धर्माचं अर्थावर नियंत्रण असतं की आर्थिक लाभानुसार व औकातीनुसार धर्माची व धार्मिक वागण्याची व्याख्या ठरते ? – संपूर्ण जगाला भेडसावणारा हा एक काटेकोर प्रश्न ! माझा एक मित्र व्यापारातील कर्जाच्या बोज्यामुळे अचानक वारला. त्याच्या बायकोचे चार श्रीमंत भाऊ तब्बल तेरा दिवस बहिणीकडे मुक्कामाला होते. आपण किती धार्मिक आहोत नि बहिणीबद्दल खूप संवेदनशील आहोत, हे जगाला दाखविण्यासाठी हे बहिणीच्याच खर्चाने रोज भिन्न भिन्न धार्मिक विधी करीत होते. दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी यांनी आपल्या बहिणीच्या नवऱ्याला कोणतीही आर्थिक मदत केलेली नव्हती.
डॉ. गिरीश जाखोटिया
एका परिचित गरीब दाम्पत्याने दोन मुली झाल्यानंतर तिसरंही मूल होऊ दिलं, कारण मुलगा हवा होता. धर्मानुसार (म्हणजे पुरुषांनी लिहिलेल्या शास्रानुसार) मरणानंतर अग्नी द्यायला मुलगा हवाच. आता समस्या आहे ती आर्थिक ! तीन मुलांचं पालनपोषण कसं करणार ? (आणि हो, बऱ्याच स्रियांना आजही “मुलगा होण्याचं” धार्मिक महत्त्व प्रचंड वाटतं !) विदर्भातील अत्यंत गरीब शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या निरागस विधवांना खर्चिक धार्मिक विधी करायला लावणारी इथलीच अन्यायी व पाखंडी व्यवस्था ! सगळ्या मार्गांचा वापर करून अतिबलाढ्य झालेले एक उद्योगपती एकदा धार्मिक सुरात बोलले, “संपत्ती तो बस माया है !” माझा एक उत्तर भारतीय मित्र मुंबईत नोकरी करतो. एकदा मला म्हणाला, “मी पवित्र धर्मक्षेत्रातून आलोय.” मी मंदस्मित करत यावर म्हणालो, “ते ठीक आहे. पण अर्थार्जनासाठी इकडे यावं लागलं.” यावर तो गंभीर झाला. काळाच्या ओघात “धर्म” या संकल्पनेचे किंवा संज्ञेचे विविध अर्थ विविध धर्मप्रमुखांना व त्यांच्या अनुयायांना अभिप्रेत होत राहिल्याने अर्थकारणाची तत्वे सुद्धा भिन्न भिन्न प्रकारे प्रचलित होत गेली आणि जगभरातील बहुतेक सामान्यांना मागास ठेवत गेली.
