एडलेडच्या (Adelaide) वनडे सामन्यातील विजयामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाच्या तरुण खेळाडूंनी भारतीय संघाचा नवीन वनडे कर्णधार शुभमन गिलचे कर्णधारपदाचे पदार्पण झाकोळून टाकले आहे. (India vs Australia)
या पराभवातील सर्वात निराशाजनक गोष्ट म्हणजे — शुभमन गिलची फलंदाजी आणि कर्णधारपद. पहिल्या दोन सामन्यांमध्ये गिलच्या बॅटमधून निघालेल्या एकूण धावा फक्त आहेत फक्त १९. त्याने गोलंदाजीमध्ये केलेले बदल आणि क्षेत्ररचना या दोन्हींवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तथापि, टीमच्या पराभवात इतर फलंदाजांचाही मोठा वाटा आहे. (India vs Australia)
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघात अनेक नवे चेहरे आहेत. तरीही त्यांनी दोन्ही सामने सहज जिंकून मालिकेवर कब्जा केला.
पहिल्या सामन्यात पावसामुळे त्यांना डीएलएस नियमाचा फायदा झाला. पण दुसऱ्या सामन्यात त्यांनी भक्कम फलंदाजी करून धावांचा यशस्वी पाठलाग केला. शेवटी थोडी गडबड झाली तरी कूपर कॉनोलीने संयमी खेळ करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. (India vs Australia)
शॉर्ट आणि कॉनोलीचे शानदार प्रदर्शन
ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी निवडली. भारताला त्यांनी केवळ २६४ धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला ऑस्ट्रेलियालाही दोन झटके बसले. मार्श आणि हेड लवकर बाद झाले. मात्र त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि शेवटी कूपर कॉनोली यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा विजय मिळाला. शॉर्टने ७८ चेंडूत ७४ धावा केल्या (४ चौकार, २ षटकार). कॉनोलीने ५३ चेंडूत नाबाद ६१ धावा ठोकल्या (५ चौकार, १ षटकार). (India vs Australia)
शॉर्टचे सुटलेले कॅच निर्णायक
भारतीय संघाने या सामन्यात दोन मोठे झेल सोडले. तेच शेवटी निर्णायक ठरले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या मॅथ्यू शॉर्टला दोन वेळा जीवनदान मिळाले. पहिल्यांदा, तो फक्त २० धावांवर असताना अक्षर पटेलने पॉईंटवर सोपा झेल सोडला. तेव्हा तो पूर्ण सेट झाला नव्हता. बॉल जोरात आला असल्याने कॅच कठीण होता, पण तो महत्त्वाचा होता. दुसऱ्यांदा, शॉर्ट ५५ धावांवर असताना त्याला पुन्हा जीवनदान मिळाले. यावेळी तो सेट झाला होता आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती थोडी नाजूक दिसत होती. पुन्हा पॉईंटच्या दिशेने गेलेल्या चेंडूवर सिराजला सोपा झेल पकडता आला नाही. (India vs Australia)
नंतर सिराजनेच डीप स्क्वेअर लेगवर त्याचा झेल पकडला, पण तोपर्यंत सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला होता. सामान्यतः सिराज पॉईंटवर फिल्डिंग करत नाही. पण कर्णधार गिलच्या चुकीच्या फिल्ड प्लेसमेंटमुळे भारताने मोठी संधी गमावली. (India vs Australia)
कर्णधार गिलचे काय चुकले?
शुभमन गिल आपल्या दुसऱ्याच सामन्यात कर्णधार म्हणून उतरला होता. त्याच्या खेळात अनुभवाची कमतरता स्पष्ट जाणवली. भारतीय गोलंदाजांनी शेवटी यश मिळवले, पण गिलने योग्य वेळी गोलंदाजीमध्ये बदल केले असते तर सामना भारत जिंकू शकला असता. एक वेळ अशी होती की ३९व्या षटकानंतर ऑस्ट्रेलिया संघर्ष करत होता. पण त्यानंतर सिराजचा सोपा कॅच सुटला. तरीही सामना वाचवता आला असता. परंतु क्रॅम्प्स असतानाही गिलने एका टोकावर स्पिनऐवजी सतत हर्षित राणालाच गोलंदाजीस ठेवले. राणाने शॉर्टची विकेट घेतली, पण त्या काळात भारताने केवळ १५ चेंडूंमध्ये ३५ धावा दिल्या. तिथेच सामना भारताच्या हातातून निसटला. परिणामी, सामना ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला. (India vs Australia)
कर्णधारपदाचा गिलच्या फलंदाजीवर परिणाम?
पर्थ आणि अॅडलेड या दोन्ही सामन्यांत काही गोष्टी सारख्याच घडल्या —
विराट कोहली दोन्ही वेळा शून्यावर बाद झाला. आणि कर्णधार शुभमन गिलही लवकर बाद झाला.
पहिल्या सामन्यात गिलने दोन सुंदर चौकारही मारले. पण लेग साइडकडे दूर जात असलेला बॉल खेळण्याच्या प्रयत्नात विकेटकीपर फिलिपकडे कॅच दिला. दुसऱ्या सामन्यातही तसंच झालं — गिल नियंत्रणात दिसत होता. पण बार्टलेटच्या साध्या बॉलवर पुढे येत मारण्याच्या प्रयत्नात मिड ऑफवर उभ्या मार्शकडे झेल दिला. (India vs Australia)
झंपाची जबरदस्त गोलंदाजी
भारतीय डावात रोहित शर्मा (७३) आणि श्रेयस अय्यर (६१) यांनी छान भागीदारी केली. पण ते बाद झाल्यानंतर एकामागोमाग विकेट पडत गेल्या. अक्षर पटेलने थोडा आक्रमक खेळ केला. पण षटकार मारण्याच्या प्रयत्नात तोही बाद झाला. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी नवव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताची धावसंख्या अडीचशे पार गेली. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झंपाने ४, बार्टलेटने ३, तर मिचेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या. (India vs Australia)