, गणपतीचा उत्सव हे सर्व चालू असे. विष्णूच्या मंदिरात काकड आरती चालत असे. या ठिकाणी विविध जाती, स्तरांतील लग्न होत असत. आम्ही सर्व लहान मुले एक जागा पकडून हे लग्नसोहळे पाहत असू. पुढे लोकसंस्कृतीच्या अभ्यासातील केवळ आपल्याच जाती किंवा स्तरातील नव्हे तर अन्य जाती आणि स्तरांतील लग्नाच्या पद्धती, चालीरीती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी लहानपणीच या निमित्ताने मिळाली. त्यावेळी तेथे काकड आरती होत असे. या काकड आरतीची सर्व विधिविधाने चित्रावांच्या पत्नी सौ. यमुताई करत असत.
थोरामोठ्यांचे विचार दर्शन
पुण्यात सर्वच पेठांमध्ये आमचे नातेवाईक राहत असत, त्यामुळे सर्वत्र पायी संचार असे. त्यावेळी सदाशिव, कसबा, नारायण आणि शनिवार या चार पेठांना पुण्यातील वैचारिक आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हटले जाई. या सर्व पेठांमध्ये आमचा वावर असे. चित्रावांकडे तेव्हा साने गुरुजी येत असत. साने गुरूजी नेमके कोण हे मला नंतर कळले, पण नकळत या सर्व ज्ञानवंतांना मी त्या ठिकाणी पाहत होते. चित्रावांच्या वाड्याच्या जवळच ‘साधना’ साप्ताहिकाचे कार्यालय होते. साने गुरुजी तिथेच राहत असत. पुण्यात मी अनेक व्याख्याने भाषणे ऐकली. महात्मा गांधी, पंडित नेहरुंना पाहिले. स्वातंत्र्यानंतरचा पहिला स्वातंत्र्यदिन मी शनिवरवाड्यासमोर साजरा केला. तेव्हा मी तिसरी-चौथीत असेन, पण त्या आठवणी आजही मनात खूप पक्क्या आहेत. इंग्लंडचा युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा ध्वज शनिवारवाड्यावर फडकवला गेला, हे मी पहिल्या स्वातंत्र्यदिनाला तेथे पाहिले. पुण्यात असताना आचार्य अत्र्यांच्या सभा, त्यांची भाषणे ऐकली. त्यांची उभे राहण्याची, बोलण्याची शैली मी प्रत्यक्ष पाहिली व पुण्यात असताना या सर्व ज्ञानवंतांच्या गोतावळ्यात मी नकळत समृद्ध होत गेले.
सर्वसमावेशक उदारता
माझे अनेक नातेवाईक त्यावेळी राजकारणात सक्रिय होते. माझे एक मामा ग. प्र. प्रधानांचे सचिव होते. माझी एक मावशी स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसमध्ये होती. अजून एका मावशीचे कुटुंबातील सदस्य हिंदुत्त्ववादी विचारधारेच्या पक्षात होते तर माझा एक मावस भाऊ कम्युनिस्ट पक्षात होता. या इतक्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या माणसांसोबत मी वाढत होते. मात्र हे सगळे लोक गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत मिसळत, समारंभात एकत्र येत, जे आजकाल घडत नाही. सर्वसामावेशक उदारता मला या लोकांकडून खूप कमी वयात शिकायला मिळाली. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहिली की मला विमनस्क वाटते, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ सत्तर पंचाहत्तर वर्षांतच या देशातील माणसे अशी काय वागायला लागली.
नामवंत ज्ञानवंत
नाशिकला मुलींच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्यावर माझ्या भोवतालचा ज्ञानवंतांचा गोतवळा अधिकच वाढला. मी त्या वेळी नोकरी करत बहिस्थ पद्धतीने शिक्षणही चालू ठेवले होते. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते कृ. द. बेदरकर. विनोबाजींच्या भूदान चळवळीत काम केलेले बेदरकर हे सुद्धा उदारमनस्क होते. बेदरकरांमुळे माझा कुसुमाग्रजांशी परिचय झाला. त्यांचा सहवास मिळाला कारण कुसुमाग्रज हे बेदरकरांचे शेजारी होते. मी बहिस्थ शिक्षण घेत असताना अजूनही काही तीन चारजणी नोकरी सांभाळत धडपड करत शिक्षण घेत होत्या. हे जेव्हा नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयात कळले, तेव्हा मी नोकरी करत असलेल्या शाळेत दर शनिवार-रविवार मार्गदर्शन वर्ग खास आमच्यासाठी सुरू करण्यात आले. हे वर्ग सुरू करण्यात पुढाकार ज्यांनी घेतला त्यांचे नाव होते, मामा पाटणकर. पाटणकर हे प्रसिद्ध नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे जावई होते. नाशिकला असताना माझ्या एज्युकेशन इन्स्पेक्टर आजोबांचे
मित्र असलेल्या रेव्हरंड टिळक व लक्ष्मीबाई टिळक यांच्या कुटुंबाशी संपर्क आला. त्यावेळी निर्माण झालेले घरगुती संबंध आजतागायत पुढच्या पिढीसोबतही म्हणजे, लक्ष्मीबाई टिळकांची पणती दिवंगत मुक्ता टिळक यांच्यासोबत आहेत.