इसवी सनाच्या प्रारंभी मनुस्मृती हा ग्रंथ लिहिला गेला जो शूद्रांच्या व महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर भयंकर बंधने घालतो. भारतीय उपखंडात साडेतीन हजार वर्षांपूर्वी चातुर्वर्ण्यव्यवस्था रूजण्यापूर्वी येथील कृषक संस्कृतीत ‘धर्म’ ही संकल्पनाच नव्हती. यास्तव इथे धार्मिक भेदाभेदही नव्हते. धार्मिक अवडंबरांशिवायही प्रसन्न होणाऱ्या शंकराचे विद्वान गण हे कोणत्याही आर्थिक लाभाच्या अपेक्षेशिवाय आपलं जीवनोपयोगी ज्ञान वाटायचे. त्या महेशाचं रूप आणि राहणं इतकं साधं की कोणतीही आर्थिक औकात इथे गळून पडावी ! सामुदायिक व सहकारी सहजीवनामुळे गणांच्या आर्थिक व्यवस्थापनात संतुलन होते व स्रियांचा त्यात समान सहभाग होता. निऋती या आदरणीय गणनायिकेने अन्य स्रियांच्या मदतीने शेतीव्यवस्था प्रगत केली होती. आज ज्यांना आपण ‘बहुजन’ संबोधितो (ओबीसी, एससी, एसटी इत्यादी) त्या सिंधूजनांनी अर्थोत्पादनाची अनेक भौतिक शास्त्रे प्राकृत म्हणजे स्वतःच्या नैसर्गिक भाषेत विकसित केलेली होती. बौद्धिक महत्ता, सामाजिक समता व निसर्गाधारित सांस्कृतिक आनंदावर आधारित येथील गणसमूह होते. मोहेंजोदडो व हरप्पा येथील उत्खननात भारतभर पसरलेल्या या सिंधू संस्कृतीच्या संबंधातील आर्थिक संपन्नतेच्या अनेक खुणा सापडल्या आहेत. नंतर मात्र चातुर्वर्ण्यव्यवस्थेतेमुळे जसजसा धार्मिक चौकटीचा अर्थ हा अन्यायी जातींची उतरंड, अंधश्रद्धा, पाखंड, स्रियांची अवहेलना, भाषिक व आहारविषयक अहंकार, ग्रांथिक पोपटपंची असा स्थापित होत गेला तसतसा बहुजनांचा आर्थिक स्तर वेगाने खालावत गेला. “अर्थार्जन पुरेसे नाही म्हणून चांगले ज्ञानार्जन नाही, नि म्हणून सुधारित कौशल्य नाही नि मग पुन्हा पुरेसे अर्थार्जन नाही” – या विदीर्ण करणाऱ्या दुष्टचक्रात इथले बहुजन ( म्हणजेच शूद्र) अडकत गेले. जोतीबांनी हाच नेमका मुद्दा “विद्येविना मती गेली ….. वित्ताविना शूद्र खचले ” या आपल्या सुभाषितातून प्रभावीपणे मांडला होता. भंपक धार्मिक अंधश्रद्धांना टाळून आपला रोजगार वाचविण्यासाठी बहुजनांनी खरे तर आता ‘आर्टिफिशल इंटिलिजंस’ शिकलं पाहिजे !
मध्यंतरी “मंत्रोच्चाराने पिकप्राप्ती” वाढली असे एक अभीजनीय विधान ऐकण्यात आले. आर्थिक संपन्नता उपभोगणारे अभिजन वा उच्चवर्णीय हे खूप धार्मिक असतात नि म्हणून आपणही धार्मिक व्हायला हवे, हा “निरागस बावळटपणा” बहुजनांमध्ये खोलवर रूजलेला आहे. बरेच अमीर अभिजन हे प्रचंड पैसा आधी कमवून झाल्यावर बख्खळ दक्षिणा देत एकवीस किंवा अधिक पुरोहितांकडून मंत्रपठण करून घेतात नि अशाप्रकारे “पुण्यकर्म” करण्याचं ‘आउटसोर्सिंग’ करतात आणि आपल्या तथाकथित धार्मिक समाजात स्वतःची अध्यात्मिक वट वाढवतात हे भाबड्या बहुजनांना कळतच नाही. किंवा कळलं तरी मेंदूत नीटपणे शिरत नाही ! हा भाबडेपणा कालही एवढा होता की लोकप्रिय बळीराजा स्वतःचं राज्य घालवून बसला. “आपका नमक खाया है सरकार” या मूर्खपणापासून ते गावच्या उच्चभ्रू प्रमुखाला धार्मिक, आर्थिक व सामाजिक असे सर्व अधिकार बहाल केल्याने येथील अनेक कुणबी, अल्पभूधारक छोटे शेतकरी, कष्टकरी हे धार्मिक अंधश्रद्धांची अफू खाल्लेले आर्थिक गुलाम बनले. गमतीचा प्रकार असा की जेवढे जास्त संस्कृत श्लोकांचे पठण तेवढे जास्त