रामदास आठवले अधिकृतरित्या भाजपसोबत आहेत. दोन वर्षांपूर्वी जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत आघाडी केली. आता आनंदराज आंबेडकर यांनीही एकनाथ शिंदे यांच्याशी आघाडी केली. प्रकाश आंबेडकर भाजपवर टीका करीत असले तरी निवडणुकीत त्यांचे धोरण भाजपला मदत करण्याचेच असते. याचा अर्थ महाराष्ट्रातील आंबेकरी चळवळीतील यच्चयावत नेत्यांनी आता हिंदुत्ववादी पक्षांशी जुळवून घेतले आहे. नेत्यांनी राजकीय तडजोडी केल्या, तरी आंबेडकरी जनता तडजोड करणार का, हा खरा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आंबेडकरी नेत्यांना सोबत घेणे महाविकास आघाडीतील पक्षांना परवडणारे नाही, ते भाजप किंवा शिंदे यांनाच परवडू शकते, अशी विरोधकांची भावना आहे. (Shinde-Anandraj)
- डॉ. विजय चोरमारे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्ष मुंबईत महायुतीसोबत लढणार की स्वबळावर लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही इतर पर्याय खुले ठेवले आहेत. रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत त्यांनी युती केली आहे. त्यासंदर्भातील घोषणा दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. आनंदराज आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आहेत. त्यांच्यामागे समाजाचे किती समर्थन आहे, हे गुलदस्त्यात आहे. परंतु त्यांच्याकडे आंबेडकर नावाचा ब्रँड आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. यावेळी शिंदे यांनी म्हटले आहे की, रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या दोन संघटना आज सोबत येत आहेत. एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी तर दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी आहे.. दोन्ही सेनाच असल्यानं आमचं चांगलं जमेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्यावर जमणारच आहे, असं आनंदाज आंबेडकर यांनी सांगितलं. (Shinde-Anandraj)
शिवसेना रिपब्लिकन सेनेच्या युतीमुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय बदल घडून येतील. आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत संधी मिळावी, यासाठी ही युती असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आता प्रश्न एकच उरतो. अर्थात सत्तेच्या सोयरिकीत तो फारसा महत्त्वाचा ठरणार नाही. आनंदराज आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कठोर टीकाकार आहेत. मोदी यांच्या काळात बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ले झाल्याचे आणि मोदींनी देशाची वाट लावल्याची टीका आनंदराज आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. आणि एकनाथ शिंदे यांना तर मोदींमुळे देशाचा कायापालट झाल्याचे वाटते. अर्थात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोदींचा मुद्दा येणार नसल्यामुळे दोघांचे जमण्यात काही अडचण येणार नाही. महायुती एकत्र लढली नाही तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून रिपब्लिकन सेनेला काही जागा सोडल्या जातील. मात्र महायुती एकत्र लढल्यास आनंदराज यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही. परंतु निवडणुकीआधी पदरात दान पडल्याशिवाय ही युती घडली नसेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. आंबेडकरी चळवळीतील एका शिलेदाराने थेट हिंदुत्ववादी पक्षासोबत युती करण्यामागे राजकारणापलीकडे अर्थकारण आणि सत्ताकारण असू शकते, असाच सगळ्यांचा अंदाज आहे. याच प्रकारे एकेकाळचे आंबेडकरी चळवळीतील फायरब्रँड नेते जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती केली होती. एकनाथ शिंदे यांचा राजकारणातला दीर्घ अनुभव आहे. त्यांना एवढे कळते की अशा युतीचा निवडणुकीत फारसा उपयोग होत नसतो. परंतु आंबेडकर नावाचा ब्रँड आपल्यासोबत असल्याचा एक वेगळा फायदा असतो. आपल्यावर होणारी टीका झेलण्यासाठी एक पक्षाबाहेरचा आधार मिळत असतो. किंवा आपण जी टीका करू शकत नाही, ती टीका करायला एक वाहक मिळत असतो. (Shinde-Anandraj)
शिवशक्ती-भीमशक्ती युतीच्या घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा झाल्या आहेत.
