मुंबई : प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरील वाहतूकीची कोंडी तब्बल ३२ तासानंतर सुटली. महामार्ग आणि घाटात एकाच जागी थांबलेल्या वाहनांच्या चाकांना गती मिळाली आहे. भविष्यात असे प्रसंग उद्भवू नये म्हणून सरकारने उपाययोजना करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी वाहनधारक आणि प्रवाशांकडून केली जात आहे. (Traffic congestion on the Mumbai-Pune Expressway has been cleared)
मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आडोशी बोगद्याकडे अतिज्वलनशील वायुची वाहतूक करणारा टँकर उलटला होता. टँकरमधून प्रॉपलिन हा अतिज्वलनशील वायू बाहेर येत होता. मोठ्या अपघाताची शक्यता लक्षात घेऊन मुंबई मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना पाणी आणि खाद्यपदार्थ न मिळाल्याने हाल झाले. स्वच्छतागृह नसल्याने महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. वृद्ध, रुग्णांची गैरसोय झाली. बीपी आणि शुगरच्या रुग्णांना खाण्यापिण्याची सोय नसल्याने औषधे घेता आली नाहीत. नोकरी, अपाईमेंट, मिटिंगांना अनेकांना वेळेत पोहोचता आले नाही. काहींना एक दिवस आणि रात्री पाणी पिऊन काढावी लागली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना एमएसआरडीसीकडून पिण्याचे पाणी आणि बिस्किटस् देण्यात आली पण ही मदत वाहतूक कोंडीमुळे अनेकांपर्यंत पोहोचली नाही. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईलपर्यंत टोल वसुली थांबवण्याचे आदेश उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. (Traffic congestion on the Mumbai-Pune Expressway has been cleared)
बुधवारी सायंकाळी अपघातग्रस्त टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरीत करण्याचे काम तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आले. यावेळी गळती लागलेल्या टँकरवर अखंडपणे पाण्याचा मारा करण्यात आला होता. बुधवारी रात्री उशिरा टँकर हलवण्यात आल्यावर वाहतूक सुरू झाली. पण याचा फटका जुना मुंबई पुणे महामार्गालाही बसला आहे. तिथली वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम अजुनही पोलिस प्रशासन करत आहे. (Traffic congestion on the Mumbai-Pune Expressway has been cleared)