पुण्यार्जन नि म्हणून तेवढी जास्त बिदागी द्यायची, हा एक संस्कारी प्रघात पडत गेला. संस्कृत श्लोकाचा सामान्य अर्थ हा ईश्वराची प्रार्थना असाच असतो. मग साध्या मराठीत ईश्वराची प्रार्थना करण्याने तो दयाळू परमेश्वर ऐकणार नाही, अशी भिती का वाटावी ? अत्यंत चाणाक्षपणे संस्कृत भाषेचे धार्मिक महत्त्व वाढवले गेले जी मूलतः ‘इंडो – युरोपियन समूहातील’ एक सामान्य भाषा आहे. खरेतर अर्थार्जनाचे ज्ञान देणारी जागतिक भाषा आणि आपल्या सांस्कृतिक – सामाजिक जाणिवा जिवंत ठेवणारी मातृभाषा महत्त्वाची. म्हणूनच उच्चभ्रूंसोबत अनेक बहुजनही आपल्या मुलांना हल्ली मराठीसोबत इंग्रजी शिकवताहेत. हे नक्कीच हितावह आहे. धार्मिक चौकटीत श्रद्धेचा फायदा उचलत “स्थान महात्म्य” काही घटकांनी वाढविल्याने भाबडे बहुजन आणखीन धार्मिक खर्च करु लागले. हे सारं या आशेने की आपली आर्थिक दुरावस्था नाहिशी होईल. स्थानमहात्म्यासाठी विविध धर्मातील लोक जिथे जिथे जातात तिथे तिथे आर्थिक, वैज्ञानिक, व्यावसायिक व सामाजिक मागासलेपणा दिसून येतो, हे सामान्य तर्कानेही लक्षात यावे. याचे महत्त्वाचे कारण हे आहे की जिथे धार्मिक अंधश्रद्धा व अवडंबरे वाढत जातात तिथे जीवनोपयोगी संशोधन होत नाही. कारण बहुतेक धार्मिक चौकटी या श्रद्धेवर आधारित असल्याने त्या “जिज्ञासे”ला फारसा वाव देत नाहीत. यामुळे अर्थार्जनाचे सुयोग्य व कालसुसंगत कौशल्य विकसित होत नाही.
बरेच उद्योगपती हे राजकीय, प्रशासकीय व धार्मिक नेटवर्कचा अत्यंत चलाखीने व प्रसंगी निर्घृणपणे उपयोग करुन आपले आर्थिक साम्राज्य उभे करतात नि मग प्रार्थनास्थळांना सुशोभित करणे, धार्मिक संस्थांना देणग्या देणे, धार्मिक पुनरूज्जीवनासाठी छुपी मदत करणे, गुंगी आणणाऱ्या भाकड धार्मिक कथाकथनाला आर्थिक रसद पुरविणे इ. ‘धर्मादाय’ (!) कामे करत सुटतात. ही यांच्या अपराधांवरची एक रंगसफेदी असते जी करण्यात यांचे चलाख धर्माचार्यही सहभागी होतात. जगभरातला असा पाखंडी संकेत आहे की सर्वात मोठ्या उद्योगपतीचा धार्मिक गुरू हा सर्व “धर्माचार्यांचा मुकुटमणी” असतो ! हीच बाब बोगस बाबा – बापूंची. अब्जावधी रुपयांची कमाई पचवीत हे सकृतदर्शनी इस्पितळे, धार्मिक गुरूकुले व स्थानिक खेड्यांमध्ये काही सुधारणेची कामे करतात तेव्हा ते मूर्ख अनुयायांना ‘परमपूजनीय’ वाटतात. धार्मिक अंधश्रद्धा आणि पाखंडांचा कपटाने उपयोग करीत हेच लोक बहुजनांना “अन्याय सहन करण्याचे चाटण” देत असतात जेणेकरून जुलमी आर्थिक व्यवस्थेविरुद्ध सामान्य लोकांनी उठाव करू नये. “माझ्या आर्थिक विवंचनांसाठी माझे धार्मिक प्राक्तन जबाबदार आहे” असा बावळट विचार मनात रूजला की माणूस आपला मेंदू व मनगट विसरतो. मी असे अनेक अतिशिक्षित कार्पोरेट व्यवस्थापक, उद्योजक, व्यावसायिक व वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी पाहिले आहेत जे खूप मोठी फी देऊन भंपक धार्मिक गुरूंचे “छद्मवैज्ञानिक” प्रवचन ऐकायला जातात. अर्थात यातून एक प्रकारचा धार्मिक अहंगंड यांना कुरवाळता येतो. आर्थिक वा भौतिक सुधारणा करणाऱ्या संशोधकीय प्रयत्नांची लायकी किंवा इच्छा नसल्याने हे लबाड लोक “छद्म अध्यात्मा”मागे लपतात. तुम्ही यांना आव्हान दिले की एकतर हे पळून जातात किंवा श्रद्धेच्या ढालीचा वापर करतात.
