लंडन : भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्याची आणखी एक घटना ब्रिटनमधून घडली आहे. वुल्व्हरहॅम्प्टनमधील रेल्वे स्थानकाबाहेर तीन किशोरवयीन मुलांनी दोन शीख पुरुषांवर हल्ला केला. १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. (Hate crime against Indians)
हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका हल्लेखोराने त्यांना लाथ मारली आणि दुसऱ्याने रोखले तर पीडितांना जमिनीवर पाडल्याचे दिसून आले आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून, टीकेची झोडही सुरू आहे. शीख पुरुषांच्या पगड्या जबरदस्तीने काढून टाकण्यात आल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे.
या हल्ल्यामागील किशोरवयीनांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. (Hate crime against Indians)
बादल यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून, हा हल्ला ‘‘भयानक’’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना हा मुद्दा यूके सरकारसमोर उपस्थित करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (Hate crime against Indians)
‘‘यूकेमधील वुल्व्हरहॅम्प्टन येथे दोन वृद्ध शीख पुरुषांवर झालेल्या भयानक हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो, ज्या दरम्यान एका शीख व्यक्तीची पगडी जबरदस्तीने काढून टाकण्यात आली. हा वंशवादी द्वेषपूर्ण गुन्हा शीख समुदायाला लक्ष्य करण्यासाठी केला आहे. शीख समुदाय नेहमीच सर्वांचे कल्याण चिंततो. परोपकार आणि करुणेसाठी ओळखला जाणारा, शीख समुदाय जगभरात सुरक्षितता आणि आदरास पात्र आहे. मी वेस्ट मिडलँड्स पोलिस आणि यूके गृह कार्यालयाला दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई पीडितांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन करतो,’’ असेही बादल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.