मुंबईः अभिनेता सुशांतसिंग राजपूतची पूर्वाश्रमीची मॅनेजर दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी वेळोवेळी केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार दिशाच्या वडिलांनी याचिकेच्या माध्यमातून केला आहे. (Disha Salian)
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी दिशाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी रिपब्लिक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. दिशा सालियनची आत्महत्या होती की हत्या? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला असता सतीश सालियन म्हणाले, “एकंदरीत संपूर्ण तपास पाहता मला असं वाटतं की ही हत्याच आहे. कारण एखाद्या व्यक्तीची बॉडी १४ व्या मजल्यावरून पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही. डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा. १४ व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते?” (Disha Salian Death case)
आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला
तुमच्यावर २०२२ मध्ये कोणाचा दबाव होता का? या प्रश्नावर सतीश सालियन म्हणाले की, “माझ्यावर कोणाचाही कोणताही दबाव नव्हता. मात्र, मला तशा प्रकारे पटवून सांगण्यात आलं होतं. तसेच दिशा सालियन बरोबर जे होते ते कधीही खोटं बोलणार नाहीत असा विश्वास मला तेव्हा वाटला होता. तसेच तेव्हा आम्हाला पोलिसांनी देखील सांगितलं होतं की ही आत्महत्या आहे. तेव्हा आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला होता.” (Disha Salian Death case)
वकील निलेश ओझा यांनी देखील दिशा सालियन प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली. निलेश ओझा यांनी म्हटलं की, “घटना घडल्याच्या पहिल्या दिवसांपासून दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा प्रश्न होता की, १४ व्या मजल्यावरून पडल्यानंतर रक्ताचा एक थेंब देखील दिसला नाही. दिशा सालियनचा मृतदेह जेव्हा कुटुबीयांकडे सोपवण्यात आला होता, तेव्हा शरीरावर एकही जखम नव्हती. दिशा सालियनच्या पालकांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल काही शंका असतील तर न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांचे निरसन झाले पाहिजे. म्हणजे त्यांना न्याय मिळायला पाहिजे. (Disha Salian Death case)
ठळक घटनाक्रम (Disha Salian Death case)
दिशा सालियनच्या मृत्यूची घटना ८ जून २०२० रोजी घडली होती. मुंबईतील मालाड येथील एक इमारतीवरून उडी मारून दिशाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. दिशा ही पूर्वाश्रमीची अभिनेता सुशांत सिंगची मॅनेजर होती.
दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी सुशांतसिंग राजपूतनेही आत्महत्या केली होती.
या दोन्ही घटनांच्या निमित्ताने भारतीय प्रसारमाध्यमांचा विद्रूप आणि विकृत चेहरा समोर आला होता.
त्यानंतर १८ महिन्यांनी म्हणजे २३ फेब्रुवारी २०२२ रोजी दिशाच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेवून नारायण राणे, नितेश राणे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. ही मंडळी आपल्या मुलीची मरणोत्तर बदनामी करीत आहेत. या बदनामीमुळे आमचे जगणे अवघड झाले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी दिशाच्या पालकांनी केली होती. आमच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करू नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले होते. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. त्यानंतर चार महिन्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते.
त्यानंतर तीन वर्षानंतर म्हणजे २० मार्च २०२५ रोजी दिशाच्या पालकांनी आपली भूमिका बदललेली दिसते. ज्या राणे पितापुत्रामुळे बदनामी होते, असे वाटत होते त्यांनी केलेल्या आरोपांच्या आधारेच न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दिशाच्या पालकांना न्याय मिळेल की नाही माहीत नाही. काही दिवस किंवा आठवडे आदित्य ठाकरे यांची बदनामी होत राहील. कदाचित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिल्लीतल्या सत्तेत ओढून घेता येईल.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन, दिशाच्या वडिलांना न्याय मिळावा एवढीच मागणी या क्षणी करता येते.