चातुर्वर्ण्यव्यवस्थेतेने महिलांना धार्मिक परंपरांचे व अंधश्रद्धांचे पालन करण्यात असे आणि इतके गुंतवले की त्यांनी स्वतः आर्थिक अर्थार्जन करण्याची अपेक्षाही ठेवू नये. यातला अस्सल कावेबाजपणा असा की स्रियांनी अर्थार्जन करणाऱ्या पुरुषांचे वर्चस्व सदोदित स्विकारावे. आजही काही धार्मिक दुढ्ढाचारी अगदी मठ्ठ विधाने करीत असतात. यांचे एक प्रसिद्ध विधान म्हणजे, “अर्थार्जनासाठी घराबाहेर जाणाऱ्या महिला आमचा धर्म भ्रष्ट करताहेत, परिवाराला तोडताहेत नि मुलांवर चांगले संस्कार करत नाहीत.” या लबाडांना सोयीस्करपणे हे दिसत नाही की अनेक उत्तम सारस्वत समाजातील स्रिया आपल्या स्वतंत्र करिअरमधून अर्थार्जन करतानाच मुलांवर समर्थपणे चांगले संस्कारही करताहेत. साडेतीन हजार वर्षांचा पुरूषी वर्चस्ववाद जो धार्मिक व आर्थिक चौकटीत फोफावला तो सहजपणे जाणार नाहीच. यातली पुढची घृणास्पद गंमत अशी की धर्माने ठरवल्यानुसार “पती हा परमेश्वर” आणि म्हणून प्रचंड कष्ट करीत अर्थार्जन करणाऱ्या पत्नीने आळशी – व्यसनी नवऱ्याला पोसत रहायचे. तिला बिचारीला सातत्याने अशी भिती वाटत राहते की नवऱ्याची सेवा न केल्यास समाज काय म्हणेल, धर्माचार्य काय म्हणतील, देव काय म्हणेल ! मी अशा काही धार्मिक (!) उच्चभ्रू माता पाहिल्या आहेत ज्या अर्थार्जनानुसार स्वतःच्या दोन मुलांमध्ये फरक करतात. मूळ सिंधूसंस्कृतीत “स्री – पुरुष समानते”चे जे तत्त्व पाळले जायचे ते चातुर्वर्ण्यव्यवस्थेतेने ध्वस्त केले. आजही भारताच्या काही भागांत, विशेषतः केरळ, तमिळनाडू व आसाम – मेघालयसारख्या राज्यांमध्ये ही समानता पाळली जाते नि म्हणून तेथील स्रिया या आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्वावलंबी आहेत.