नामदेव ढसाळ यांनी शिवसेनेशी जुळवून घेतले होते.
रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपच्या युतीसोबत जाऊन महायुती आकाराला आली होती. पुढे शिवसेना आणि भाजप यांच्यात फाटाफूट झाल्यानंतर आठवले यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून म्हणजे गेली दोन दशके ते भाजपसोबत सत्तेची फळे चाखत आहेत. भाजपच्या अडचणीच्या काळात भाजपची वकिली करताना कोणताही संकोच बाळगत नाहीत.
प्रकाश आंबेडकर हे भाजप, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचे कठोर टीकाकार आहेत. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी मात्र त्यांचे धोरण भाजपला मदत करण्याचेच राहिले आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली. बैठका झाल्या. घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्षात ती युती आकाराला आली नाही. कारण शिवसेनेसोबत युती करून प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कठोर टीका करीत होते. त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही युती प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र होऊ शकली नाही. (Shinde-Anandraj)
जोगेंद्र कवाडे हे दीर्घकाळ काँग्रेससोबत राहिले. धर्मनिरपेक्ष विचारांसोबत राहिले. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी युती केली.
प्रत्यक्षात नेत्यांची युती झाली तरी आंबेडकरी जनतेने मात्र कोणत्याही नेत्यामागे फरफटत जाणे टाळले. २०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला साथ दिली. परंतु त्यांच्यामुळे भाजपचा फायदा होत असल्याचे लक्षात आल्यावर नंतरच्या काळात त्यांना साथ दिली नाही. (Shinde-Anandraj)
असे असले तरीसुद्धा प्रमुख पक्षांना आंबेडकरी चळवळीतील नेते हवेच असतात, हे वास्तव मात्र नाकारता येत नाही.
‘वंचित’ कडून आनंदराज यांच्या भूमिकेचा निषेध
- आनंदराज आंबेडकर यांच्या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीने भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी त्यासंदर्भातील निवेदन केले आहे, ते असे :
- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
- भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने युतीची घोषणा केली. आम्ही ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य बाब मानतो. गेल्या सत्तर वर्षाच्या राजकारणात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीने कटाक्षाने संविधानाला न मानणारे आणि आता संविधान बदलणारे आरएसएस-बीजेपी यांच्याबरोबर कधीही युती केली नाही. याचे कारण बीजेपी – आरएसएस हे संतांचा हिंदू धर्म मानत नाही, तर सनातन वैदिक धर्म मानतात. फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही समता, स्वातंत्र्य, बंधुता यावर आधारित संतांच्या विचारांची पाईक आहे. हे दोन्हीही दोन विरुद्ध टोकं आहेत.
- फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतल्या जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू जरी असले तरी त्यांची विचारसरणी आणि वागणूक ही संविधान बदलणाऱ्या आरएसएस बीजेपी यांची समर्थक झाली आहे. आत्तापर्यंत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला व त्यांच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतला आहे की यापुढे आनंदराज आंबेडकर यांना व त्यांच्या रिपब्लिकन सेनेला पाठिंबा नाही.
- ज्या-ज्या संघटना संविधान बदलणाऱ्या बीजेपी-आरएसएस व त्यांच्या मित्रांबरोबर समझोता करतील ते फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे पाईक होऊ शकत नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेला यापुढे आमचा विरोध राहणार. तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळीला आम्ही आवाहन करतो, आनंदराज आंबेडकर की संविधान? याबाबतीत वंचित बहुजन आघाडीचा निर्णय हा संविधानाच्या बाजूने आहे. फुले शाहू आंबेडकरी जनतेने आपला निर्णय घ्यावा.
हेही वाचा :
संजय जगतापांच्या भाजप प्रवेशाचा `बारामती`वर थेट परिणाम