त्याच दरम्यान, कुसुमाग्रजांच्या कुटुंबासोबतही असेच संबंध निर्माण झाले. जे आजही कायम आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सुरुवातीच्या स्थापनेच्या वेळच्या काही संस्थापकांपैकी मी एक आहे. या कामात पुढाकार घेतलेले डॉ. बाळासाहेब दातार हे माझे पीएच.डी.चे गाइड होते. अशा प्रकारे नाशिकमध्ये मला ज्ञानवंतांचा गोतावळा लाभला.
साहित्यातली प्रभावळ
एम.ए. झाल्यानंतर मी सांगलीच्या महाविद्यालयात रुजू झाले. सांगलीत आल्यानंतरही माझ्या भोवतालच्या ज्ञानवंतांच्या गोतावळ्यात वाढच होत गेली. कारण सतत वेगवेगळ्या क्षेत्रांत लुडबुड करण्याचा माझा स्वभाव आहे. नाशिकला प्राथमिक शाळेत मी सुरूवातीला क्रीडा शिक्षक होते, तेव्हा विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे किंवा नृत्य बसवणे यामध्ये मी सक्रिय असायचे. अनेकजण मला म्हणतात की लोकसंस्कृती हा माझा विषय आहे, मात्र मी म्हणेन की नाटक हा माझा पहिला प्राधान्य विषय आहे. माझ्या संशोधनाचा विषयही त्यामुळे नाटक हाच होता.
सांगलीत आल्यावर नाटक व अभिनय क्षेत्रात रुची असलेल्या काही प्राध्यापक मंडळींनी मिळून आम्ही अमॅच्युअर ड्रामाटिक असोसिएशनची (ADA) स्थापना केली. याद्वारे आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाट्यस्पर्धा आयोजित करत असू. मला स्वतःला दरवर्षी उत्कृष्ट अभिनयाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळत असे. सांगलीला विलिंग्डन महाविद्यालयात प्रसिद्ध समीक्षक म. द. हतकणंगलेकर, किर्लोस्कर कुटुंबातील व स्त्री सुधारणांच्या पुरस्कर्त्या मालतीबाई किर्लोस्कर व प्रसिद्ध नाटककार वसंत कानिटकर यांचे वडील कवी गिरीश यांचा मला त्या काळी सहवास लाभला. स्वातंत्र्यपूर्व काळातील रवीकिरण मंडळातील प्रसिद्ध तीन कवींना मी या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवले.
नाटकांमुळे वर्तुळाचा विस्तार
सांगलीमध्ये रंगभूमीवरील प्रयोगशील नाटकांमुळे ज्ञानवंतांचे वर्तुळ विस्तारत गेले. दिलीप प्रभावळकर, रत्नाकर मतकरी, दामु केंकरे, विद्याधर गोखले, जब्बार पटेल, विजय तेंडुलकर, अतुल पेठे या सर्जनशील व्यक्तींसोबत संपर्क आला. रीमा लागू, सुलभा देशपांडे या तर माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. सांगली रंगभूमीची पंढरी मानले जाते. विष्णुदास भावेंनी पहिले नाटक रंगभूमीवर आणले व म्हणूनच माझ्या संशोधनाचा विषय अर्थातच नाट्यशास्त्र होता. त्यात विष्णुदास भावे यांचे नाटक नक्की कुठून आले, याचा शोध घेत खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत फिल्ड वर्क (क्षेत्रीय कार्य) केले.
मग ते कोकणातील दशावतार असो की केरळ, कर्नाटकातील यक्षगान असो. यक्षगानवरील पहिले पुस्तक हे माझे प्रकाशित झाले आहे. मला शासनाचा पहिला पुरस्कार हा नाटकावरील पुस्तकासाठी मिळाला आहे. लोकनाट्याचा अभ्यास करत असताना मी लोकसंस्कृतीकडे वळले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कथकलीचा अभ्यास करायला मी केरळमध्ये जाऊन आले. तंजावुरला सरस्वती महाल ग्रंथालयात शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्या वंशातील राजांच्या नाटकांचा अभ्यास केला. भोसले कुळातील अनेक राजे लेखक व कलावंत होते. त्या सर्व नाटकांची मी अधिकृत सूची तयार केली.