धर्म आणि अर्थकारण बव्हंशी एकमेकांना छेद देतात असाच जगाचा इतिहास आहे. वर्तमानातही तेच घडते आहे. इस्राएली व फिलिस्तीनींमधील धुमःश्चक्रीमुळे पुढच्या किमान पाच फिलिस्तिनी पिढ्यांचे प्रचंड आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक नुकसान झाले आहे. जेरूसलेमच्या पवित्र भूमीतून निपजलेले हे तिन्ही अब्राहमी धर्म एकमेकांची अतोनात आर्थिक हानी करताहेत. ज्यू विरूद्ध मुस्लीम अशा इस्राएल – इराणच्या लढाईत शेकडो अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले आहे. अर्थात या धार्मिक – आर्थिक नुकसानीत धूर्त अमेरिका आता आपला व्यापारी फायदा पाहील. शिया विरुद्ध सुन्नी पंथीयांमधील आजपर्यंतच्या लढायांमुळे सामान्य मुस्लीमांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. तेलाचा आधार सोडल्यास कट्टर धार्मिक असलेले खाडी देश स्वतंत्र अशी आर्थिक रचनाच उभी करू शकत नाहीत. धर्मग्रंथांमध्ये जीवनावश्यक आर्थिक कमाईच्या युक्त्या सांगितलेल्या नसूनही “ग्रांथिक पावित्र्य”च फक्त आंधळेपणाने मानणारे हे व इतर देश सातत्याने परावलंबीच राहतील हे मात्र नक्की. गमतीचा प्रकार म्हणजे धार्मिक कट्टरवाद एका बाजूला जोपासायचा आणि दुसऱ्या बाजूला पश्चिमी देशांच्या आर्थिक प्रगतीचा हेवा करायचा, हे यांचे ढोंग आता तरुण पिढीने ओळखले आहे. आणखीन मजेचा प्रकार म्हणजे बहुतेक धार्मिक दुढ्ढाचारी जे सतत “ब्रम्ह सत्य, जगत मिथ्या” म्हणत असतात ते आपल्या किचकट रोगावर उपाय करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या व वैज्ञानिक पथावर प्रगत असणाऱ्या देशालाच गुपचूप जाऊन येतात. कडवे धर्माभिमानी असणाऱ्या उच्चभ्रूंची बहुतेक मुले पश्चिमी देशांत आपापला धर्म घरात ठेवत व्यावसायिक शिस्तीने भरपूर अर्थार्जन करतात. या प्रगत देशांमध्ये धार्मिक अंधश्रद्धा वापरत पोट भरणारे जवळपास नसतातच. तिथे राहून बख्खळ आर्थिक कमाई करणारे व तेथील जीवनशैलीचा भरपेट आनंद घेणारे तथाकथित धर्मप्रेमी हे “भारत हे हिंदू राष्ट्र व्हावे” अशी फक्त गर्जना करतील. स्वतः व यांच्या पुढच्या पिढ्या मात्र पुन्हा भारतात परतणार नाहीत. कारण “अर्थस्य पुरूषो दासः”, असं युधिष्ठीराला भीष्म पितामहांनी सांगितलं होतं ! बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्या या प्रचंड यशस्वी का होतात, कारण त्या धर्म आणि अर्थकारणात योग्य ती फारकत करतात. आमच्याकडे मात्र विनाकारण “शाकाहारी” लोकांना धार्मिक चौकटीत उच्चस्थानावर बसवले जाते व असा लबाडीचा प्रचार केला जातो की शाकाहारी हे मांसाहारींपेक्षा अधिक “सात्विक” असतात. धर्माच्याच चौकटीत मग अप्रत्यक्षपणे सत्व, रज व तमो गुणांची चर्चा करत शाकाहारींच्या आर्थिक व आरोग्यविषयक तत्वज्ञानाला डोक्यावर घेतले जाते. मुळात हे तीन गुण ज्या सांख्य दर्शनात मांडले गेलेत ते दर्शन “कपिल” या नास्तिक मुनीने घडवले आहे. मी लहानपणापासून पहात आलोय की बरेच शाकाहारी व अतिधार्मिकता दाखवणारे उद्योजक कसे ग्राहकांना गंडवतात, कामगारांचे आर्थिक शोषण करतात आणि पूर्ण करभरणाही करत नाहीत. आर्थिक लाभासाठी आपल्या सख्ख्या नातेवाईकांना फसवून धार्मिक चोला अंगावर चढविणारे बरेच महाभाग मी बघत आलोय. “धर्म – अर्थ – काम – मोक्ष” या चार घटकांची मतलबी लबाड मांडणी व अंमलबजावणी हे ‘चोलावाले’ करत आलेत. ज्या धर्मातील अत्यंत गरीब लोक हे आजही धनिकांनी केलेल्या आर्थिक दानावर अवलंबून राहतात त्या धर्माच्या चौकटीत “सामाजिक न्याय” हा कमी होत असतो.