लोकसंस्कृतीचे ज्ञानवंत
संशोधनाच्या क्षेत्रात नरहर कुरुंदकर आणि रामचंद्र चिंतामण ढेरे हे ज्ञानवंत मला भेटले. लोकसंस्कृतीच्या अभ्यासातील व संशोधनातील अनेक बारकावे मी रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्याकडून शिकले. स्त्रीमुक्ती चळवळीतील छाया दातार, पुष्पा भावे, कमल देसाई, विद्या बाळ, निर्मलाताई पुरंदरे
यांसारख्या मैत्रिणी मला लाभल्या. लोकसंस्कृतीतून स्त्रीमुक्तीचा धांडोळा घेण्याचे काम माझ्या हातून घडले. पुढे स्त्रीमुक्तीचे कार्य करत असताना नारायण सुर्वेशी संपर्क आला. सुर्वेनी आग्रह करून माझी सुरूवातीची पुस्तके प्रकाशित केली. (लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा).
जागतिक दर्जाचे भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर यांची मी विद्यार्थिनी. याठिकाणी मी हे शिकले, की भाषेमध्ये शुद्ध व अशुद्ध असे काही नसते. भाषेचे मुख्य काम म्हणजे प्रक्षेपण करणे. विचार, भावना यांची आदानप्रदान करणे. ते आदान आणि प्रदान यांची क्रिया जेथे पूर्ण होते म्हणजे येथे संदेश गेला, तो समोरच्याने ग्रहण केला हे मला समजले, म्हणजे भाषेचे काम पूर्ण झाले. याठिकाणी संवाद घडतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “ये हृदयीचे त्या हृदयी घातले.”
प्रशासकीय क्षेत्रातील लक्ष्मीकांत देशमुख, शेखर गायकवाड यांच्यासारख्या ज्ञानवंत अधिकाऱ्यांसोबतही स्नेहाचे संबंध आहेत. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य करत असताना नरेंद्र दाभोळकरांसोबत काम केले. नरेंद्र दाभोळकर हयात असताना काही वर्षे मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून कामही केले आहे.
तर्कतीर्थांचा सहवास
बालपणात पुण्यात विद्यानिधी सिद्धेश्वर चित्रावांचा सहवास मला लाभला, तर आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच एक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ज्ञानवंतासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. वाई येथील प्राज्ञ पाठशाळेतील व संस्कृतचे मोठे विद्वान आदरणीय लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विश्वकोशाच्या प्रकल्पाचे काम चालू होते. त्यांचे अठरा-एकोणीस खंडांचे काम पूर्ण झाले. त्यानंतर त्यांना लोकसंस्कृती या विषयावर काम करायचे होते. त्यासाठी मला त्या विभागाची अतिथी संपादक म्हणून धुरा सांभाळण्याची विचारणा करणारे लक्ष्मणशास्त्री जोशींच्या स्वाक्षरीचे पत्र मला आले. हा माझ्यासाठी मोठा सन्मान व जबाबदारीही होती. हे काम करताना मी महिन्यातील पाच ते सहा दिवस लक्ष्मणशास्त्री जोशींच्या वाईच्या वाड्यात अभ्यासकांसाठी असलेल्या खोलीत राहत असे. यामुळे त्यांच्याकडून केवळ अभ्यासाशी निगडित नव्हे, तर घरगुती, वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टी शिकता आल्या.
ज्ञानवंतांसोबत विरंगुळा म्हणून मारलेल्या गप्पांमधूनही अनेक बारीकसारीक गोष्टींचा प्रत्यय येत गेला. विशेष म्हणजे, ही दोन्ही शास्त्री मंडळी सनातनी नव्हती तर पुरोगामी होती. या अनुभवांचा उपयोग मला पुढे धर्माचा सखोल अभ्यास सुरू केल्यावर झाला. केवळ जुनं आहे म्हणून ते उच्च व उदात्त असे नसते, हे मी चित्रावांच्या वेदांवरील पुस्तकांतून शिकले. प्रत्येक काळात चांगले, वाईट, भले, बुरे हे असते. ते सारे एकाच वेळी असते. पण तो एक प्रवाह असतो. तो पुढे सरकत असतो. हा प्रगत विचार व भान या दोन्ही शास्त्रींनी मला दिले.
अशा रीतीने अनेक ज्ञानवंत माझ्या आयुष्यात आले, मी त्यांच्या सहवासात आले. त्यांनी माझे आयुष्य समृद्ध केले. आयुष्यात पैसा भरपूर कमावला नाही, मात्र या ज्ञानवंतांच्या सहवासात येण्याने मी खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले.
शब्दांकन : प्राजक्ता थोरात
***
(लोकसंस्कृतीच्या नामवंत अभ्यासक, संशोधिका आणि नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष)
(समतावादी मुक्त संवाद पत्रिका – दिवाळी विशेषांक २०२५ मधून साभार)