सन १९५० दरम्यान आपण आर्थिक प्रगतीबाबत चीनच्या थोडे पुढे होतो. नंतर मात्र ‘धार्मिक अवडंबरे’ बाजूला टाकत चीनने आर्थिक व वैज्ञानिक प्रगतीवर प्रचंड भर दिला. आज “उगी उगी धार्मिकते”चा आव आणणारे बहुसंख्य भारतीय उद्योजक हे चीनमधूनच मोठी आयात करतात. काही अपवाद सोडता गायीला पूज्य मानणारे अनेक धार्मिक महाभाग गायीची आर्थिक जबाबदारी घेत नाहीत. तिला सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना हे योग्य भावही देत नाहीत. यांचं ओंगळवाणं ‘टोकनिजम’ आता काही बहुजन समजू लागले आहेत. परंतु आजही अनेक बहुजन नेते व त्यांचे मूर्ख कार्यकर्ते हे बोगस धर्माचार्यांच्या नादी लागून आपल्याच गरीब बांधवांसाठी आवश्यक असणारे आर्थिक – शैक्षणिक प्रगतीचे कार्यक्रम नीटपणे राबवत नाहीत. ” निओ ईलाईट (Neo Elite)” म्हणजे ‘नवउच्चभ्रू’ झाल्यासारखे हे बावळट नेते ढोंगी उच्चवर्णीयांच्या आगेमागे फिरत असतात नि तसाच पेहरावही करत असतात ! यांना हे सुद्धा विस्तृतपणे माहीत नसते की देशाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी किती तरतूद करायला हवी. चीन ही तरतूद आपल्या दुपटीपेक्षा जास्त करत आलाय म्हणून तो अमेरिकेला उघडपणे आव्हान देऊ शकतो. बहुजनांनी हे आता जाणावे की धार्मिक चौकटीत त्यांना आवश्यक असणारे न्यायपूर्ण अर्थकारण कधीच होणार नाही. यासाठी त्यांनी उत्तरेत असणाऱ्या मागासलेल्या “गायपट्ट्या”चा व तेथील आर्थिक शोषणाचा खोलात जाऊन अभ्यास करावा. धार्मिकतेचा जयघोष करणाऱ्या या पट्ट्यातील लोकांना अर्थार्जनासाठी महाराष्ट्रात का यावे लागते ? बहुजनांनी विवेक व तर्क या दोन गोष्टींवर आधारित “नीतीशास्रा”चा अंगिकार करावा. सामान्य तर्कानेही त्यांना कळू शकेल की आपले अर्थकारण हे नीतीशास्राद्वारेच सुधारता येईल. नीतीतून मती, मतीतून कृती, कृतीला गती आणि गतीतून प्रगती ! सिंधूजनांसारखे पुन्हा प्रगत व्हायचे असेल तर शिक्षित बहुजनांनीच आपल्या बांधवांनाही अर्थशिक्षित करावे. बहुतेक उच्चभ्रू हे धार्मिक देणग्या तर भरपूर देतात परंतु स्वतःच्या निवृत्तीनंतरही अर्थार्जनाची शास्रे ते सहजपणे बहुजनांना सांगत किंवा शिकवत नाहीत. तथागत गौतम बुद्ध म्हणूनच सांगून गेलेत, “आपणच आपले मार्गदर्शक होऊयात”.